नंदिनीनी बेडवर अंग टाकलं खरं पण डोळयासमोर तो धावत जाणारा प्लॅटफॉर्म आणि बुरख्यात जिने चढणारी ती आकृती काही जाईना! एका मागून एक पावलं पडत होती. शांतपणे…जसं की घरी जायची घाईच नसावी. पश्मीना तिचा बुरखा एका हातात धरुन दमलेल्या शरिरानं फक्त पुढे सरकत होती. रस्ता जसं काही रोजचाच होता. रेल्वे थांबली तसं पश्मीनाचं हसू ही विरलं होतं. मगाशी एक वेगळंच स्वप्न असावं डोळ्यासमोर आणि आता एक वेगळंच सत्य. कसं असतं नां? बाहेरची परिस्थिती, आजूबाजूचा परिसर अनेकदा तोच असतो. आपल्याकडे बघणाऱ्याला अनेकदा सगळं एकाच लयीतलं वाटत असतं, पण कोणजाणे समोरच्याच्या मनात कोणता समुद्र ढवळून निघत असावा. नंदिनीच्या मनात पश्मीनाचं सारं आयुष्य ढवळत असताना, पश्मीनाला तिच्याकडे बघायला फुरसत ही झाली नाही. आपल्या आयुष्याच्या चौकटीतून वेळ काढून आजूबाजूला बघायला नंदिनीकडे वेळ असेल कदाचित. पण पश्मीनाकडे विसाव्याचा केवळ तेवढाच, लोकलमधला वेळ असेल तर? स्टेशनला वेस्ट वरुन इस्टला उतरल्यावर, कोणी एक पुरुष जुनीशी स्कूटर घेऊन समोर थांबला होता. त्यानं स्टेशनकडे वळूनही बघितलं नाही. तो त्याच्याच तंद्रीत. पश्मीना मात्र त्याच्या मागे जाऊन बसली. स्कूटर सुरु झाली. दोघे एकमेकांशी बोलले ही नाहीत. डोळ्यावरच्या लायनरला तरी त्यानं योग्य तो मान द्यायला हवाच होता, नाही का? कोणजाणे तिनं ते कोणासाठी लावलं होतं? तो कधीच बघत नाही, म्हणून लक्ष वेधायला? की दोघं एकाच गाडीवर बसलेले असताना इतके स्वतंत्र होते की एका आरशात बघताना ती स्वतःला तिच्याच नजरेतून बघू लागली होती?

एका मावळणाऱ्या मळक्याशा मार्केटपाशी गाडी थांबली. मागे बसल्या बसल्याच तिनं एक कोंबडं विकत घेतलं. स्कूटर पुन्हा सुरु झाली. आताही वारा तसाच आपटत होता, आताही केस तसेच उडत होते, पण हसू मात्र नव्हतं. एका संथ नजरेसमोरुन काहीशी वास्तवाची चित्र सरकत गेली. नंदिनीच्या नजरेसमोरुन पश्मीनाचं स्वप्नवत आयुष्य सरकलं असावं तशीच!

ब्रेक लागला तशी गाडी तिरकी झाली आणि नकळत पश्मीनाचा पार्श्वभाग त्या स्कूटरवरुन, सिल्कच्या बुरख्याच्या मदतीनं घसरला. तिची तंद्री मोडलीच नाही. मोडलीच नाही किंवा लागलीच नव्हती. ती सरळ चालायला लागली. एका घराकडे तिची पावलं पडत होती. घर जरासं पडकंच होतं. दार वाजवून त्या पडक्या घरात दोघं शिरले आणि आतला माहोल काहीसा वेगळाच होता. सुंदर, टापटीप लावलेलं घर. सजवलेलं म्हणावं असंच. जाळीचे पांढरे शुभ्र पडदे. पश्मीनानं चेहर्‍यावरचा उत्सुकतेचा बुरखा बाजूला केला. ती त्या घरातल्या शुभ्र पडद्यांपेक्षा गोरी, वेलवेटच्या टेबलक्लॉथ पेक्षा मऊ आणि कोपर्‍यातील सुबक मूर्तीपेक्षा रेखीव होती. तिनं चप्पल काढली तशी एक बाई लगबगीनं येऊन तिच्या हातात एक मूल ठेऊन गेली. ते रडत होतं. त्याला शांत करतच ती स्वयंपाक घरात गेली. पाण्याचा ग्लास भरला. कसरत करत तो बाहेरच्या खोलीत, त्या स्कूटरवाल्याला दिला. मूल हातावर लोंबकळतच होतं. एकही सेकंद न बसता तिनं कोंबडं हातात घेतलं. तोंडानं पोराशी बोलायची टकळी अखंड चालू होती.

नंदिनीला मात्र आतून तिची मंजुळा आवरत असलेल्या भांड्यांचे आवाज येत होते. नवरा तिच्या पायाशी बसून तिला कुरवाळत बोलायचा प्रयत्न करत होता. सात गाद्यांखालचा वाटाणा शोधत नंदिनीची मिनिटामागून मिनिटं चालली होती. “तुला माहितीये? आज मला फार लो वाटतंय. मी लूजर असल्यासारखं…” एकदाचा नंदिनीनी विषय काढलाच. नवऱ्याच्या चेहऱ्यावर मात्र लगेचच अपराधीपणाची भावना आली. “मी तुला, तुला हवा तसा सपोर्ट करत नाही का?” निरुत्तर. अर्धेवेळा आपण न केलेल्या कामाचं खापर, काम न करु देणाऱ्यावर फोडता येतं. पण नवरा असा समजुतदार असेल, तर मग पंचाईत होते. “मला नाही माहित काय चुकतंय, पण काहीतरी मिसिंग आहे. मी पुरेशी धाडसी नाहीये का?” नवरा आता मात्र चक्रावला. “म्हणजे काय करायचंय तुला?” नंदिनीचे प्रश्न सुटत जाण्याऐवजी ते वाढत चालले होते. “माझं आयुष्य फारच सोपं आहे…” आता मात्र त्याला हसू यायला लागलं. “अगं आयुष्य सोपं करणं फार कठीण असतं.” नंदिनी गप्प कूस पालटून पडून राहिली. तिला कदाचित सांगता येत नव्हतं, तिला काय म्हणायचंय. पण बसलेला घाव गहिरा होता.

पश्मीनाचा स्वयंपाक झाला होता. सगळे गोल करुन एका परातीत खात होते. कोण मध्यमवयीन मुलगा त्याची वेगळी परात घेऊन टीव्ही समोर बसला होता. स्कूटरवाला पश्मीनाकडे आशेनी बघत होता. ती एकदाची उत्तरली. “हा. दे दिया!”… त्याला हायसं वाटलं. त्यानं हाक मारुन त्या मध्यमवयीन मुलाला खरकट्या हातानीच १०० रुपयांची नोट दिली. “मम्मी कल से काम पर नही जाएगी.” त्या मुलाला फक्त पैशात इंटरेस्ट होता. तो बाप नावाचा पुरुष गडगडाटी हसला. पश्मीनाचं वय तिच्या नवर्‍यापेक्षा तिच्या मुलाला जास्त खुलून दिसत होतं. एकतर ती गरजेपेक्षा जास्त सुंदर होती किंवा नवरा अति रापला, राबला आणि रोड होता. मुलानं रस्सा वाढून घेतला. नवर्‍यानं बाळाचा गालगुच्चा घेतला आणि पश्मीनानं डोळा टिपला. तिघांना एकमेकांच्या भावना समजतील असं चित्र नव्हतं. परत एकदा गडगडाटी हास्य झालं. “अच्छा है! तुम आझाद हो गयी!”. पश्मीना यावर उत्तर देईल असं वाटलंही नव्हतं.

सगळी भांडी गोळा करुन ती किचनमध्ये गेली तेव्हा हातात बाळ देणारी बाई जणू पश्मीनाची वाट बघतच थांबली होती. “दीदी कैसा लगता है बाहर जाकर?” पश्मीना हसली, “घर मे बैठके लगता है, उससे बेहतर”… मुलीचा चेहरा उत्सुक होता.

नंदिनीचा डोळा अजून लागला नव्हता. नवरा तिच्या पाठीकडे चेहरा करुन पडला होता. “मला माहितीये, नंदू तू जागी आहेस!” नंदिनीच्या डोळ्यात पाणी होतं. फक्त ते बाहेर न पडू देता तिला सावरता येत होतं. “झोप आता. उद्यापासून जास्त काम, जास्त जबाबदार्‍या आणि कमी सुट्टया! अडकलीस तू!” नंदिनीच्या चेहर्‍यावरची माशी हलली ही नाही.

शेवटची ट्रीप पूर्ण करुन खडखडणारी लोकल, लेडीज डब्याच्या अनेक बायकांना सोडून शेवटच्या स्टेशनात विसावली होती. घराबाहेर पहाटे निघणारी, रात्री उशीरानं येणारी, दमून जाणारी…. ‘ती’ दोन लांबच्या स्टेशनात बंदिस्त धावणारी स्वतंत्र लोकल!

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: