नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करायची वेळ आली की मनात धाकधूक होतेच. पण कधी कधी ना त्या धाकधूकीचीही सवय होते. कारण असं होतं की रोजच आपण असं काहीतरी करतो, जे आधी कधीच केलं नसावं. पुण्याच्या खडखडणाऱ्या पीएमटीच्या खिडकीत बसून प्रेरणाचे हे विचार चालू होते. रोज स्कुटीनी फिरणारी प्रेरणा आज मुद्दामूनच बसनी निघाली होती. मंगळवार होता. दर मंगळवारी तिची आई याच बसनी सहकारनगरवरुन सारसबागेच्या गणपतीला जायची. “उजव्या सोंडेचा गणपती एका आठवड्यापुरतो पावतो वाटतो तुला!” असं प्रेरणाच मिश्कीलपणे म्हणायची. आई मात्र कधीच प्रत्युत्तर करण्याच्या फंदात पडली नाही. पण आईचा संसार खरंच छान होताना प्रेरणानी बघितला होता. आज तिला या किमान एका आठवड्याचा आधार हवा होता.
लग्नाला फक्त ८ महिने झालेले. नव्याची नवलाई नुकतीच संपलेली. सगळ्या नातेवाईकांना, म्हणजे जवळच्या आणि अगदी लांबच्या सुद्धा नातेवाईकांना, लग्नाचं स्टेज सोडून जमिनीवर, आपापल्या खऱ्या चेहऱ्यांसकट बघून झालेलं. तिचं आणि तिच्या नवऱ्यातलं प्रेम अगदी तसंच होतं. सासू-सासरे आणि तू सुद्धा एकमेकांमध्ये रुळलेले. माशी शिंकली ती तिच्या नावामुळे! ‘प्रेरणा’. सासरच्या माणसांमध्ये प्रेरणाचं नाव काय प्रिय झालं. अगदी देवीच्या पावलांनी आली, सोन्याच्या पावलांनी आली, अशी विशेषणं लागावी इतपत! कारणंही तितकंच मजबूत होतं बरंका. प्रेरणाच्या नवऱ्याचा धाकटा भाऊ, नोकरीपासून गेले ३ वर्ष वंचित होता. ठिकठिकाणी प्रयत्न केले. नातेवाईकांनी शब्द टाकले. त्यानं चपला झिजवल्या पण प्रत्येक वेळेस काही ना काही व्हायचं. एकदा कंपनीच बंद पडली. एकदा सिलेक्शन झालं ते प्रोजेक्ट बंद पडलं. एकदा ओळख काढली, तो माणूसच निलंबित झाला. हे नाही तर ते. पण नोकरी काही लागेना. अर्थात त्याचे रिझल्टही नोकरी लागायला जडच होते. पण प्रेरणा सून म्हणून घरात आली आणि तिनं त्याला बायोडेटा करायला मदत केली. इतके दिवस कोणी त्याची प्रश्नोत्तरांची उजळणी घेतली नव्हती. ती देखील हिनं घेतली. आता नवीन सून आहे, लोकं नजरा लावून असतातंच. त्यामुळे आपल्याच्यानं जेवढं होईल, तेवढं प्रेरणा करत गेली आणि दोन महिन्यात त्याला पक्का जॉब मिळाला. “मला वहिनीकडून प्रेरणा मिळाली, असा घाणेरडा विनोद त्यानं पेढे वाटताना प्रत्येकाजवळ केला आणि सगळ्यांच्या तो अगदी तोंडात बसला.”
सासूबाईंना पुरणपोळ्या लाटताना कंटाळा आला की त्या म्हणायच्या, “प्रेरणा जरा ये गं!”. आता ह्या द्विअर्थी विनोदात सगळे हसायचे पण प्रेरणा पंजाबीड्रेसची ओढणी खोचून पोळ्या लाटायला घ्यायची आणि कामंही आपसूक व्हायचं. एका दगडात दोन पक्षी मारणारं हे आपलं नाव प्रेरणाला अगदी नकोसं व्हायचं कधी कधी! सासरे म्हणायचे, “आज गाडी चालवायचा अगदी कंटाळा आलाय, जरा प्रेरणा येऊ दे.” मग काय स्वतः कामाला बाहेर जाता जाता ही सोडायची त्यांना बॅंकेत! हे जोक प्रेरणाला भारी पडायला लागले. पण तसंही नवीन माणसांची याच निमित्तानी चांगले संबंध जोडले जात होते, त्यामुळे प्रेरणा गप्प होती. या प्रकाराला नवऱ्यापर्यंत एक समस्या म्हणून पोहोचवण्याची तशी तिला गरज वाटली नव्हती.
प्रेरणाच्या आगमनानं नवऱ्याचं प्रमोशन झालं. सासऱ्यांचं अडकलेलं पेन्शन सुटलं होतं. सासूबाईंची पाठदुखी पळाली होती. सगळं सगळं छान होत होतं. आता हे काही नवऱ्याचं पहिलं प्रमोशन नव्हतं. लग्नाआधीही त्याची प्रगती चालूच होती की. पेन्शनचं म्हणाल तर योगायोग आणि सासूचं म्हणाल, तर सगळा गाडा सुनेनं उपसल्यावर त्यांना विश्रांती मिळणारच की. मग पाठदुखी जाणं स्वाभाविक आहे! त्यामुळे हे डोक्यावर घेतलेलं सिंहासन प्रेरणाला अकारण वाटत होतं.
प्रेरणा सारसबागेपाशी उतरली. कधीही देवालयात न येणारी ही मुलगी आज अगदी भंजाळलेली वाटत होती. एक मावशी मागे लागली तसं तिनं पूजेचं ताट घेतलं. मोठा हारही घेतला. सवय नसलेली साडी सावरत ती कशीबशी पोहोचली त्या पायऱ्यांपर्यंत. चप्पल स्टॅंडपाशी तिला बेबी आत्या भेटल्या. काय बोलावं समजलं नाही की पटकन नमस्कार करायचा, हे तिची नेहमीची आयडिया तिनं वापरली आणि बेबी आत्यांनी तिच्या संस्कारांचं कौतुक करत, “आता लवकर पणजी कर आम्हाला“ असा डायलॉग मारला. केवळ, अगदी केवळ बेबी आत्यांना सॉफ्त सोलचे बूट घालायला वेळ लागला म्हणून प्रेरणानं आलेलं पाणी सव्वा चार सेकंदांसाठी गिळलं. आत्यांची पाठ वळली आणि ती थेट तरातर गाभाऱ्यापाशी गेली. गुरुजींच्या हातात पूजेचं सामान दिलं. तिच्या डोळ्यातलं पाणी आणि फारशी नसलेली गर्दी बघून गुरुजींनी तिला पूजा करायला सांगितली पण नक्की काय करायचं माहित नसल्यानं तिनं त्यांनी पुढे केलेलं ताट घेतलं नाही आणि सरळ प्रदक्षिणा घालायला गेली. गरागर एकवीस फेऱ्या मारल्या. तिच्या दृष्टीनं त्या फेऱ्याच होत्या. त्यात राग आणि दुःख दोन्ही आटोक्यात आलं. प्रेरणा देवासमोर मांडी घालून डोळे मिटून बसली. “देवाच्या दारी बसावं पाच मिनिटं” असं आई सतत म्हणायची हे तिच्या लक्षात होतं. पण डोळे मिटले आिण घात झाला. येणारं पाणी काही केल्या थांबेना. कोणी कोणीच आपलंसं वाटत नव्हतं. अगदी हे सगळं बोलायलाही नवरा परकाच होता. कारण शेवटी सासरचं काही सांगायचं म्हणजे तो त्याच्या आईबाबांच्या पार्टीतला! स्वतःच्या आईला फोनवर रडका किंवा अगदी हुंदके देणाराच आवाज काढला तर तिकडून सहकारनगरहून थेट औंधची गाडी निघेल. मुळात आईचा आधी चांगलाच ओरडा बसेल. कारण लहानपणापासून, बाईनी संसार करायचा ही मागासलेली शिकवण आईनं मनावर बिंबवली होती. आणि पुरुषानी काय करायचं? हा प्रश्न प्रेरणानं कधी विचारलाच नव्हता. त्यामुळे बोलायला आता फक्त एकच कंपनी होती, ती म्हणजे बाप्पा.
प्रेरणा मनातल्या मनात एकेक प्रसंग आठवायला लागली. लग्न झाल्यापासून ८ महिने अविरत इतरांना प्रेरणा देत बसलेल्या ह्या प्रेरणाच्या कामाचे लग्नानंतर मस्तपैकी बारा वाजले होते. सासूबाईंना थेट “मी हे करणार नाही, मी सुट्टी घेणार नाही.” असली उत्तरं देणं तिला जमणं अशक्य होतं. त्यांनीही कधी तुझं ऑफिस आधी सांभाळ असं म्हटलं नव्हतं. लग्नानंतरची २० दिवसांची सुट्टी संपली. त्यात फिरण्यात आठ दिवस गेले आणि घरी बारा. बारा दिवस हा वेळ अगदी घरच्यांना देऊन मग ऑफिस एके ऑफिस अशी तिनं मनाशी गाठ बांधली. पण प्रेरणेचे चमत्कार असे झाले की अवघ्या बारा दिवसात सासरची मंडळी जवळजवळ परावलंबी झाली. मग तिनं ठरवलं की सणावारांना ऑफिसमध्ये परवानगी मागायची आणि त्यांनीच दिली नाही की प्रश्न संपला. पण तसं होईचना. प्रेरणाचा मागचा रेकॉर्ड इतका चांगला की कोणी तिला सुट्टीला नाहीच म्हणेना. तिचे सर तर अगदी खुष असायचे. त्यात प्रेरणानं सासरी त्यांना दोनेक कार्यक्रमांना बोलावून घोडचूकच केली. सर निघाले सासूबाईंच्या माहेरवाडीचे आणि त्यांची गट्टी अशी जमली की थेट सासूबाईच कार्यक्रमांचा अवहाल पोहोचवायला लागल्या. सगळ्यांना प्रेरणा वाटत फिरणाऱ्या प्रेरणेला स्वतःकडून कामाची शून्य टक्के प्रेरणा मिळायला लागली आणि अगदी कैदेत अडकून पडल्यासारखं झालं. या जेलच्या खऱ्या व्हिलन झाल्या बेबी आत्या! लग्नानंतर अजून नोकरीचा जम बसायच्या आतच यांना पणजी व्हायचंय. हे म्हणजे जखमेवर मीठ! “अहो मला आधी मॅनेजर व्हायचंय!” असं मनातल्या मनात प्रेरणानी दहा वेळा म्हणलंही. पण मोठ्यांनं म्हणायचं धाडस नाही. या अशा बायकांची पुढची उत्तरं तयार असतात. “आता झालीस की घरची मॅनेजर! बास झालं.” प्रेरणाच्या शांततेनी किमान हे पुढचं वादळ थोपवलं होतं.
“मोठ्यांचं कायम ऐकावं!” आईचा हा टिपीकल डायलॉग प्रेरणानं नेहमी हाणून पाडला होता. “का? मोठे कधी चुकत नाहीत?”. आई फक्त हसून म्हणायची. “तरीही ऐकावं. त्यांचं ऐकलं की कधीच नुकसान होत नाही.” या मोठ्यांमध्ये आज पहिलं नाव आईचं नाही, तर सासूबाईंचं दिसत होतं. लग्नात “नाव बदल, नाव बदल” असा पिच्छा त्यांनी पुरवला होता. पण नवऱ्यानं प्रेरणाकडे एकदाच नजर टाकली आणि तिच्या नजरतून वार करणारे शेकडो बाण त्याला दिसले आणि त्यानं ठामपणे नाही सांगितलं. का तर म्हणे त्याला प्राजक्ता हे नाव फार आवडायचं. पण “माझं नाव ही माझी ओळख आहे.” या अखिल भारतीय स्त्री संघटनेच्या पुरस्कर्त्या प्रेरणाच्या अंगात असं काही संचारलं की नावाच्या आसपास जरी कोणी फिरकलं तरी म्यानात तलवार तयार असायची. ती उगारावी लागली नाही हा भाग वेगळा. पण आज सासूबाईंचं ऐकून प्राजक्ता हेच नाव बरं होतं असं मात्र वाटलं. प्रेरणा मनात सुखरुप राहिली असती. तिचा वापर असा प्रत्येकाच्या अडीअडचणीत करुन तिला निदान झिजवलं गेलं नसतं.
अश्रू थांबले. डोळे वाळले. ती डोळे उघडणार इतक्यात तिच्या डोक्यात काहीतरी पडलं. दचकून डोळे उघडले तर प्रेरणाच्या मांडीत एक फूल पडलं होतं. सिनेमात दाखवतात अगदी तसं. प्रेरणानं आधी गणपतीकडे पाहण्याऐवजी त्या मूर्तीमागे कोणी लपलं तर नाही ना हे बघितलं. आजूबाजूला फूल टाकण्यासारखं कोणीच नव्हतं. लोकं पठण करत होती, जात येत होती, प्रदक्षिणा चालू होत्या, काही लहानमुलं पकडापकडी खेळत होती. काही प्रश्नांची उत्तरं सुटण्याआधीच ते प्रश्न चांगले वाटतात असं म्हणत प्रेरणा उठली. मंदिराबाहेर आली आणि तिला आपण होऊन मागे वळून परत एकदा गणपतीकडे बघावंसं वाटलं. “आईचा उजच्या सोंडेचा गणपती का पावत नाही?” हा बाबांना वारंवार विचारलेला प्रश्न आठवून तिला हसू आलं. आज खूप हलकं आणि प्रसन्न आणि हलकं वाटत होतं. हे म्हणजे देवाचं पावणं असेल, असं स्वतःला सांगत ती चप्पलस्टॅंडकडे गेली खरी पण पुढच्या मंगळवारी यायचं निश्वित करुन!
खूप मस्त लिहीलं आहेस. प्रेरणाच्या शेजारी उभं राहून सगळं पाहील्यासारखं वाटलं,
LikeLiked by 1 person
Thank you 😍
LikeLike