मोठ्ठा स्पीडब्रेकर आला आणि मणक्यात खडकन् मार बसला. लागलेला डोळा सतर्क झाला. अशीच झोपायचे मी. शाळेत जाताना आणि येताना सुद्धा. खिडकीतून बाहेर बघत तंद्री लागायची आणि मग विचारात हरवून जायचे मी. त्यात तो बसचा घुरघुराटी आवाज आणि पकडलेली मंद लय. झोपेची उत्तम सोय. कंडक्टर काकांशी चांगलीच मैत्री होती. रोजची तीच वेळ आणि तीच बस. त्यामेळे निश्चिंत राहिले तरी चालायचं. आज तसं नव्हतं ना पण. रस्ता तोच, जायचं ते घर तेच पण मधे ५२ वर्षांचा पल्ला गेला होता. रिकाम्या रस्त्याच्या आजूबाजूला भरभराट, गजबजाट, कलकलाट, लखलखाट, घमघमाट, किलबिलाट झाला होता. एकही झाड ओळखीचं उरलं नव्हतं. खरतरं एकही झाडंच उरलं नव्हतं. बसेसची अवस्ठा मात्र तशीच होती. किंवा वाईटच झाली असेल अजून! मी लडखडत कशीबशी ड्रायव्हर काकांपाशी उभी होते, माझ्या बसस्टॉपची वाट बघत. ड्रायच्हर आणि माझं वय किती वाढलं किंवा कमी झालं तरी तो माझ्यासाठी कायमच काका झाला आहे, हे थेट नववी नंतर मला आज जाणवलं. स्टॉप आला मी उतरले.

वडाचं झाड गायब होतं. त्याच्या पारब्यांशी माझ्या जोडल्या गेलेल्या आठवणी त्याला लटकण्याऐवजी माझ्या मनात लोंबकळत होत्या. नेमाण्यांचा बंगला नव्हता. त्या जागी एक उंच इमारत होती. लहानपणी मला नेहमी वाटायचं की नेमाणे अशा जुन्या मळक्या घरात का राहतात? त्यांनी घर जरा नव्यानी बांधावं. पण म्हणणं सोपं आहे. आज ते घर जाग्यावर नाही तर रुखरुख वाटतीये. बरं होतं तसं. मळकं असलं तरी दगडी बांधकामाची एक शान होती. पण मला लंडनमध्ये अर्ध आयुष्य काढताना काय जातंय म्हणायला की “Our generation must preserve antique constructions”. गळक्या पाण्याचे भोग शेवटी त्यांनी भोगले. चौक बाकी तसाच होता, पण ‘तो’ कुठे दिसत नव्हता. चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं.

‘तो’. मी घराबाहेर पडले की बघत बसायचा माझ्याकडे. अगदी एकटक. अनेकदा वाटलं त्याला जाऊन जाब विचारावा, पण ते काही शक्य झालं नाही. त्यानं कधीच बघण्यापलीकडे काही केलं नाही आणि नुसतं बघणं मी माझ्यालेखी जाऊन त्याला शाब्दिक किंवा शारिरीक मारण्याइतकं महत्वाचं मानलं नाही. तरीही त्याचा त्रास मात्र व्हायचा. वर्षामागून वर्ष गेली. मी जीव मुठीत धरुन स्टॉपवर यायचे आणि तो बघायला सज्ज असायचा. बस कधी लगेच यायची. जीव भांड्यात पडल्यासारखं वाटायचं. कधी कधी अर्धा अर्धा तास लावायची. तेव्हा मात्र एकेक मिनिट नकोसं व्हायचं. त्याचं नाव, वय मला तेव्हाही माहित नव्हतं आणि आजतागायत कळलं नाही पण होता माझ्या आसपासच्याच वयाचा. दोन-चार वर्षांनी मोठा असेल. माझा सोबतीच होता जणू. आम्ही दोघंच असायचो स्टॉपवर तेव्हा मला त्याची भिती वाटायची पण मग कधी कधी वडाच्या झाडाखाली एक दारुडा येऊन बसायचा. तेव्हा मला याचा आधार वाटायचा. एवढा बघतोच तर थोडी हिरोगिरी करेल आपल्यासाठी असं माझंच मी ठरवलं होतं. बसस्टॉप म्हणजे तो आणि तो म्हणजे बसस्टॉप असं समीकरण झालं होतं.

पुढे मग लग्न झाल्यावर मी बिचकत बिचकत नवर्‍यालाही त्याच्याबद्दल सांगितलं होतं. मी कधीच त्याच्याशी बोलले नाही की बघून हसले नाही पण लग्नाआधीचं लफडं असल्याच्या अपराधी भावनेनी नवर्‍यापाशी मन मोकळं केलं होतं. तो पोट धरुन हसला. माझी तळमळ त्याला कळलीच नव्हती किंवा या गोष्टीच्या क्षुल्लकपणाची मला जाण नव्हती. काहीही असो. धनंजयला सांगून खूप खूप बरं वाटलं होतं. मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं. शाळेत असताना अनेकदा आईला आणि बाबांना सांगावसं वाटलं होतं. पण शाळेत जायला पर्याय तसा एकच होता. सोडणं आणि आणणं कोणाला शक्य नव्हतं आणि त्याची कथा आईला सांगितली असती तर ह्या बघ्या त्रासापेक्षा तिचा त्रास बघणं फारच कठीण गेलं असतं. तर मुद्दा असा होता की पाचवी ते नववी माझ्याकडे बघत राहणारा हा कोपर्‍यावरचा एकनिष्ठ आशिक मी त्या धनंंजयला सांगितलेल्या हलक्या दिवसानंतर विसरुन गेले होते. पण आज या चौकानी त्या आठवणी माझ्याकडे सुपूर्त केल्या होत्या.

मी तो कोपरा न्याहाळला. आता झाडचं नव्हतं तर त्याची सावली तरी कुठून येणार त्याला बसायला? स्वतःभोवती मी एक चाचपडत प्रदक्षिणा घातली, तर एका मोठ्या छत्रीखाली एक आजोबा बसलेले दिसले. त्याचे वडील असावेत बहुधा. तेच सगळं चपला दुरुस्त करायचं सामान आणि तसाच तो बोर्ड. “चपला, बूट, पर्शी, छत्र्या यांना जीवनदान मिळेल”. फरक इतकाच आता त्या बाजूला एक इंग्लिश बोर्ड नवीन आला होता. “New life to shoo, ambrella, pars”. यांच्याकडे सगळंच अमर होतं वाटतं. माझे आईबाबा जाऊन तब्बल १० वर्ष उलटली तरी याचे वडील जिवंत. रिपेयर होणार्‍या चपलांसारखे! मी स्वतःशी हसले आणि माझी imported छत्री उघडून डोक्यावर धरली आणि घराकडे निघाले.

आमच्या कुटुंबातील जवळ जवळ सगळेच परदेशात स्ठायिक झाले. त्यामुळे आमच्या न एकमेकांशी गाठीभेटी होतात, न आमच्या या मूळ घराशी. आज ताई, भाऊ आणि आमचा मावस भाऊ आण्णा असे सगळे आपल्या कुटुंबासह भेटणार होते.

बरेच लोक, बराच आनंद, बरेच फोटो, बरंच जेवण झाल्यावर, ताई चहा टाकेपर्यंत मी सगळ्या बच्चेकंपनीला घेऊन फेरफटका मारायला निघाले. कोपर्‍यावर आलो तर मुलांनी थेट विचारलं की “आजी या  माणसाला घर नाही का? हा छत्री घेऊन का बसला आहे?”. पूर्णपणे मुरलेलं इंग्रजी. त्या टिपिकल परदेशी पद्धतीतच! माझ्या नातवांनी बघितलेले गरीब भारतीय गरीबांपेक्षा बरेच श्रीमंत आहेत. त्यामुळे आता कुठपासून सांगायला सुरुवात करावी लागेल याचा मी विचार करत होते. एकदा वाटलं की माझ्या गोष्टीतल्या या बळजबरी हिरोच्या बाबांची सरळ ओळख करुन द्यावी. पण ओळख काय करुन देणार? माझ्या बालपणीपासून झाडाच्या सावलीत बसणारा चांभार? हे वाक्य स्वतःशी उच्चारलं आणि माझं मलाच नवल वाटलं. मी निरखून त्याचा चेहरा बघितला. मी बघत असताना तो ही तितक्याच एकाग्रतेने बघू लागला. आज मात्र नजर चोरण्याचं न माझं वय होतं न आयुष्यात आलेले अनुभव! नजर मला पक्की ओळखीची वाटली. एखादी आपल्या जवळची वास्तू जशी आपण केव्हाही सोडून गेलो तरीही परत मागे वळून बघितल्यावर तिनं जैसे थे असावं अशी एक आंतरीक अपेक्षा असते, तसं झालं माझं. मी खुशाल म्हातारं व्हावं, पण तो बघणारा मी सोडून जाताना जसा तरुण होता तसाच असायला हवा, अशी माझी भाबडी अपेक्षा होती. समोर बसलेला म्हातारा माझ्यापेक्षा किमान १५ वर्षांनी मोठा वाटत होता. आमच्यातलं अंतर खरंतर एवढं नव्हतं. पण त्यानं माझ्यासारखं एंटी एजिंग क्रिम लावलं नसणार अन तो पार्लरलाही जात नसणार. रस्त्यातली धूळ, अनेक बसेसनी त्याच्या चेहर्‍यावर जाता जाता ओकलेला धूर आणि या सगळ्याला मागे टाकणारं असेल त्याचं मद्यपान. मद्यपान ही माझी समजूत पण ती तशीच ठेवायला मला आवडेल. आत्ता माझी ट्युब पेटली होती की हा समोर बसलेला माझाच आशिक, मजनू, चाहता! विनाकारण माझी मान उंचावली आणि मी नातवंडाना चप्पल तुटली तर नवीन न आणता तीच शिवून वापरणे ह्या अति कंजूष आणि चिकट स्वभावाची उदाहरण देत राहिले. मी हजारो वेळा शाळेच्याबाहेर माझी चप्पल दुरुस्त केली होती पण आपल्या आजीने हे केले असेल यावर त्यांचा काय विश्वास बसणार? माझी नात ‘चांभार’ या गोष्टीची खरंच मनापासून मजा घेत होती. तिला एक निरागस प्रश्न पडला होता. “या माणसाला दुसरा कामधंदा नाही का?” त्यातल्या तिचं माझ्याशी जवळचं नातं होतं, माझ्याशी आणि भारताशी. कारण यापूर्वी एकदा ती भारतात येऊन गेली होती. इतर मुलं इथली धूळ आणि धूर यापलीकडे डोकावूच शकत नव्हते! आम्ही समोरच महानगरपालिकेने केलेल्या बाकड्यांवर बसलो. मी वडाच्या झाडाच्या कहाण्या सुरु केल्या खर्‍या पण राहून राहून नजर त्याच्याचकडे जात होती. त्यानं मला ओळखलं असेल का? की नसेल? अजूनही ह्याला माझ्याशीच बोलायची उत्सुकता असेल? की प्रत्येकच मुलीला हा असंच वागवतो? उत्तरं नसली तरी प्रश्नच सुखावत होते. प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असा एक एकटक बघणारा अव्यक्त चेहरा जरुर असणार असं मला फार वाटू लागलं होतं. नवर्‍याला हे सांगावं असंही वाटलं.

माझी लागलेली तंद्री माझ्या नातीनं मोडली. “आजी तो माणूस बघतोय”. जे सत्य माझ्या घरच्यांना मी ५२ वर्षात सांगू शकले नव्हते ते तिनं एका सेकंदात सांगितलं. मीच निरुत्तर. “मी आज नेहमीपेक्षा जास्त छान दिसत असेन!” तिचा चेहरा आनंदला होता. एक आजी या नात्याने मी ताडकन उठले त्या चिमुरडीचा हात धरुन घराकडे निघाले. तिच्या चालण्यात मुळीच गती नव्हती. “सावकाश आजी, तू त्रास नको करुन घेऊस. मला चांगलं वाटत होतं.” मी तशीच थांबले आणि आश्चर्याने बघत राहिले. तिची भाषा इंग्रजी होती. बोलण्याची लकब भारतीय नव्हती. पण तरीही ती माझ्याच मुलीची मुलगी होती यावर एक सेकंद माझा विश्वास बसेना. “कोणी आपल्याकडे असं बघत राहिलं तर ते चांगलं नसतं!” गद्धेपंचवीशीतून टाईमप्लीज केलेल्या एका म्हातारीचा हा सल्ला होता. या सल्ल्यावरही तिचं स्मित आलं. “तो काही करेल तेव्हा बघून घेऊ. नुसतं बघणं एंजॉय करता येतं. नाहीतर माझ्या या महागड्या कपड्यांचा काय उपयोग. आता हा बेगर वाटतो पण माणूसच आहे ना!”. “तरीही नाही.” मी माझा आग्रह सोडेना. “तुझ्याकडे कधीच कोणी बघितलेलं दिसत नाही. नाहीतर अशी आततायी झाली नसतीस.” मी विचारात पडले. कायमच माझ्या मुला-नातवंडांशी मी जुळवून घेतलं. त्यांच्या वेगानी काळ मागे टाकला. पण आज एका पटलात वावरणार्‍या माझ्या नातीने कचकन माझा हात धरल्यासारखं वाटलं. “चल, तुझ्या चपलेला सोल लावून घेऊ”. माझ्या चेहर्‍यावर एक वेगळंच हसू तरळलं. “माझी चप्पल अगदी धडधाकट आहे.” माझी हिंमत होईना. “इट्स ओके गं आजी. लेट्स हॅव फन”. मी आ वासून तिच्या मागे चालत राहिले. मगाशी बाकावरुन जसं मी खेचून आणलं तसंच ती मला आत्ता ओढून नेत होती. असं वाटलं की ६६ वर्षांमध्ये पहिल्यांदाच मला रियल फन येणारे! “जरा या चपलेला सोल लावून द्या हो.” कानात फक्त नातीचं खिदळणं, मनात शाळेचा युनिफॉर्म आणि नजरेत दुरुन खडखडत येणारा लाल डबा उरला!   

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: