निद्रावस्थेतील दुपार. आवाज फक्त कढईत झारा आपटल्याचा. घामाच्या धारा लागल्या तरी पल्लवी नेटानी काम करत होती. एकटं वाटत होतं. रडू येत होतं. आईची खूप आठवण आणि सासूचा खूप राग येत होता. कढईतल्या चिवड्याला सगळीकडे फोडणी नीटशी लागत नव्हती. अंदाजापेक्षा तेल जरा कमीच झालं होतं. पण घेतला वसा टाकायचा तिचा स्वभाव नव्हता. भर दुपारी नवरा ऑफिसमध्ये असताना आणि घरी कोणीही नसताना हा वसा नेमका दिवाळीच्या फराळाचा आहे की आपल्या लग्नाचाच आहे या द्विधा मनस्थितीत ती होती. शेवटी फोडणी सगळीकडे लागली आणि तिनं चिवडा गार करायला ठेवला. आता पाळी शंकरपाळ्यांची!
आई भिजवायची तितकं घट्ट शंकरपाळ्याचं पीठ भिजलंय का? हा निर्णय कसा घ्यावा ते कळत नव्हतं. सासूबाईंच्या आईला ऍडमिट केल्यामुळे त्यांना नेमकं गावी जावं लागलं होतं. एकदाही फराळातलं काहीही विकत न आणणारी आणि अनारश्यापासून चिरोट्यापर्यंत सगळं घरी करणारी आदर्श आणि कर्तव्यदक्ष गृहिणी असा मुकुट सासूबाईंच्या डोक्यावर होता. त्यात पल्लवीचा पहिला दिवाळसण त्यामुळे घरी सगळ्यांना आमंत्रण. फराळ करता न आल्यानं सासूबाई हुप्प! त्यामुळे त्या घरी नसताना पल्लवीनं काहीच न करणं म्हणजे फारच वाईट. आईनी सरळ सगळं विकत आणायला सांगितलं. एखादा पदार्थ करणं आणि सगळा गडच स्वतः लढणं यातला फरक आईला चांगला माहित होता. पण पल्लवीला गड जिंकायचाच होता आणि तो ही एकटीनं. तिनं त्या जशा कशा पिठाचे शंकरपाळे लाटायला घेतले.
ऑफिसमधून सुट्टी फक्त दीड दिवसाची मिळाली होती. त्यामुळे जे काही ते या दीड दिवसांत. पुस्तकात बघून यादी करुन सगळं सामान आणण्यात सकाळ निघून गेली. लग्न दिवाळीत ठरल्यामुळे भेटायला येताना सगळा फराळ सासूबाई घेऊन आल्या होत्या. तेव्हा आईने, मावशीने त्यांचं खूप कौतुक केलं होतं. त्यायादी प्रमाणे दोन प्रकारचे लाडू, चिवडा, चकली, शेव, खारी आणि गोड शंकरपाळी, करंजी, कडबोळी, अनारसे आणि चिरोटे असा बेत होता.
दिवसभरात फक्त १० मिनिटं स्वयंपाकघरात वावरणारी पल्लवी दोन दिवस गॅससमोर उभी राहून जन्म तिकडेच गेल्यासारखी वावरु लागली. करंज्या, बेसनालाडू आणि चिवड्याला टीकमार्क झाली होती. सगळे डबे कपाटात गेले होते. नवऱ्याला कळलं असतं तर त्यानं सगळं ऑर्डर केलं असतं नाहीतर फस्त केलं असतं म्हणून. कंबरडं मोडलं होतं. वरणभातावर भागवून ती आडवी झाली. त्याला तिच्याशी बोलायचं होतं पण पल्लवीच्या घोरण्यानं सूर धरला होता. तळणीच्या वासानं सुजत चाललेला पल्लवीचा घसा मोक्ष मागत होता. स्वप्नात मात्र रटरट उकळणाऱ्या तेलात शेव नाचत होती आणि रग लागलेल्या बोटांकडे बघून सोऱ्यातून बाहेर येणारी चकली उसासे टाकत होती.
दुसरा दिवसही पार पडला. चकली आणि शेवेची त्यात भर पडली. घशाला बरं वाटावं म्हणून आल्याच्या चहानी ४ वेळा गॅस आडवला. अनारसे, चिरोट्याच्या साहित्याला पल्लवीनी मागच्या कपाटात आत आत ढकलून दिलं. दिवाळसणाच्या साडीवरची ज्वेलरी, टिकली, लिपस्टिक यातलं काहीच तिच्या डोक्यात नव्हतं. माळ्यावरुन लायटिंगच्या माळा बाहेर आल्या. नवऱ्याचं स्वागत दारातल्या कंदिलानं आणि लायटिंगच्या माळांनी झालं. तळणीतलं तेल आता बाहेरच्या पणतीत गेलं होतं आणि स्वयंपाकाला पूर्णविराम लागला होता. डायनिंग टेबल रिकामं बघून त्याला शंका आली पण पाठोपाठ वाजलेल्या बेलमागून सासू-सासरे आणि जेवणाचा डबा आला. कोणी तिला काहीही म्हटलं नाही. सगळे दमले होते. जेवण करुन ४ चा आलार्म लावून सगळे झोपी गेले. सासूबाईंच्या चेहऱ्यावर ओस पडलेल्या स्वयंपाकघराची खंत होती.
पहाटेच्या पणत्या, उटण्याची आंघोळ, गणपतीचं दर्शन झाल्यावर सगळी मंडळी फराळाला आली. पॉटलक लंच सारखे सगळ्यांनी वेगवेगळे पदार्थ आणले होते. पल्लवीच्या पहिल्या दिवाळसणाला तिची साडी, तिचं असणं आणि तिचा संसार यापेक्षा सासूबाईंचा यावर्षी हुकलेला सुगरण मुकुट हा विषय रंगत होता. त्या नाराजीनं जावेनं केलेली शंकरपाळी चिवडत असताना एका ट्रे मधून घरचा फराळ बाहेर आला. लोकं अवाक झाली. पल्लवीच्या आईच्या चेहऱ्यावर शंका होती. पट्टी पेन्सिलनं आखल्यासारखा विकतचा फराळ दिसत नव्हता पण त्या ठेंगण्या शंकरपाळ्यांना आणि लंब चकल्यांना त्यांची अशी एक शान होती. करंज्या बसल्या तरी ऐटीत होत्या. आईनं चकलीचा घास घेतला आणि कुडुम्कन् झालेल्या आवाजानी हशा पिकला. पल्लवीही त्यात सामील झाली. सासूबाईंचं सुतक सुटलं. मिसवर्ल्ड कसा मुकुट स्विकारताना तोंडावर हात दाबते तसेच हात ठेवत त्यांच्या डोळ्याचे कोपरे ओले झाले. विषय पल्लवी, तिची साडी, संसार यावर आला. हे उपरं घर तिचं झालं होतं आणि लोकं इथे पाहुणे होते. गड जिंकला होता, पताका फडकली होती.