फोन वर आजकाल सगळ्याला “हो” म्हणतोस! जेवलास का?, झोपलास का? “हो!” दमलास का? थकतोस का? तर उत्तर “नाही”. सगळं कसं अलबेल असतं. कधीच तुला काही दुखत नाही. कधीच तुला काही खुपत नाही. पण असं नसतं रे बाळा. तुझ्या पेक्षा जास्त पावसाळे तर बघितलेच आहेत मी पण त्यातले कित्येक पावसाळे तुला कडेवर घेऊन बघितले आहेत. तुला पाऊस सहन होत नाही. लगेच सर्दी होते. त्यावर माझ्या हातचा आल्याचा चहा हा एकच उपाय आहे. तुला हिवाळा बाधतो. नाक चोंदतं. तेव्हा तुझ्या वाफाऱ्यात काय चुरुन घालायचं हे कुठे ठाऊक आहे तुला? मी देते ते डोळे झाकून पितोस ना? इतक्या वर्षात त्याची रेसिपी मला विचारली नाहीस तू. मग सांग सगळं अलबेल कसं असेल? कसं असेल सगळं छान! तुझं मन कळतं मला. आईला त्रास नको म्हणून तू बिचारा माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवतोस पण ते नक्की लपतं का? तू बोललेलं खोटं माझ्यापर्यंत खोटं म्हणूनच येतं का रे?  तू लपवतो आहेस याची जाणीव जास्त त्रासदायक नाही का? ऑफिसमध्ये होणारा त्रास मला सांगत नाहीस. अंगावर काढतोस. इतका मोठा झालास का रे की माझ्या कुशीत येऊन तुला मुटकुळं करुन बसावसं वाटत नाही? लोकं म्हणे तुला उगाच टारगेट करतात. तेव्हा तुला माझ्या पदराचा मऊ स्पर्श आणि त्याला येणारे स्वयंपाकाचे वास कसे आठवत नाहीत तेच मला आता समजेनासं झालंय. सेफटीपीन लागली तरी माझ्यापाशी येणाऱ्या तुला बायकोचं अॅबोर्शन माझ्यापासून लपवण्याची ताकद कुठून येते हे मला जाणून घ्यायचंय. की तिचे त्रास तुला तुझे म्हणून लागू होत नाहीत? माझ्यासमोर तिचा कैवारी म्हणून छाती पुढे काढून उभं राहताना तर तसं जाणवलं नाही कधी! पहिल्यांदा कधी लांब गेलास सोन्या? वयात आलास तेव्हा? की मला सोन्या म्हणू नकोस आता म्हणालास तेव्हा! मी काय करत होते रे? तू लांब जाताना तर तुझ्याकडे पाहत नव्हते मी! माझं तुझ्याकडे अनेक वर्षात लक्षच गेलं नाही का? की तुझ्यावर माझी आवड लादत मी फक्त थालिपीठंच थापत राहिले? तुला नोकरीसाठी धडपड करावी लागली तेव्हा मी फक्त पोळ्या लाटल्या का? की आमटी गरम केली? तुझं मन सावरायला नव्हते का रे मी? अर्थात तुला अनेक मैत्रिणी होत्या, ज्यांनी यात तुला मदत केली. पाठीशी उभ्या राहिल्या पण मी त्यांच्यापैकी एक न होता, त्यांना चहा करुन देणारी कशी झाले रे? “आई यु आर माय बेस्ट फ्रेंड” हे मुलगा आपल्या आईला, त्याला इतर मुली पटेपर्यंतच म्हणत असेल का? कसं माहित नाही पण मी तुझ्या बाबांची खूप जवळची मैत्रीण होते रे. सगळं समजून घेणारी. इतर कोणाही मुलीला जे समजायचं नाही, ते समजून घेणारी. सगळ्यांना हवीहवीशी वाटणारी. मग मी आई झाले आणि एका मागच्या पिढीत जाऊन बसले का रे? बाळा तुझा प्रत्येक स्पर्श मला बरंच काही सांगून जातो. तुझा आवाज मला बरंच काही देऊन जातो. तुझं माझ्या डोळ्यासमोर असणं मला जगणं देतं. असं मुळीच समजू नकोस की तुझ्याशिवाय मला जगता येणार नाही. तू येण्याआधी मला एक वेगळं आयुष्य होतचं. इतकं होतं की त्यासाठी काही जण मुलं जन्माला घालणं टाळतात. मी एक स्वतःच्या पायावर उभी असणारी, स्वतंत्र विचारांची एक कमवती मुलगी होते. सत्तावीस वर्ष जगले मी त्याआधी आणि तो काळ खूप आनंदी होता. मग तू आलास, माझं आयुष्य अजूनच आनंदी केलंस. मी ही केलं तुझं. विसरु नकोस कधी. तुला स्पेस देणं वगैरे खूप सोपं आहे. पण तुझे विचार बाजूला सारुन मी माझ्या कामांसाठी, माझ्या आवडीनिवडींसाठी स्पेस तयार करणं किती अवघड आहे याचा विचार कर आधी. मी तुझ्या मागे मागे करते अस तुझं म्हणणं असायचं कायम, हो रे.. मी करायचे मागे मागे. पण मुळात त्याचा तुला कधी आनंद, फायदा किंवा मदत झाली नाही का? लांब जाणं आहे मला शक्य पण ते मला जितकं कठीण आहे, तितकंच तुला नाहीये का? बाळा, सगळं अलबेल आहे म्हणून मला दूर नको सारुस. एकटा पडशील. तुझ़्या प्रत्येक हाकेला ओ द्यायला मी आहेच. कायमच असेन. पण इतकं सांग मला की तुझा त्रास लपवण्याएवढा तू मोठा कधी झालास? आईला हे सहन होणार नाही, ते सहन होणार नाही हे ठरवण्याएवढी आई लहान कधी झाली आणि आईची सहनशक्ती तोलण्याएवढा तू विद्वान कधी झालास बाळा? तू न मारलेल्या हाका आईला ऐकू येत नसतील हे सांगून स्वतःला फसवणारा तू कधी झालास बाळा?

नियतीनी पत्राची घडी घातली आणि ते उशी खाली ठेवलं. मग काही क्षणांनी ते काढून गादीखाली ठेवलं आणि मग कायमसाठी ते मनातच ठेवलं. मोठ्या मुलाला पत्र वगैरे आवडतील का नाही याची तिला खात्री नव्हती. बेल वाजली. मुलाबद्दल इतर कोणतीही भावना मनात आली तरी त्यावर आईचं प्रेमच जिंकतं. या नियमाला धरुन नियतीनं दार उघडलं. जेवण गरम करुन मुलासमोर ताट वाढलं. तो जेवला. सगळं तसंच अलबेल होतं. तो झोपायला गेला. ती झोपायला आली. तिनं त्याच्या बाबांनाही सांगितलं की सगळं अलबेल आहे. ते ही झोपले. नियतीच्या डोळ्याला डोळा लागेना. शेवटी गालीखालचं पत्र तिनं उचलून कपटातल्या एका खोक्यात कोंबलं. त्यात जागा नव्हती. मनासारखंच त्यातही खूप काही साचलं होतं. कपाटाचं दार बंद झालं आणि सात गाद्यांखालचा वाटाणा पलंगाखालून मनातल्या मनात टोचू लागला. तिनं डोळे बंद केलं. वादळ बंद झालं. वादळ दिसणं बंद झालं. 

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

2 Comment on “एवढा मोठा झालास बाळा?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: