“Thank you… Thank you very much… तुम्ही सगळे आज इथे वेळात वेळ काढून आलात. तुमचे शाळा, कॉलेज, ऑफिसेस मॅनेज करुन आलात आणि मलामाझ्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्यात त्यासाठी Thank you. माझ्या मुलांनी माझ्या लग्नाचा ४० वा वाढदिवस एवढ्या थाटामाटात केला यासाठी त्यांनाही Thank you. पण आज मला बोलायचंयखूप बोलायचंय त्यामुळे तुमचा मी वेळ घेणार आहे. हे माझे शब्द नाहीत. २००, ४००, २००० किंवा लाख शब्द असतील. तुम्हाला घरी जायला उशीर होतोय का वगैरे याची मी काळजी घेणार नाही. ती तुमची तुम्ही करा. गेले ४० वर्ष मी फक्त काळजीच करतीये. माझ्या नवऱ्याची, सासू सासऱ्यांची, मग मुलांची, कोण काय म्हणेल त्याची, सगळ्यांच्या खाण्यापिण्यांची, झोपण्याची, वेळांची, पैशाची अशी अनंत काळजी मी गेले अनंत वर्ष करतीये असं मला वाटतंय. मागे एकदा माझ्या मुलीनी मला प्रश्न केला होता की आई बायकांना करायला काहीच नसतं म्हणून बायका लग्न करतात का गं? तिचं बरोबर होतं. मी तेव्हा तिला दुजोरा दिला नाही. पण लग्न झाल्यावर बिझी व्हायला होतं आणि मग रिकामपण मेलं तरी येत नाही. आपली ही अशी अवस्था व्हावी, आपल्याला रिकामपणाचा त्रास होऊ नये या हेतूनंच बायका लग्न करत असाव्यात. आई वडील शिकवतात. मोठं करतात. डिग्री देतात. मग नोकरी लागते. मग पैसे कमवायला सुरुवात होते होते की लग्नाचं सुरु होतं. वय झालं, योग्य वेळी व्हायला हवं असं सगळे आजूबाजूचे म्हणतात. म्हणजे आधी सगळा वेळ काहीतरी मिळवण्यात जातो आणि ते मिळवून enjoy करायला लागायचं सोडून परत enjoy करायला एक पुरुष शोधावा लागतो. शरीराचं वगैरे जाऊ दे. पण नुसते सिनेमे बघायला, हॉटेलिंग करायला, मित्रमैत्रिणींना भेटून आता मजा येत नाही का? त्याला कशाला पुरुष लागतोय? पण कोणा मामी काकूला ते तसं वाटतं आणि त्या आईच्या मागे लागतात मग ती आपल्या. ठीके. चला अशीच गेली वर्ष दोन वर्ष की सगळ्या मैत्रिणी तेच करतात. एकीचं लग्न, दुसरीचं बाळंतपणकी मग आपलीही तीच गरज होऊन बसते. मग लग्न होतं आणि आपण एका संपणाऱ्या दमछाक करवणाऱ्या journey ला सुरुवात करतो. गंमत माहितीये? आमच्या काळात तर divorce पण जास्त व्हायचे नाहीत. म्हणजे अगदीच नवरा मारकुटा निघाला, fraud निघाला तर divorce. किमान माझ्या सारखीच्या घरात. बाकी वेळी संसार करत राहायचा. नवरा मला respect करत नाही, considerable नाही किंवा आमचं ते… married life किंवा couple relation म्हणू आपण. ते ok नाही म्हणून आमच्या पिढीत तरी फारसं कोणी आपल्या partner ला सोडलं नाही. मला वारंवार अनेक बायकांच्या तोंडावर दिसलं की आपला नवरा वागतो ते पटत नाहीये. त्या क्षणी पटत नाहीये किंवा काहींना ते कधीच पटत नव्हतं. हेच नवऱ्यांच्याही बाबतीत दिसलं. काही नवरे त्यांच्या बायकोचा पार पिट्ट्या पडला तरी त्यांना मदत करत नव्हते. काही नवरे त्यांच्या बायकोच्या इतकं मागे पुढे करत होते की जणू लॉटरी लागलीये बायकोच्या सुंदरतेची. किंवा तिचं गोड बोलणं, माना वेळावणं त्यांना वेडं करुन सोडत होतं. काही कर्तृत्ववान नवऱ्यांना दोन वेळचा नीट डबा मिळत नव्हता. घरात मुलांची काळजी घेतली जात नव्हती. बायको house wife असली तरी प्रत्येक कामाला बाई होती पण उपयोग शून्य होता. आपलं कर्तव्य असल्याप्रमाणे हे नवरे दरमहा घरात पैसे देत होते आणि देतच राहिले. बेडरुमपर्यत जाऊन खुलासा करण्याइतकं धाडस माझ्यात नाही पण ते तुमचं तुम्हाला समजेलंच. मी सुद्धा यातलीच. Anniversary च्या दिवशी तुला हे इतकं भयंकर सगळं ऐकवतीये म्हणून माझ्यावर चिडू नकोस वैभव. आज चिडलास तर तो राग मी कमी करणार नाहीये.” संपूर्ण कार्यालयात शांतता पसरली होती. सगळे जण आपापल्या खुर्च्यात स्तब्भ बसले होते. एखाद खुर्ची सरकवण्याचा आवाज आला. एक खोकण्याचा आणि एका लहान बाळाच्या रडण्याचाबाळाची आई नेमकं आत्ताच बाळ का रडलं म्हणून अस्वस्थ होते. त्याला झोके देणे, हलवणे, कानात गुणगुणणे असे प्रकार सुरु करते. बाळाचे बाबा बाळाच्या आईकडे चिडून नजर टाकतात. तिला अजूनच कानकोंडं होतं. “असू दे गं.” स्टेजवरुन सुषमाचा आवाज येतो. “लहान मूल म्हटलं की रडणारंच आणि त्यात तुझी काहीही चूक नाही. तू काही त्याला टाचणी लावलेली नाहीस आणि बाबा आलाय ना बाळाचा?” तिच्या नवऱ्यानी दचकून बघितलं. शाळेत असल्यासारखा तो उभाच राहिला. “बघ आलाय की हा. बाळाला शांतं करणं ही तुम्हा दोघांची जबाबदारी ना? मग दे त्याच्याकडे. बाबा पिल्लुला करतील गप. मी काय बोलतीये ते तू ऐकणं जास्त महत्वाचं आहे. दे त्याच्याकडे.” तिला कानकोंडं झालं होतं पण त्यानी हसऱ्या चेहऱ्यानी ते मूल घेतलं आणि तो खोलीबाहेर पडला. “हे असं माझ्याही बाबतीत घडलं. नवरे वाईट आहेत म्हणून नाही पण आपण कशी मदत करावी हे त्यांचा कधी कळलं नाही म्हणून. आजकाल काही बायकांना कळलंय की नवऱ्यांचं काय सहन करायचं आणि काय नाही. काही अजूनही माझ्या सारख्या बाळटंच राहिल्या आहेत. म्हणजे तुझ्यासारख्या.” ती मुकाटपणे खाली बसली. सुषमानी वैभवकडे बघितलं. तो रागात, संतापात तिच्याकडे बघत होता. सुषमानी माईक सोडला. ती चालत खाली आली. त्याच्यासमोर उभी राहिली.”

कसलातरी आवाज होत होता. सुषमाला काही कळत नव्हतं. कशीबशी जागी झाली तर तिचा नातू एक स्टीलचा डबा तिच्या डोक्याशी वाजवत होता. “Happpy bdday Ajju…” “अरे bdday नाही, anniversary!” “Happy aaniver… sary… Ajju…” सगळे दंगा करत होते. मुलगा ही आला होता. सून दारात उभी होती. नक्की किती वाजलेत बघायला सुषमानी मान तिरपी केली तर भिंतीवर नवीन घड्याळ आलेलं तिला दिसलं. Anniversary सुरु होत होती. ते speech स्वप्नात दिलं होतं. “तुमच्या आवडीचा गोडाचा शिरा केलाय मी… आणि आईनी घातलेलं कैरीचं लोणचं घेऊन आलीये येताना.” सुनेचा आवाज. “ती एक फार फार चांगली मुलगी आहे. तिला सोडून जाताना फार वाईट वाटेल. तिला वाटेल का?” सुषमाचा विचार चालूच होता. “Ohk!! आधी सांगावं नाही का लागणार?? की बाई मला हे घर सोडून जायचंय…” नाश्त्यासाठी सगळे जमले. संध्याकाळी बाहेर जेवायला कुठे जाऊया चर्चा होती म्हणजे तो संध्याकाळचा imagine केलेला कार्यक्रम पण स्वप्नातलाच. “मला थोडं बोलायचंय. वैभव खास करुन तुझ्याशी…” मुलांनी चिडवायला सुरुवात केली. “गंभीर आहे पण दुःखद नाहीये आणि मुलांसमोरच बोलायचंय. आपण फार वेगळ्या व्यक्ती आहोत. संसार केला आपण पण संसार कमी आणि तडजोड जास्त केली. इतके वेगळे स्वभाव इतक्या वेगळ्या आवडीनिवडी की सतत डोक्यावर बर्फ ठेवून वावरलो. अनेकदा तुझ्या नजरेत मला दिसलं की अशी बायको हवी होती. एखादी ओळखीची बाई भेटली, बोलली की ही परीक्षा तू नेहमी बघतोस. मी ही तेच करते. तुला ठाऊक असेलंच. मुलंही अनेकदा म्हणाली. तुमचा संसार टिकलाच कसा? आई तू बाबांना ४० वर्ष सहने केलंस? बाबांनी ४० वर्ष कशी काढली?? जे काही असले ते पण divorce घेण्याची ना आपल्यात पद्धत होती ना माझ़्यात तेवढी ताकद होती. पण आता ते बळ आलंय. घाबरु नका मी divorce मागत नाहीये. फक्त मुक्त व्हायचंय मला. हा नाश्ता झाला की माझी बॅग घेऊन मी निघून जाईन. मोबाईल इथेच ठेवेन. असं समजा आई हरवली आणि तिची स्मृती गेली. किंवा असं समजा की आईला आपण नकोसे झालो. जे की खरंय. मला हा कलकलाट नकोय.” “आज्जु मी नाई दंगा करणार!” “सुषमाचे डोळे भरुन आले. या… या अशा कारणांमुळेच आजवर मला हे घर सोडणं शक्य झालं नव्हतं.” तिनी शांतपणे शिरा खाल्ला. खोणीच खाऊ शकलं नाही. ती उठून आत गेली… टेबलवर सगळे April fool असणार असा समज करुन बसले. “पण अजून तर मार्च संपतोय!” अशी भाबडी वाक्य त्या बाळानी टाकली. सगळे मजा बघायला थांबले होते. तयार झालेली सुषमा बाहेर आली. दोन मोठ्या बॅग्ज ढकलत निघाली. सगळे तसेच थांबले होते. तिची मागे फिरण्याची पंचाईत बघत. पण ती डोळ्यासमोर गेली सुद्धा. मुलानी हसत फोन लावला. तो आतल्या खोलीत वाजला… त्याला प्रचंड भीती वाटू लागली. तो खाली पोचला. धावत ती बसली त्या रिक्षामागे धावला. रिक्षा इतपत लांब होती की तिचा नंबर दिसणार नाही! सुषमा घर, दार, नवरा, पोरं, बाळं, नातवंडं, जबाबदाऱ्या, stress सगळं सोडून निघून गेली होती. आकाशात संधी प्रकाश पडला होता. भगवा पिवळा रंग भरुन राहिला होता.

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: