मी कुठे म्हटलं माझं प्रेम नाही
फक्त इतकंच म्हटलं की या नात्यात राम नाही
जेव्हा तुझंच उत्तर ठाम नाही
मी कसं म्हणू माझ्या ठोक्यांना आराम नाही
म्हटलं तर तूच की प्रेम नाही
परीक्षा असतात तुझ्या पाठांतराच्या
ओळखा पाहूच्या. त्यात जिंकायला मी समर्थ नाही
म्हणून तुझ्या लेखी माझ्या प्रेमाला अर्थ नाही
परत परत सांगते तुला
यात पास होऊन कोठे जायचंय?
शेवटी मला तुझ्यापाशी आणि
तुला माझ्यापाशी यायचंय
मग येऊ की असेच
पत्रांच्या थप्प्या न लिहिताच
गाण्यांवर न गुणगुणताच
आणि न देता एकमेकांना वचनं
वचनं आली की कटघरे आले
कटघरे आले मी-तू पण
आणि मग एकामागून एक पण
पण कशाला पडायचं यात?
पडायचं तर फक्त प्रेमात पडू
प्रश्नांना कशाला एकमेकांना ओढू
नडायचं तर ते ही लाडिक नडू
आणि भिडायचं तर सगळ्यांची मिळूनच भिडू
तू पडायचं प्रेमात की मी?
हे नकोत प्रश्न
तू रडायचं प्रेमात की मी
असली नकोत उत्तरं
काय होईल काय होईल
याची नको टांगती तलवार
नको विचार जगाचा
नको भीती कोणाची
तू हरवून जा माझ्यात
मी हरवून जाते तुझ्यात
वाऱ्याच्या निजवणाऱ्या
झुळुकेप्रमाणे अलवार!