नंदिनीचा जन्म सातार्‍यातला. शिक्षण पुण्यातलं आणि आता नोकरी मुंबईत. बदललेल्या शहराप्रमाणे नंदिनीची विचारसरणीही बदलत गेली. आई बाबा मात्र सातार्‍यातच राहिले आणि सातार्‍यातलेच राहिले. आज नंदिनीचं प्रमोशन झालं होतं. २४ जणांच्या टीमची ती लीड म्हणून काम करणार होती. त्यात तिचा आदर करणारे पुरुष आणि मेल इगो मनात धरुन बसलेले अपुरुष सुद्धा होते. दहा वर्षांपूर्वी अगदी साध्या पोस्ट पासून तिनं सुरुवात केली होती. खूप लांबचा प्रवास होता हा. न कंटाळता आणि न सोडून देता, तिनं जिद्दीनं पार पाडला होता. त्याचीच आज सेलिब्रेशन पार्टी होती. होस्ट असल्यामुळे तिला पार्टी संपवून, सगळ्यांचा निरोप घेऊनच बाहेर पडता येणार होतं. तितकच हे ही साहजिक होतं की आईचे सातार्‍यात बसून एव्हाना १५ फोन येणार. तसे ते आले ही. पण दुर्लक्ष करत ११.१५ वाजता नंदिनी पार्टी संपवून बाहेर पडली. ११.१५ म्हणजे मुंबईमध्ये कित्ती लवकर, याची आईला कल्पना नव्हती. नंदिनी निघाली तेव्हा इतर अनेक मुली कॅब्स बोलावून निघाल्या. पण नंदिनीला तशी परवानगी नव्हती. त्यामुळे ती सरळ लोकलने निघाली. कॅबवर आईचा मुळीच विश्वास नव्हता. पगार कितीही वाढला तरी रात्रीच्या वेळी शासनाच्याच सुविधांचा लाभ घ्यायचा हे पक्कं होतं. परवडलं तरी फर्स्ट क्लासचं तिकीट काढायचं नाही. कारण सेकंड क्लास सारखी त्या डब्यांत वर्दळ नसते. पगारवाढीनंतर ऐटीत कारमध्ये बसून जाण्याएेवजी नंदिनी लोकलचे ब्रिज चढत होती. वाटेत आईचे फोन चालूच होते. एकटीच आहेस का? स्टेशनवर गर्दी आहे का? लोकल मध्ये बायका आहेत का? ऐन वेळेला कोणी आलं तर प्रतिकार करता येईल का? वगैरे वगैरे… सगळं ठीक आहे असं परत परत नंदिनी बजावत राहिली आणि आईनी फोन ठेऊन दिला. नंदिनीला आईच्या फोनची मनापासून कटकट होऊ लागली होती. आईच्या शब्दाबाहेर जायचं नाही. ती लांब आहे, तिच्या काळजीचा कायम मान राखायचा असं ठरवूनच ती मुंबईत आली होती. पण आईची काळजी कमी होण्याऐवजी वाढतच गेली. नंदिनीवर लांब बसून आईनं रिमोटनं कंट्रोल ठेवला होता. पण नंदिनी तरीही आईचं ऐकत राहिली. कारण आईला व्यवहार चांगलाच कळत होता. सातार्‍याच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकवते ती. फार मान आहे सातार्‍यात आईला. फोन ठेऊन तीन मिनिटं झाली असावीत. नंदिनीला रिकामं रिकामं वाटायला लागलं. खरं म्हणजे लोकलला गर्दी नव्हती. तिच्याच डब्यात बायका कमी होत्या की संपूर्ण ट्रेन मध्येच, हे माहित नव्हतं. गरगर फिरणारे पंखे, हेलकावणारी गाडी, अधेमधे लुकलुकणारे दिवे आणि अखंड चालू असलेली डब्यातील टेप. फक्त इतकीच अमानवी संगत होती. मानवी म्हणाल तर, एका बाईला बाहेर बघता बघता झोप लागलेली आणि एक वस्तू विकणारी, तिच्या घरी निघालेली. या दोनच बायका नंदिनीच्या साथीला होत्या. माणसांचं असं असतं की पूर्णपणे नसतील तर भीती वाटते आणि असतील तरीही भीती वाटते. बांद्रा आलं. दिवसभर ढकलाढकली करणार्‍या माणसांचे ढीग मालवले होते. कोणीही आलं नाही. कोणीही गेलं नाही. रेल्वेची खडखड आणि नंदिनीच्या मनातील धडधड मात्र वाढली. गार वारा सुटला होता. कंपनीचे कोटींचे निर्णय घेणारी नंदिनी अंग आकसून बसली होती. स्टेशन यायचं, गाडी थांबायची, शुकशुकाट… आणि मग परत एकदा वेग… असं चक्र सुरुच होतं. माहिम आलं. लोकल थांबली. झोपेलेली बाई एकदम जागी होऊन उतरुन गेली. सोबत कमी झाली. ट्रेन सुटणार इतक्यात, बायकांचा एक गृप आत शिरला. नंदिनीला जरा हायसं वाटलं. आत आल्यावर त्या कोणीच एकमेकींशी बोलल्या नाहीत. मैत्रिणी नसाव्यात. योगायोगानं एका स्टेशनवर चढल्या असाव्यात फक्त. नंदिनीच्या डोक्यात त्यांना एकत्र बांधणारी एकच गोष्ट होती. त्यांचा पोशाख. या चारही मुली किंवा बायका बुरखेधारी होत्या. प्रत्येकीने एकेक कोपरा गाठला. कोणी दारातच वार्‍याशी हितगुज करत, कोणी दिवसभराची आखडलेली पाठ ताठ करत. नंदिनीच्या समोर त्यातली एक विसावली. त्या मुलीचे डोळे फारच लक्षवेधक होते. तिच्या हालचालीत एक आत्मविश्वास होता आणि मान वळवण्यात एक खास रुबाब होता. निवांतपणे तिने कानात इयरफोन्स घालून कसलासा सिनेमा लावला. ती दर सेकंदाला कोणतं स्टेशन आलं?, बघत नव्हती. बाहेरचे आवाज न आल्याने गोंधळली नव्हती. सरळ सरळ संपूर्ण डब्याकडे पाठ करुन बसण्याचं तिच्यात धाडस होतं. नंदिनीचा फोन वाजला, त्यावर मेसेज आला. “नंदिनी, एका गावातून येऊन तू आज या पोस्ट पर्यंत पोहोचलीस. तू खरंच धाडसी आहेस.” बाजूचं बटन दाबून फोनचा स्क्रीन बंद करुन टाकला. खरं धाडस हे समोर बसलेल्या बुरख्यामागे होतं.

दर्शनीय होती ती, हातांची नखं… टापटीप नेलपेंट लावलेली. गोरी गोरी बोटं आणि अगदी लुसलुशीत हात. डोळ्यावर सुरमा तर ऐटीत सजला होताच पण रेखीव अशी एक लायनरची लकीर डोळ्यावरुन वाहत, कोनाड्यात एक हलका पाय मुडपून खालच्या पापण्यांकडे वाकून बघत होती. पायात छोट्याशा उंचीचं हील होतं आणि बाकी चप्पल हिच्याच सारखी सुबक होती. किती कमवत असेल ही? शिक्षण किती असेल? एकटक पाहणार्‍या नंदिनीच्या चेहर्‍यावर हा प्रश्न स्पष्टपणे उभा होता. उत्तर मात्र नव्हतं. पर्स तशी साधीच होती. ड्रेस दिसतंच नव्हता पण मन मात्र स्वैर असणार हिचं. स्वातंत्र्य पायाशी लोळत असणार. या बुरखेवालीनं मन जिंकलं होतं. नंदिनीतही आता काहीसं संचारलं. मगाशी आकसून घेतलेलं अंग तिनं मोकळं सोडलं. पाठीचा कणा ताठ  झाला. जसं काही प्रत्येक संकटात ही नंदिनीला वाचवणारच होती. इतका वेळ वाटणारे विजयी भाव आता विरुन हरल्याची भावना येऊ लागली होती. कणा उभाही होता आणि बसतही होता. पण कोण जाणे, अपयशाला कारणीभूत कोणाला धरायचं हा तिढा सुटला नव्हता. आजीनं घरगुती विणकामाचे क्लासेस घेतले. आईनं बाहेर पडून नोकरी केली. “मी काय करते आहे? जे आईनं केलं तेच? की त्यात फक्त रात्रीच्या पार्ट्यांची भर पडली आहे?” नंदिनीचं डोकं भंडावलं होतं, नजर बुरखेवालीला वाचत होती. हिनं तेच केलं असेल का? जे तिची आई करते आहे? माझं प्रमोशन म्हणजे माझी प्रगती की माझी उडी म्हणजे माझी प्रगती? नंदिनीच्या चेहर्‍यावर वारा आपटत होता.

फोन वाजला, परत एकदा आई होती. आता मात्र नंदिनीला हा फोन अजिबात पटला नव्हता. आईमुळेच आपण आयुष्यात मागे पडलोय, हे तिचं जवळजवळ ठरलं होतं. फोन उचलला. आईचा तोच प्रश्न- कुठे पोहोचलीस? नंदिनीचं तेच उत्तर. मग डब्यातल्या लोकांची तीच गोळाबेरीज. नंदिनीचा आवाज खमका होता. आईच्या प्रश्नांना तिनं खडसावून परतून लावलं होतं. एक मोठा वाद झाला. नेहमीचाच. ‘जीवाला घोर वगैरे’. नंदिनीचं दुर्लक्ष! दादर आलं. ती सुबक बुरख्यामागची आकृती उभी राहिली. नंदिनीनं रागातच फोन ठेवला. जाळीच्या पडद्यामागचे डोळे पसरले, नंदिनीला कळलं की ‘ती’ हसली. “मां?” नंदिनी फक्त मान डोलावून ‘हो’ म्हणाली. “मां से भी कोई एेसे बात करता है?” गाडी थांबली तशी ती उतरुन गेली. आईनं रागात फोन ठेवला आणि ही ढाल उतरुन गेली. वर निघताना दोघीही झिडकारुन गेल्या. परत एकटेपण आलं. सगळं स्टेशन डोळ्यासमोर खसकन् खेचून घेत रिकाम्या डब्यानं आणि नंदिनीच्या ठोक्यांनी वेग घेतला होता. ती सावकाश तिच्या बुरखा गृपबरोबर पायर्‍या चढत गेली. मनानं नंदिनीला तिच्या शरीरात, तिच्या आयुष्यात शिरायचं होतं. “माझ्या घरातली वीज कायमची गेल्याशिवाय मी बोर्डात येऊ शकणार नाही” हा विचार नंदिनीच्या कपाळावर आदळला…

घरी मंजुळानं डायनिंग टेबल सजवलं होतं, जेवण वाढलं होतं, नवरा हातात बुके घेऊन उभा होता. नंदिनीच्या आईचं बाळ घरी पोहोचलं होतं. घरी, या बाळाची २ मुलं आणि एक नवरारुपी तिसरं मूल वाट बघत थांबलं होतं. त्यांच्याबरोबर हसत खिदळत घरचा अध्याय पार पाडायचा होता. तिच्या विजयाचा त्यांना अभिमान होता आणि तिला मात्र हारुन घरी आल्यासारखं वाटत होतं. तीन मुलांना सांभाळायच्या सदर्‍यात नंदिनीला शिरावंं लागणार होतं, पर्याय नव्हता. So called ‘open minded’ घरात जन्म घेऊनही तिला आज बंधनं वाटत होती. झालेलं शिक्षण अपुरं आणि मिळालेला मान अपुरा वाटत होता. त्या बुरख्यामागच्या मुलीत नक्की किती दम होता, कोण जाणे? पण त्या बुरख्यात मात्र बरंच धाडस होतं!

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

One Comment on “बुरख्यामागचं धाडस – १

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: