एक झिजलेली चप्पल, जुनाट, विरलेली, वापरलेली
ऐटीत एका मंदिराच्या पायरीवर तिच्या मालकीणीची वाट बघणारी
तिच्या शेजारी दुसरी, झिजलेली, विरलेली, वापरलेली आणि जुनाट ही
ऐटीत त्याच पायरीवर तिच्या मालकाची वाट बघणारी
सुस्तावलेल्या दोघी. झाडाच्या सावलीत थंडगार दगडी पायरीवर वामकुक्षी करणाऱ्या
नुकत्याच कोणाच्या धक्क्यानी कुस पालटून भानावर येणाऱ्या
कोपऱ्यावरचा चहा घ्यायला सज्ज झालेल्या
एकमेकींशी मारत होत्या गप्पा
आपली पिढी कशी मागे पडलीये हा घाव जिव्हारी घेऊन
म्हणत होत्या हल्लीच्या तरुण सॅंडल्स आल्या शेजारी बसत नाहीत
त्यांची वाट आता इकडे वाकडी होत नाही
झालीच तर येतात आणि मान वळवून हसण्याआधीच निघून जातात
त्या नवीन बाई, त्यांच्या पायाला भिंगरी
त्यांना झरझर जाता येतं, त्यांना असते नोकरी
बसमध्ये धकके खात येतं चढता, चुकली तर मैलोनमैल येतं चालता
आपल्या सारखं नाही, बाहेर पडायला दुपारची वाट बघायची
डुलत डुलत प्रत्येक वळणाची रोज उजळणी करायची
गजरा बघून दारात आता कशाला म्हणायचं
काटकसरीच्या पैशातून एक ताट विकत घ्यायचं
देवासमोर नारळ फोडायचा पण खोबरं गुंडाळून घ्यायचं रुमालात
घरी जाऊन दात आलेल्या नातवाच्या ठेवायचं पुढ्यात
शोधायची आपली कवळी आणि प्रसाद म्हणून घ्यायचा कण
गर्दी खूप असते म्हणून घरातंच नमस्कार करत घालवायचे सण
पडून राहायचं रांगोळीच्या बाजूला आणि नव्या पिढीखाली चिरडत
कारण त्यांना असते ये जा वरचेवर. ते राहतात वरचे वर
आम्ही कधीकाळी मांडी घालून बसणारे खालचे खाली
मग सण झाला की परत गाठायची दुपार, यायचं मंदिरात
झाडाच्या खाली बसून गायचं जमेल तसं आपलाही आवाज मिसळायचा भजनात
बघायची मालकांची वाट आणि निघून जायचं कडेकडेनी
पण टिकून राहायचं मालकाच्या मनात.
एखाद खिळा, एखाद टाका अधेमधे सहन करायचा
अंगावर आदळलेला एखाद सॅंडल, एखाद हिल अधेमधे दुर्लक्षित करायचा.
सगळ्यात छोट्या अडगळीच्या कप्प्यात निमूटपणे बसून राहायचं
मासागणिक बदलणाऱ्या नवीन पिढीच्या मित्रांना आपला गौरव ऐकवत राहायचं
ते मग पटापट वरचेवर निघून जातात. आपण घरी बसून त्यांची वाट पाहत राहायचं!