आऊच! एक काटा बघा नं माझ्या पायात कसा रुतला! “अगं माझ्यासाठी थांबा गं जरा…” या नं माझ्या मैत्रिणी… आम्ही सकाळी उठल्यापासून अंधार पडेपर्यंत फक्त बागडत असतो. सगळीकडे नुसते हुंदडत असतो. दुपार झाली की थोडं गवत खातो मग आमच्या जंगलातल्या इतर काही मित्रांना भेटतो. अगदी तासभरंच. घरी माहीत नाहीये नं. माझी आई तर इतकी शिस्तप्रिय आहे की असं अनोळखी हरणांबरोबर वेळ घालवलेला तिला मुळीच आवडत नाही. पण आता तिला कोण सांगणार की रोज रोज भेटून आमची छान ओळख झालीये आणि त्यातल्या एकाशी जरा जास्तंच छान. पण जेव्हापासून तो माझ्याकडे एकटक बघू लागलाय नं… तेव्हापासून या मैत्रिणी मात्र माझ्याशी फारश्या बऱ्या वागत नाहीयेत. आईनं तसं मला लहानपणापासून शिकवलंय की तळ्याकाठी तासन्‌तास उभं राहून स्वतःला निरखत बसायचं नाही. पण माझं रुप इतकं खुलून दिसतं माहीतीये तळ्यात?? खूप सुंदर! मी नाकी डोळी इतकी नीटस आहे की माझी कोणतीच मैत्रीण नाही. त्यामुळे आम्ही ताफ्यात बागडलो तरी मुंग्यांपासून हत्तींपर्यंत सगळे माझ्याचकडे बघतात. “आई…” फार दुखलं हो काटा खेचून काढताना. पण माझा मलाच काढावा लागला. एकही मैत्रीण सोबतीला आली नाही. खरं सगळ्या चांगल्या आहेत… पण म्हणाले नं… परपुरुषांमुळे घात होतोच. तसाच झालाय. “काय गं… एवढ्या हाका मारल्या… थांबला सुद्धा नाहीत तुम्ही!” “त्या तळ्यात प्रतिबिंब निरखत बसायचं सोडून सकाळी धावायला जात जा! म्हणजे आमच्या वेगाशी तुमला होईल तुझी…”अगं मला काटा लागला म्हणून!!! नाहीतर मी तुमच्याच बरोबरीनं धावत होते की…” “बरं ऐक. माझ्या बाबांनी बजावून पाठवलंय की तळ्याच्या डाव्या हातानं जायचं नाही. कारण तिथे म्हणे शिकारी दडलेत.” “काय? अगं मग आपल्या मित्रांना कसं भेटणार आपण? नाही भेटायचं एक दिवस… त्यानं काय लगेच आभाळ कोसळणार आहे?” “आभाळ नाही गं कोसळणार… पण ते आपली वाट बघतील नं.” “बघू देत. तू जशी स्वतःला निरखत बसतेस तसाच तुझा तो स्वतःचे चट्टे आणि बुट्टे मोजत बसेल. त्याला काय त्याच्या रुपाचा कमी अभिमान नाहीये.” “सारखं काय गं आम्हाला आमच्या रुपाकडे बघून बोलतेस…” “बरं बाई… नाही बोलत. पण तळ्याच्या डाव्या हातानं जायचं नाही म्हणजे नाही!” “मी विनंती करते… मनापासून… जाऊया ना गं…” “आम्ही येणार नाही आणि तुलाही जाऊ देणार नाही.” तुम्हाला खरं सांगू? त्याला भेटून घराकडे चालत येतानाच मला त्याची आठवण यायला लागते हो. सगळीकडे तोच दिसतो. माझ्या मनात तोच आहे असं वाटतं आणि आता या तिकडे येणार नाही म्हणतात आणि जाऊ ही देणार नाहीत… मी काय करु हो??? “येतीयेस का आमच्यात खेळायला? की चट्टे बुट्टे आठवत बसणारेस???” बघितलं कशा खिदळतायेत माझ्या मैत्रिणी. “काय खेळणार आहात त्यावर ठरेल.” “पकडापकडी किंवा विषामृत!” “मग खेळा तुम्हीच. माझा पाय तसंही ठणकतोय.” “बघितलंत कशी रडकी-चिडकी बसलीये कोपऱ्यात.” “रडकी म्हणा नाहीतर चिडकी म्हणा. मी अशीच बसून राहणार आहे.. आणि तुम्ही सुद्धा माझ्या आजूबाजूलाच खेळा. जास्त लांब जाऊ नका.” माझा पाय खरं तर काही एवढा दुखत नाहीये पण त्याच्यांत खेळायला जायची माझी अजिबात इच्छा नाहीये. मी तुम्हाला माझं नाव सांगितलं का? माझंं नाव टुंपी… का अजिबात विचारु नका. माझ्याकडे उत्तर नाही. हा प्रश्न मी हजार वेळा विचारुन झालाय आणि माझ्या त्या चट्टेरीपट्टेरी हरणाचं नाव हवंच असेल नं तुम्हाला? त्याचं नाव दिलेर. तो पंजाबच्या जंगलातून आलाय असं म्हणतात सगळे. खरं खोटं माहीत नाही. आणि ही माझी माझ्यावर गुरगुरणारी मैत्रीण कोण माहितीये का? ही ढमी. तर मला काय वाटतं की ढमीला दिलेर आवडत असेल म्हणून ती माझ्यावर असा खार खाते. हे प्रेमाचे त्रिकोण फारच तापदायी असतात. कोणाचं एकाचा पराभव ठरलेलाच असतो. माझ्या भाषेनं घाबरुन जाऊ नका हं. मी शुद्ध मराठीच बोलते. म्हणजे मला तेच येतं. कारण गोरे लोकं राज्य करायला आले तेव्हा माणसं आणि काही ठराविक जनावरं घेऊन आले. आमची भाषा भेसळ करायला हरणं नव्हती आणली त्यांनी… असो. हसायचं तर हसा नाहीतर तसेच बसा! मी तर हसले बाबा माझ्या विनोदावर! “अगं नका नं लांब जाऊ… इकडेच खेळा..” मी सांगितलं होतं यांना… ऐकलं होतं ना तुम्ही?? तरी बघा नं कशा गेल्या लांब. आता मी काय एकटी बसून राहू इकडे? असू देत…. एक क्षण थांबा… मी आत्ता दुपारच्या वेळी एकटी आहे एकटी! या आमच्या जंगलात आणि ते पण तळ्यापाशी… मला काहीतरी सुचतंय. ते तुम्हाला पण सुचतंय का??? बरं सांगूनच टाकते. मला वाटतंय की तळ्याच्या डाव्या बाजूनं जावं आणि त्याला भेटूनच यावं. अख्खा रस्ता माझ्याशी बोलत रहाल नं? कारण ढमीनं भीती घालून ठेवलीये नं शिकाऱ्यांची. रोज आम्ही बागडत जातो तर हा रस्ता खूपच छोटा आणि जवळचा वाटतो. आज फार वेळ लागेल मला पोहचायला. कारण एकटीला बागडायला किंवा धावायला मला कंटाळा येतो. आणि मला सारखं काही नं काही नवीन करावंसं वाटतं. तोच तो पणा नको वाटतो. बघितलंत. अजून तळं सुद्धा संपलं नाहीये. मी निघून किती वेळ झाला कोणास ठाऊक. सूर्य या सागाच्या झाडापासून त्या सागाच्या झाडापर्यंत गेला सुद्धा. एक काम करुया कां मी नं १० पावलं चालते. मग १० पावलं धावते. अशानं अंतर जरा लवकर कापलं जाईल. की मी दिलेरचा विचार करु? तसं तर त्याच्या विचार माझ्या डोक्यात सतत चालूच असतो. बापरे. माझ्या डोक्यावर ज्या झाडाच्या फांद्या आहेत नं त्यावर एक माकड बसलंय. मला माकडांची जाम भीती वाटते. २१, २२, २३…. माकड दिसेनासं होईपर्यंत पळेन मग पुढे २० पावलं चालेन… तुम्ही आहात नं माझ्यासोबतीला?? कारण अजून दोन माकडं आली आहेत. अजून एक… अजून तीन… सगळं ठीक असेल नं जंगलात? की कोण्या शिकाऱ्यानं माझ्यावर नेम धरलाय म्हणून ही माकडं मला सावध करायला आली आहेत??? मी जरा खाली बसून अंदाज घेते. “माकडांनो!!! काय झालंय?? तुम्ही एकदम असे ओरडताय का???” मला खूप भीती वाटतीये हो!! माकडं अशी ओरडतात तेव्हा ती काहीतरी सांगत असतात. पण मला त्यांची भाषा येत नाही. आता मी निम्म्याहून जास्त अंतर आले आहे. खरंतर मी जरा धावले तर मला पोहचायला अगदी तीन झाडांतला सूर्य सुद्धा पुरेसा होईल? काय करु? या माकडांचं ऐकून मागे जाऊ की दिलेरपाशी जाऊ? त्याच्यापाशी एकदा पोहचले की मला सुरक्षित वाटेल. त्याच्या कळपात मी त्यांच्यातलीच एक होऊन जाईन. पण आईला कळलं तर मात्र फारच कठीण होईल. कारण आधीच दिलेर पंजाबच्या जंगलातून आलाय. त्यात येताना त्यानं तिकडंची एखादी गोचीड आणली असेल तर काय करु? मी सरळ मागेच वळते नाहीतर. आता धावून धावून काटाही जास्त दुखतोय. ही माकडं अखंड केकाटतायेत माहितीये? अशुभाची चाहुल असणार ही. ६७,६८,६९…. हुश्श…. आता १० पावलं चालणार…. १०९, ११०, १११… हुश्श! ते… लांबवर माझं घरं दिसतंय… माझी सोबत सोडू नका हं. मला चांगलाच मार पडणार असं दिसतंय. माझ्या घराभोवती बरीच हरणं जमलीयेत आणि मुख्य म्हणजे ढमी आणि तिची आई आहे. ढमी माझी कितीही चांगली मैत्रीण असली तरी तिला कायम आदर्श हरिणी व्हायचं असतं. त्यासाठी ती माझ्या आईचे कान सुद्धा भरु शकते. “टंपी!!! कुठे होतीस तू???” “मी… मी… त्या…” “तळ्याकाठी होतीस नं???” “काकू मी तिला सांगितलं होतं तळ्याच्या डाव्या हातानं जाऊ नकोस… गेलीस त्या…” “त्या काय??” “आई काही नाही. माझ्या पायात काटा गेला नं म्हणून मला उशीर झाला.” “काय गं ढमी, तिच्या पायात काटा गेला तर थांबायचं नाही का तिच्यासाठी?” “आम्ही बागडत आलो. तीच हळूबाई आहे.” “सगळे का जमलेत आई?” “बरं झालं टंपी तू तळ्यापाशीच बसलीस. सकाळी बातमी होती की तळ्याच्या डाव्या हाताला शिकारी आहेत पण या पोरी उजव्या हातानं गेल्या आणि…” “आणि??? सांगा नं कोणीतरी काही…” “अगं आपल्या पट्टूला गोळी लागली?” “वाचली का ती??” “डोक्यात एक घाव बसला. तिथल्या तिथे गेली. मग सगळ्या मोठ्यांनी उचलून आणलंय तिला.” “आम्ही सगळे मोठे तिथे जातोय. ढमी आणि टंपी तुम्ही इथेच बसा!” “बरं!” “सगळे मोठे गेेले गं ढमी. मला पण खरं पट्टूला बघायचं होतं.” “खोटं नको बोलूस.” “ढमी? तू माझ्याशी असं का बोलतीयेस?” “कारण तू आपला कळप सोडून त्या दिलेरच्या कळपात जायची स्वप्न बघतीयेस.” “असं नाहीये. मला आपला कळप किती आवडतो माहितीये? मागच्या वेळच्या थंडीत पट्टूनं स्वतः मला उन्हात बसायला जागा दिली होती.” “तरीही ती मेल्याचा आनंदच आहे नं तुला?” “का असेल?” “कारण ती दिलेरच्या प्रेमात होती! तुझ्या वाटेतला काटा दूर झाला.” अहो तुम्हाला सांगते मला खरंच असं काही वाटत नाहीये. मी अशी नाहीये हो. हा दिलेरच नकोय आता मला. त्याच्यामुळे सगळं बिघडतंय. पण काय करु डोळे मिटले की फक्त त्याचा चेहरा समोर येतो. “ढमी असं काही नाहीये गं…” “असंच आहे आणि मी झोपतीये. मला आता त्रास देऊ नकोस.” ही बिझान्यावर पडली एका क्षणात घोरते. मला मात्र झोप लागत नाही. पण आता मला एकच काम आहे. दिलेरचा चेहरा मनात येऊ द्यायचा नाही!

रात्र मी कशीबशी ढकलली. पण सकाळ झाली आणि आईबाबांनी लगेच सांगितलं की आज तळ्याच्या डाव्याच काय तर उजव्या बाजूला ही जायचं नाही. खरं म्हणजे तळ्यापाशीच जायचं नाही. मला फार वाईट वाटलं. काल ज्या माकडांनी कुईकुई करुन मला निरोप दिला तीच माकडं माझ्या दिलेरला निरोप देतील का? त्याला वाटेल ही गायब झाली. त्याला कळायला हवं नं की मला त्याला भेटायचंय पण मध्ये इतके अडथळे आहेत की काय सांगू? अरे देवा… मी तर ठरवलं होतं नं काल… त्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही आज… मी आज काय करणार होते माहीत आहे? माझ्या सगळ्या कळपाला सोडून देणार होते. सोडून देणार आणि मी एकटी बागडत दूर दूर जाणार…  इतका वेळ बागडणार की बास… थांबणारंच नाही. म्हणजे पुढल्या वेळेपासून मी मागेच पडायला नको. मला खूप राग येतो जेव्हा मला ढमी म्हणते की तूच हळूबाई आहेस. मला अजिबात आवडत नाही. मी काय करु आत मला वेग नाहीये तर? कधी कधी वाटतं की आम्हा सुंदर दिसणाऱ्या हरणांवर अन्यायच होतो. म्हणजे बघा नं… मी सुंदर दिसते हे सारखं बोलून दाखवायचं नाही. ढमीला आणि पट्टूला कधी सुमार किंवा कुरुप म्हणायचं नाही. पण त्या मात्र मला लंगडी म्हणणार… हळूबाई म्हणणार.. तशी मी खरं म्हणजे लंगडी नाहीच आहे. पण मी जोरात पळायला लागले नं की सशासारख्या उड्या मारतीये असं दिसतं म्हणे लांबून. आता मी मला कधी बघितलंय?? पण या सगळ्या मैत्रिणी म्हणतात. मी नं एक गंमत केली आहे. तुमच्याशी बोलता बोलता मी लांब जायला, म्हणजे धावत जायला सुरुवात केली होती. आणि मी आता घरापासून बऱ्यापैकी लांब आले आहे!! हो! खरं. पण तळ्याच्या बाजूला नाही बरंका! वेगळ्याच दिशेला… हुश्श… जरा बसते आता. पाय टेकले की काय बरं वाटतं सांगू? “शूकssss” कसलातरी आवाज येतोय. मी नं साप असायला हवं होतं. मला सरपटता आलं असतं. पावलांचा आवाज! पण आम्हा प्राण्यांच्या पावलांचा आवाज येतंच नाही. मग? मग कोण आलंय?? अहो… हे तर तुमच्यापैकी कोणीतरी आहे. जीप थांबवून दडी मारुन बसलंय. त्यांना माझा चित्र पकडायचं असेल का? मी उभी राहू का? सुंदर दिसण्याचे मला काहीतरी तर फायदे हवेत की नकोत? ही बघा. मी उभी राहिले. आणि टकमक टकमक इकडे तिकडे पाहू लागले. माझ्या चेहऱ्यावरचं हसू तर आत्ता इतकं सुंदर दिसत असेल की विचारु नका. मला माहीत आहे नं. मी स्वतःला असं न्याहाळलं आहे त्या तळ्यात. खिचीक! एक चित्र काढलं. अजून एक काढू देऊ का? खिचीक!! किती मोठं आहे तिच्या हातातलं चित्रांकन करायचं यंत्र… माझ्याच वयाची असेल हं ही मुलगी. भीती म्हणून नाही तिला. माझ्याकडेच चालत येतीये ती. खिचीक! तिनं मला हात लावायचा प्रयत्न केला तर? मी काय करु? लावू देऊ हात??? आहा…. काय मऊ आहे ही मुलगी? ती पण माझ्याकडे बघून हसतीये माहीत आहे? आणि मी पण… तिला पण मी मऊ मऊ लागत असेन का? खिचीक! “टंपी!!” “टंपीsss” बापरे आई! आई कशी आली इकडे… मला या मुलीची भाषा सुद्धा येत नाही. मी हिचा निरोप कसा घेऊ? “टंपीsss” खूपच चिडली आहे आई… जाऊ दे! मी जातेच. मी कित्ती वेगात धावतीये आईकडे माहीतीये? आता ढम ी असती… ह. ह. ह… तर… तर तिला कधीच मागे टाकलं असतं मी… “आई… आई तुला माहीतीये? त्यांनी माझं चित्र घेतलं… मी खूप खूप सुंदर आहे नं म्हणून!” “टंपी तुझं काय करु तेच कळत नाही मला… काळजी वाटते बाळा तुझी. तू सुंदर दिसतेस म्हणून नाही घेतलं त्यांनी चित्र. तू मूर्खासारखी समोर गेलीस म्हणून घेतलं. आपण हरणांनी जर असं समोर उभं रहायला सुरुवात केली नं” “तर आपल्या कळपाची सुद्धा चित्र घेतील ते!” “वेडाबाई, चित्र घेणार नाहीत! मारुन टाकतील आपल्याला. काल पट्टू आपल्याला सोडून गेली आणि तुला तरीही अक्कल आली नाहीये?” “आई माणसं एवढी वाईट नसतात गं.” “हे बाबांसमोर बोलू नकोस. मारतील तुला चांगले!” “का आई?” “टंपे, पटपट पावलं उचल. तू म्हणजे नं बोलायला लागलीस की हळूबाई होतेस.” “मी नाही तुझ्याबरोबर घरी.” “आता काय झालं?” “तू पण माझ्या मैत्रिणींसारखीच हिणवतेस मला. टंपे आपल्याला जर सगळेच एखादी गोष्ट म्हणत असतील नं एकदा विचार करुन बघावा की ते खरं बोलत आहेत का? आणि तुझ्या बाबतीत हे खरंच आहे.” “मी आता इथेच बसून राहणार आहे. तुमच्यापेक्षा ती माणसं बरी. किमान माझ्यावर प्रेम करतात.” “टंपे आपल्याला नाव ठेवणारे सगळे परके करायचे नसतात. ते आपल्या चांगल्यासाठी सांगत असतात आणि कौतुक करणाऱ्या सगळ्यांना जवळ घ्यायचं नसतं.” “ठीक आहे. मी येते घरी. पण मला तुझ्याशी बोलायचं नाहीये.” “ठीक आहे. ऊठ. चल.” तुम्हाला माहीतीये? ही माझी आई माझ्यावर लहानपणी खूप प्रेम करायची. मला म्हणायची कित्ती छान आहेस गं टंपू… आणि आता बघा… कशी तरातर चालवत घरी नेतीये. “आई..” “आता काय झालं? बोलणार नव्हतीस नं?” “ठीक आहे नाही बोलत.” “बोल टंपी… काय झालं?” “आपल्या घराजवळ इतकी का गर्दी जमलीये?” “आज शिकारी परत आले होते. ढमी गेली.” “आई?” “उगाच नाही शोधत येत तुला मी. काळजी वाटते टंपी…” “आई कुठे गेली होती ढमी? ती तर शहाणी होती नं? ती सगळं ऐकायची तिच्या आईचं.” “ढमीचा म्हणे मित्र होता तळ्यापलीकडे. तिथे खूप शिकारी आले होते आणि त्यांनी बऱ्याच हरणांना मारलं. ढमी तिच्या मित्राला बघायला जात होती… त्यालाही तिची काळजी वाटत होती. तो निम्मं अंतर आला होता. दोघं हातात हात घेऊन आभाळात गेले. त्या मुलाचे घरचे त्याला घेऊन गेले…” हे ऐकून मी कशी व्यक्त होऊ? मटकन खाली बसण्याशिवाय मला दुसरं काहीच सुचत नाहीये. सगळं जग फिरतंय. मला काही दिसत नाहीये. किंवा सगळंच एकदम दिसतंय. मला भोवळ येतीये का? यालाच भोवळ येणं म्हणतात का? असेल कदाचित. सगळे माझ्याकडे बघतायेत. मला काही नावं ऐकू येतायेत. “दिलेर” कोणी खरंच म्हटलं असेल का? की मला ऐकू येतंय??? मला उचलू नेतायेत सगळे. झाडाच्या आडोशाला झोपवतायेत. “मला दिलेरला भेटायचंय. म्हणजे त्याचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं? त्याला ढमी आवडायची? मला वेगात पळता येत नाही आणि माझ्या सौंदर्याचा तर काहीच उपयोग नाही. मी अशी का आहे??? पट्टू, ढमी, दिलेर… सगळे मला सोडून गेले. शिकाऱ्यांनी त्यांना का निवडलं?? मी आज समोर गेले तर माझं चित्र घेतलं. ही बातमी ऐकायच्या आधी मी मेले असते तर किती बरं झालं असतं??? माझ्या चामडीच्या पिशव्या सुद्धा सुंदर होणार नाहीत का? किंवा उबदार गालीचे?” आईबाबा बाजूला जाऊन काय बोलत असतील? ढमी आणि दिलेरबद्दल बोलत असतील का? “अहो. टंपीला इथं पडू देत. आता तिला रात्रीचं जेवण बिझान्यातंच द्यावं लागेल. आपण दोघंही बाहेर पडुया.” “आणि मग तिच्यापाशी कोण थांबेल?” “मी मागच्या अंगणातल्या झाडाची पानं रगडते तिच्या नाकावर. म्हणजे ती ३-४ तास तरी उठणार नाही. तोवर आपण परत येऊ.” “ये लवकर.” टंपी…. तुला आता एक काम करावं लागेल. आई पानं रगडेल तेव्हा श्वास रोखून धरायचा आहे. नाहीतर चार तास तुझी सुट्टी! बापरे…. “एक… दोन… तीन… टंपीचे बाबा… झालं काम. चला” आईबाबा सुद्धा किती वेगात धावतात. ते दिसेनासे झाले की मला तळ्यापाशी जायचंय. ढमी आणि दिलेर नक्की कुठे हातात हात घालून पडले होते ते मला माझ्या डोळ्यांनी शोधायचंय. मी ते करु शकते. दिलेरचा सुगंध मी कधीच विसरु शकत नाही.  मला जायला हवं. मला धावायला हवं. इतकं जोरात जोरात. वायुवेगासारखं. ढमीपेक्षा जोरात. पट्टूपेक्षा जोरात. आईपेक्षा पण आणि बाबापेक्षा पण… मला खूप खूप जोरात धावायचंय. खूप. हा… हा… हा… अजून जोरात… अजून जोरात….. धप्प्प्प्प्‌्!!!! ही माती… हे तळ्याकाठचे गोटे. यातंच शेवटचा श्वास घेतला त्या दोघांनी. माझं तळं. माझं कौतुक करणारं एकुलतं एक तळं. फक्त ते माझं आहे. बाकी कोणी नाही. ही माणसं पण नाहीत. यांना साधी माझी शिकारही करावीशी वाटत नाही. तळ्याकाठी सगळे शिकारी जमतात नं? आज मी इथेच उभी राहणार आहे. एक पाऊल पाण्यात आणि हे दुसरं… “शिकाऱ्यांनो!!! या सुंदर हिरव्यागार जंगालात या निळ्या पाण्यात उभ्या या मूर्ख हरिणीचा पिवळा रंग दिसतोय का तुम्हाला?? ओळखता येतंय हे हरीण? तुमच्या गळ्यातली पिशवी करा माझी, पाय द्यायला गालीचा करा, अंगावर घ्यायला शाल करा… पण काहीतरी करा. मला मारा… बंदूकीच्या गोळ्या घाला! माझ्या सगळ्या जवळच्या हरणांना तुम्ही संपवलंत… मग मला का मारलं नाहीत?? मी इतकी लंगडी आहे? इतकी पांगळी? की हे तळं खोटं बोलतंय? मी कधीच सुंदर नव्हते???” ठाप्‌्प्‌्प्‌्! माझ्या डोक्यात काहीतरी बसलंय… गोळी… गोळी… हो! माणूस माझ्यावर प्रेम करतो. तो माझा वापर करेल. मी मेले. दिलेर तू प्रेम केलं नाहीस पण कोणीतरी केलं. मी मेले…. आता या माझ्या आवडत्या तळ्यात कोसळताना मला पूर्णत्वाचा आनंद होतोय… माझा सुखांत होतोय!!!! “अहो टंपीचे बाबा! तिला लवकर बाहेर काढा… तिला नीट पोहता येत नाही. तिच्या पायात पुरेसा जोर नाही.” “तू मला धर. मी तिला खेचतो वर.” “जमतंय का हो बाबा?” “मी मदत करु का?” “तू कोण? आमच्या ढमीचा ज्या मित्रांमुळे अंत झाला त्यांच्यातला एक?” “त्यांच्या कळपातला एक. पण आम्ही चांगली हरिणंच अाहोत काकू. मी दिलेर…” “ये रे मुला… मदत कर.” “अहो, हाच असेल तो पंजाबी.” “आत्ता ही वेळ नाहीये टंपीची आई. आपल्या टंपीच्या डोक्यात फळ पडून तिला भोवळं आलीये आणि तुला जाय पात सुचतीये?” “आई तुम्ही बाबांना धरा. बाबा तुम्ही मला. मी टंपीला बाहेर काढतो. एक… दो…. न.. तीन!” “माझी टंपी म्हणजे खरंच वेडाबाई आहे…. कसं कळत नाही हिला? एखादा शिकारी आला असता म्हणजे???” “आता हिला घरी कसं नेणार याचा विचार करा.” “तुम्ही दोघं काळजी करु नका. मी पाठीवर टाकतो हिला. अंधार पडायच्या आत आपण पोहचू घरी. १० पावलं चालायचं आणि १० पळायचं म्हणजे अंतर जाणवत नाही…” “१, २, ३, ४…. ४५, ४६, ४७… ११२, ११३, ११४….”  

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

4 Comment on “घायाळ मी हरिणी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: