त्या काही क्षणांसाठी तुला परत यावं लागेल,
द्यावं लागेल त्याच काही क्षणांना माझ्या अोंजळीत
रमावं लागेल नव्यानं त्याच मागच्या अाळीत
घुटमळावं लागेल माझ्या घरासमोर
व्हावं लागेल परत एकदा वेडं पिसं पोर
नजर चोरुन आमच्या गच्चीत टक लावणारं
येरझाऱ्या घालत आकडे मोजणारं
होणारं घराचा माळी अाणि चाळीमध्ये सगळ्याची नजर वेधणारं
मी संसार मांडला म्हणून काय झालं?
तू संसार मांडलास म्हणून काय झालं?
गेले ते फक्त दिवस, दिवसाबरोबर इतर
तू मी गेलो का? थांबलोच ना एकमेकांच्या खातर?
सरकलो असू जरासे लांब, म्हटलो ही नसू जरा थांब
पण आजही त्या दगडापाशी जीव तुझा रेंगाळतो
अाजही त्या झाडाखाली तोच सुगंध दरवळतो
चित्र सुद्धा तीच उमटतात तिथल्या आकाशात
फक्त म्हणायला म्हणायचं आता उरलं नाही काही कशात
पण आरशात मला बघताना एका कोपऱ्यात मात्र डोकावतोस
थांबून भिंतीआडून माझ्या मुंडावळ्या न्याहाळतोस
म्हणून म्हणते एक तरी पत्र लिहावं लागेल
त्यात थेट विषय ‘आठवण’ म्हणावं लागेल
टाकावं लागेल तुला पत्त्यावर घराच्या किंवा मनाच्या
पण नुसतं डोळ्यांनी नाही यावेळी शब्दांनी बोलावं लागेल
लागेल विचारावं मी कशी आहे, कोणाची अाहे
आणि मग वर्ष वर्ष थांबावं लागेल,
मला ही पटकन कसे फुटतील शब्द जरा उत्तरांना हुडकावं लागेल
तरीही सांगेन मी, कटू असो तरी खरं
जुळवाजुळव वाक्यांची नव्यानी करत
चेहऱ्यावर हसून आतल्या आत मरत…
त्या वाक्यांनी होणार नाही कदाचित कविता
लय नसेल वलय नसेल पण प्रयत्न करेन एकदा
कंप मात्र ह्या देहाचा त्या देहाला असेल
पण फक्त गोड एेकायला तुला परत यावं लागेल
काहीही मागण्याआधी भरभरुन द्यावं लागेल
त्या प्रत्येक दगडापाशी हाताला धरुन न्यावं लागेल
त्या झाडावरच्या आकाशाचं मळभ पुसावं लागेल
निमित्त काढ कुठलंही पण माझ्यापर्यंत पोहचण्यासाठी
त्या प्रत्येक वाटेला पुन्ह्यानं कापावं लागेल
माझ्यासाठी किंवा त्याकाही क्षणांसाठी…
परत यावं तर लागेल…