“आजकाल सोशल मिडियावर गृहिणींचे अच्छे दिन आलेले आपण सगळेच बघतो आहोत. त्यांच्या कामाची कदर करावी, त्यांना योग्य ते महत्व मिळावं, असं अचानक सगळ्यांना वाटायला लागलंय. मग त्यासाठीचे मेसेजेस, उपदेश… किंवा घरातील इतरांना त्यांच्या कष्टांची जाणीव करुन देणारे व्हिडिओज याची मोठीच लाईन सध्या लागते. पण या अशा सोशल चळवळीनं खरंच काही फरक पडलाय का?” जोगळेकर मॅडम पोट तिडकीनं हे बोलत होत्या. वंदनाला मात्र जांभई आली. दुपारची झोप काढून एक चहा घेऊन ती कशीबशी डोळे चोळत जोगळेकर बाईंच्या पुढ्यात येऊन बसली होती. तिला शेजारच्या मंजुषानं आणि पद्मजानं जवळजवळ ओढत आणून बसवलं होतं. इतक्यात जोगळेकर बाईंनी वंदनाकडे बोट केलं आणि नाईलाजानं तिला उभं राहून यावरचं मत मांडावं लागलं. वंदना शाळेत कथाकथनात पहिली यायची. गोष्टी रंगवून सांगायची तिला भारी हौस. चार लोकांत बोलायला तर ती अजिबात घाबरायची नाही. त्यामुळे याबाबतचं आपलं भरघोस मत मांडून ती एकदम खाली बसली. अभिमानानं तिचा स्वतःचाच ऊर भरुन निघाला होता. मंजुषाकडे नजर टाकली, तर ती मात्र पडक्या चेहऱ्यानं वंदनाचं कौतुक करत होती. वंदनाच्या डोक्यात विचारचक्र सुरु झालं. “आपण प्रत्येकच बाबतीत मंजुषा आणि पद्मजापेक्षा उजवे आहोत म्हणून चेहरा पडला असणार” असा दीड सेकंदात निष्कर्षही निघाला. तो बरोबर आहे की चूक?, हे मात्र पडताळून पाहण्याची तिला गरज वाटली नाही.

वंदना, मंजुषा आणि पद्मजा ह्या तिघी घट्ट मैत्रिणी. शाळेबिळेतल्या नाहीत. सोसायटीतल्या. वेगवेळ्या स्वभावाच्या आणि वेगवेगळं घरातलं वातावरण असणाऱ्या. तिघींना जोडणारी एकच कॉमन बाब. गृहिणीपण. तिघींची मैत्री पण अशीच झालेली, आपापल्या मुलींना बससाठी ‘टाटा’ करताना ह्या रोज एकमेकींकडे बघून हसायच्या. एक दिवशी “आमच्याकडे तर याहून बेक्कार परिस्थिती” असं एकीनी दुसरीच्या कानात मोठ्यानं सांगितलं आणि मग काय झाली मैत्री! एक आंघोळ करुन आवरुन येणारी, एक कामाच्या रगाड्यात साडीचा पदर खोचून येणारी आणि एक तिच्या तलम गाऊनमध्ये, तिचे किलकिले डोळे मिचमिच करत येणारी. अनुक्रमे, मंजुषा, पद्मजा आणि वंदना! 

जसे नोकऱ्यांचे आणि नोकरदारांचे प्रकार असतात ना तसे गृहिणींचे पण प्रकार असतात बरका! म्हणजे वेळेवर येणारे, कामात चोख असणारे, बॉसच्या अपेक्षेपेक्षा सतत एक पाऊल पुढे असलेले नोकरदार. किंवा कसंबसं मस्टर गाठणारे, शिव्या खात आला दिवस ढकलणारे नोकरदार. आणि तिसरे म्हणजे बॉसच्या केबिन मध्ये अश्रू ढाळणारे, मग उरलंसुरलं पाणी आपल्या जागेवर येऊन ढाळणारे, आजूबाजूच्यांची मदत घेऊन दरमहा बॅंकेत पगार पडला की हुश्श करणारे नोकरदार. अगदी याच प्रकारात गृहिणीसुद्धा मोडतात.

एक असते संसारकलेत उपजत पारंगत असलेली. प्रत्येक पदार्थ रुचकरच होतो, किचनमधलं दूध आणि बंड्यानं आत चालू ठेवलेल्या पंख्याकडे एकाच वेळी लक्ष असतं, प्रत्येक कार्यक्रमासाठी सज्ज, स्वयंपाकाच्या अंदाजापासून ते पाहुण्यांच्या आदरातिथ्यापर्यंत कुठेही कमी न पडणारी, गृहकृत्यदक्ष गृहिणी- आमची मंजुषा! दुसरी असते सामान्य गृहिणी- नित्य नेमाने घरच्यांची काळजी करणारी. सगळ्यांपुढे आणि मागे धावताना कंबरडं मोडून घेणारी आणि चूक भूल देत घेत प्रामाणिकपणे संसार करणारी, तिला फार येतं अशातला भाग नाही, पण मुळात चिकाटी आणि शिकून घेण्याच्या वृत्तीवर सगळं जिंकणारी, सामान्य गृहिणी. आमची पद्मजा! आणि तिसरा प्रकार म्हणजे डॅंबिस गृहिणी- अर्थात वंदना! हिला काम येतं की नाही माहितच नाही, कारण ते कधी केलंच नाही. हे मला येतंच नाही आणि ते मला शक्यच नाही, असं अगदी न घाबरता जवळजवळ निर्लज्जपणे सांगणारी, नवऱ्यासमोर बारीक आवाज करुन अनेक कामांतून सुटका करुन घेणारी, प्रत्येक गोष्टीत घोळ घालणारी आणि तिच्या अंगी असणाऱ्या स्रीलीलांच्या मदतीनं अक्षरशः दिमतीला नवरा आणि इतर कुटुंब नाचवणारी- डॅंबिस गृहिणी!

ह्या डॅंबिस गृहिणींचा डॅंबिसपणा सोशल मिडियामुळे फोफावर चाललेला दिसतो आणि ह्या डॅंबिस बायकांची संख्याही आजकाल वाढताना दिसते. म्हणजे कसं की ह्या घरी असतात. ह्यांचे नवरे कमावतात आणि ह्या फक्त गमावतात. गमावतात तो त्यांचा वेळ. झोपून, खाऊन, मनोरंजनात आणि जमलंच तर घरच्यांबरोबर. बाकी तर काय. धुण्याला, भांड्याला, केरफरशीला, स्वयंपाकाला, कपड्यांच्या घड्या करायला, भांडी जाग्याला लावायला, भाजी चिरायला, फर्निचर पुसायला, बेडशीट बदलायला आणि इतर कुठलंही काम उपटलं तर ते निस्तरायला बाई असते. घरी अचानक कोणी आलं तर अचानक आलं म्हणून ह्यांच्याकडे द्यायला काही नसतं आणि सांगून आलं तर अनेकदा न सांगता खूप खाल्लं म्हणून यांचा अंदाज चुकलेला असतो. काहीही न करता यांना गृहिणी ही पदवी मिळालेली असते!

एकतर आपण गृहिणी आहोत म्हणजे सहानभुती हा आपला जणू हक्कच आहे, असा एक दृढ समज असतो. दुसरं म्हणजे यांच्याकडे खूप वेळ असल्यामुळे सगऴया पोस्ट वाचून, पोस्टमधल्या ह्या गरीब बिचाऱ्या आपणंच आहोत अशी कल्पना करत बसायलाही त्यांच्याकडे खूप वेळ असतो आणि मग इतर गृहिणींपेक्षा आपण नक्कीच वेगळे आहोत हे जाणवत असताना, आपण आपला अमूल्य वेळ काढून इतर मैत्रिणींच्या मदतीसाठी ही पोस्ट शेयर करतोय असं समाजभान दाखवत ती पोस्ट त्यांच्या वॉलवर आणि प्रत्येक गृपमध्ये पडतेच!

खरं सांगायचं तर कामावर न जाणारी प्रत्येक बायको ही आपल्यासाठी गृहिणी असते. पण गृहिणी हे पद, खरंतर हा किताब इतक्या सहज देऊन टाकण्यासारखा आहे का? आपण सगळ्यांनी आपल्या घरात किमान एक मंजुषा आणि एक वंदना तर नक्कीच बघितली असेल. सहज म्हणून डोकवावं तर साधं पाणी विचारायचंही यांना बरंच उशीरा सुचतं, “अगं बाई, ते बघ, इतके दिवसांनी आलीस की बोलतंच बसले. साधं पाणीही विचारलं नाही” असं म्हणत ‘ती’ वेळ मारुन नेणाऱ्या वंदना अगदी गल्लोगल्ली असतात. मग त्यांना पाण्यामागून गप्पांच्या नादात साधा चहाही सुचत नाही. चूक आपलीच असते, आपण इतक्या मनोरंजक असतो की बिचाऱ्या वंदनाला कसं गुंगवतो याचा तिलाही पत्ता लागत नाही. मुद्दा हा नसतोच की आपण घरुन चहा घेऊन आलोय की नाही, किंवा आत्ता चहाची तल्लफ आलीये की नाही. मुद्दा हा असतो की या ‘वंदना’, गृहिणींवर होणाऱ्या अन्यायाचा व्हिडिओ शेयर करतात आणि लोकं तो लाईकही करतात पण आत्मपरीक्षण राहून जातं आणि एका मंजुषाचा अपमान होतो. कारण घरातील सगळी कामं ती झटून करत असते. मंजुषाकडे कामाला बाई नाही असं मुळीच नाही. पण हाताखाली माणूस जरी असला तरी घरातील कामं कधीच संपत नाहीत. रोजचा स्वयंपाक झाला तर मधल्या वेळचे अनंत पदार्थ तुमची वाट बघत असतात. घर स्वच्छ पुसून झालं तर आवरायला कप्पे असतात. धुणं संपलं तर पडदे, सोफाकव्हर अशी रांग संपतच नसते आणि ह्यातल्या किमान एकाजरी वस्तूला रोज हात घातला, तर मंजुषाला बसायला उसंतही नसते. तुम्ही केव्हाही जा, ती ताट भरुन जेवायला वाढते. तिच्या घरात मायेचा ओलावा असतोच असतो आणि तो तुम्हाला पुनःपुन्हा आमंत्रण देत राहतो.

त्यामुळे घरी बसते ती गृहिणी ही व्याख्या मोडून घरी असते पण बसत नाही, आणि घरी असते तेव्हा बसत नाही, ती गृहिणी ही नवीन व्याख्या जास्त बरोबर नाही का? कारण हा गृहिणी पेशा फक्त कामावर न जाणाऱ्या बायकांमध्ये दिसतो असं मुळीच नाही. कामावर जाणाऱ्या अनेक बायका सुद्धा ह्या ‘न बसण्याच्या’ गटात बसतात. त्यांचं स्वतःचं मस्टर गाठण्याआधी त्यांनी सकाळचे चहा, नाश्ते, मुलांचं आवरणं, त्यांचा डबा, नवऱ्याचा डबा, धुणं लावणं, संध्याकाळच्या खाण्याची तयारी, रात्रीच्या जेवणाची तयारी, अॉफिसचे फोन असे अनेक ढीग उपसलेले दिसतात. “तुमची बायको किंवा तुमची सून काय करते?” याचं उत्तर “ती नोकरी करते” हे इतक्या सहजतेनी दिलं जातं की ती बाकी घरात जे काही करते ते तिनं असंच अगदी चोख करणं अपेक्षितच असतं का? आणि घरी असणाऱ्या गृहिणीच्या बाबातीत हे उत्तर तर आणखीनच वाईट होत जातं. “ही काय करते?”, “काही नाही, ती घरीच असते!” हे उत्तर पुन्हा एकदा ऐकलं तर बायको ही जवळजवळ घरातील फ्रीज, भिंतीवरचं घड्याळ किंवा सोफ्यात रेलून बसलेली उशी आहे, अशी इमेज होऊ शकते.

आत्ताच्या पिढ्यांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे. नवरे त्यांच्या बायकांच्या कामाला नक्कीच आदर देतात पण तेच नवरे त्यांच्या आई, मामी, मावशीला तो आदर देताना दिसत नाहीत. कारण आपल्या सवयी बदलल्या आहेत, विचार नाही. तरुण मुली ह्या कामं करतात, स्वतःचं करियर करतात हे आपल्या डोक्यात बसलंय. पण मग काम करणारी ही मुलींची ही पहिली पिढी तर नक्कीच नाही ना? बाहेर जाऊन केलं काय, किंवा घरी केलं काय? काम ते कामंच! आणि बाहेर जाऊन टाकल्या काय आणि घरी टाकल्या काय? पाट्या त्या पाट्याच! त्यामुळे सरसकट एखाद्या वर्गाचा मान किंवा अपमान करण्यापेक्षा आपण प्रत्येकाची वेगळी पारख करु शकणार नाही का? कामसू असणं, चोख कामं करणं हा स्वभावाचा भाग आहे, तसंच गृहिणी असणं हे एक व्रत आहे, तो धर्म आहे.

“आज आपण त्या प्रत्येक गांजलेल्या गृहिणीचा आदर करण्याची शपथ घेऊया”. वंदना पिन टोचल्यासारखी टूणकन् उडाली आणि शपथेसाठी हात पुढे केला. जांभई जाऊन हा संपूर्ण कार्यक्रम आपल्याचसाठी आयोजित केला आहे, इतक्या उत्साहात आता वंदना बसली होती. पाठीचा मणका उंचच उंच होऊ बघत होता. प्रतिज्ञा सुरु झाली, हॉलमध्ये तिचाच आवाज सगळ्यात स्पष्ट होता. प्रतिज्ञा झाल्यावर सगळे घरी जायला लागले. वंदनानं एका सेकंदात एक सेल्फी काढला, तो फेसबुकवर टाकला आणि चप्पल घातली. मंजुषा आणि पद्मजा अजूनही शांतच होत्या. तिघी जिना उतरल्या. वंदनाचा नवरा गाडी घेऊन खाली थांबला होता. पण परस्पर खायला बाहेर जायचं असल्यानं तिनं बारीक तोंडानं मैत्रिणींना सॉरी म्हटलं. वंदना गाडीत बसली, जोगळेकर बाईंची कहाणी आणि त्यावर नवऱ्याची कानउघाडणी सुरु झाली। गाडीच्या काचा वर झाल्या, आवाज वरुन गेला. गाडी निघून गेली आणि बाकी दोघी घाईनं घराकडे वळल्या. संध्याकाळची भुकेली घरातील इतर माणसं वाट बघत होती. “स्वतःत तल्लीन झालेल्या वंदनाला प्रतिज्ञेचा अर्थ कळला असेल का?” या प्रश्नाचं वादळ मनातच साचवणारी मंजुषा, वंदनापायी बोचणारी टाचणी कोणाला बोलून दाखवू शकेल!

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: