तीच मळकी डब्याची पिशवी. मुळातच मळखाऊ रंगात विकत घेतलेली. झिजलेले बूट, विरलेली बॅग आणि दमलेले बाबा. वर्षानुवर्षे ते त्याच कंपनीचे उंबरे झिजवत आहेत. कंपनीचा मालक बदलला. रिनोवेशन नंतर उंबरे बदलेले ते पण ते झिजवणारे माझे बाबा काही बदलले नाहीत. एकाच कंपनीत आयुष्यभर काम करणं म्हणजे प्रामाणिकपणा, चिकाटी, जिद्द, कंपनीचा आपल्यावर असलेला विश्वास, असं सगळं त्यांना वाटायचं. काका सांगायचा की नवीन नवीन काम म्हणजे आपल्याला असणारी आणि वेळोवेळी वाढत जाणारी मागणी, किंमत आणि अाव्हानं. पण बाबांना ते कधी पटलंच नाही. काका आमच्या घरातून नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाला. बाबांना त्याची सिमेंटची बिल्डिंग भकास वाटली. ते त्याच दाराच्या खिट्टीशी लढत रोज खुडबुड करुन, दाराशी कुस्ती खेळून एका लाथेत तोडता येणारं दार महाद्वार समजून रात्री लावून घेत राहिले. काकानं मोठी लांब सडक गाडी घेतली, ते तिला ट्रॅफिकचं आमंत्रण म्हणून त्यांच्या बजाज प्रियावर ढांग टाकून निघून गेले. मी आई अाणि ताई त्यांची सतत कीव करत राहिलो. मला वाटायचं बाबांना कशाची हौस नाही. पण आमचा खडखडता रेडिओ एकही दिवस गायला नाही असं झालं नाही. त्या गाण्यावर त्यांनी ताल धरला नाही, असंही झालं नाही. पगार झाला की बाबा चुकता माझ्यासाठी पेन आणायचे. ताईला ड्रेस आणि आईला वर्षातून एकदा हलके पैंजण. आई ते आनंदानी मिरवायची. ती बाबांना चहा देताना त्या पैंजणांचा हलका नाद आला की बाबांच्या चेहऱ्यावर अजाणतेपणी एक हसू खुलायचं. हातातला पेपर खाली करुन ते कधी आईकडे बघायचे मात्र नाहीत.

सकाळचा गजर झाला की झोपेतही बाबा मला आवरताना दिसायचे. त्यांच्या बूट पॉलिशचा आवाज माझ्या कानात घुमायचा. आईचस कढईवर आपटलेला झारा, बाबांचं ड्रॉवर बंद करताना आईला हाक मारणं, तिचं टेबलवर डबा ठेवणं, हे सगळं माझ्या बंद डोळ्यांसमोर येत रहायचं. हाच त्यांचा तोच तो पणा. त्यांचा तोच पगार. त्याच भाज्या आणि रविवारची वाट पहाणं मला खूप त्रास देई. मनःस्ताप. हे कधीच या साच्यातून बाहेर पडणार नाहीत आणि मला पडू देणार नाहीत अशी मला खात्री होती. एक डिग्री घेऊन माझ्या हातात एक डबा आला की त्यांना अानंद होणार, घरात बायको आली की परमानंद आणि मुलं झाली की माझ्या आयुष्याचं सार्थक. हेच घोकत मी इथवर आलो. इतवर म्हणजे घर सोडून जायच्या निर्णयापर्यंत आणि तो सांगून टाकावा या दिवसापर्यंत!

आमच्याच घरातील एक संध्याकाळ. पावसाची. भज्यांची. वाफाळत्या चहाची. रेडिओच्या मैफिलीची आणि रिझल्टची. काका त्याच्या मुलाची अॅडमिशन अमेरिकेत झाल्याचं सांगायला आला. बाबांना फारसं आवडलंच नव्हतं पण काकाला मात्र मुलाचा प्रचंड अभिमान होता. आईनी पटकन सुधारस आणि गरम पोळ्या केल्या. सगळे जेवले. काका परदेशातल्या एेकलेल्या गोष्टी आम्हाला रंगवून सांगत राहिला. बाबा त्यांच्या कंपनीवर कसे इतर देश अवलंबून आहेत हे परत परत सांगू लागले. गाण्याच्या मैफलीत जशी जुगलबंदी होते तशी दोन भावांची आपापल्या रहाणीमानासाठी जुगलबंदी रंगली होती. ताईनी काकाचा गट निवडला. आईनी बाबांचा. मी चोरुन दिलेल्या परदेशात जायच्या परिक्षेचा निकाल पोटात दाबून तटस्थ होतो. इथून जाणं हा पर्याय मी घरच्यांपासून सुटका या कारणासाठी निवडला होता. माझ्या दमलेल्या बाबांपासून सुटका आणि बाबांची त्यांच्या दमवणाऱ्या कामापासून सुटका. शेवटी बाबाच जिंकले. पैसे हा एकच मोठा फायदा सोडला तर त्याच्याकडे काहीच नव्हतं.

काकाने आणलेलं पान खाल्लं अाणि सेलिब्रेशन संपवून तो गेला. आजची पिढी पैशाच्या मागे कशी धावते आहे यावर बाबा नेहमीप्रमाणे लेक्चर देत होते. मी अर्धनिम्मंच एेकत होतो. ताईचं तर सगळं लक्ष फोनमध्येच होतं. चालता चालता घराचा चौक आला. नेहमीच्या पानवाल्यानं हसून हात केला. बाबा म्हणाले अजून एक खाऊया. पानवाल्यानं कमी गुलकंद आणि टुटीफृटी टाकता माझं पान केलं. मगाचच्या मॉलमधल्या पानाची गोडमिट्ट होऊन बसलेलं तोंड आता नवीन पानाची चव अनुभवू लागलं. बरं वाटलं. बाबा म्हणाले, “बघ बेटा, अशी भरकटतात माणसं. जागा, पैसा, लत्ता यानं काही कमी जास्त होतं नाही. होत असतील तर ती माणसंच. निर्जीव वस्तूत रमण्याइतके का आपण उथळ झालोय? रमावं तर ते माणसात. समोरुन साद मिळते आणि मग सार्थक होतं. माझ्या कंपनीचा भोंगा माझी साद आहे. तू तुझ़्या गिटारवरची धूळ झटक. चष्मा पुसल्यासारखं लख्ख वाटेल.”

आमची पावलं घराकडे वळली. माझे मागासलेले, बुरसटलेल्या विचारांचे बाबा अगदीच टाकाऊ नाहीत अशी खात्री पटली. बाबांना या थराला जाऊन मनात नावं ठेवणारा मी विसरलो होतो. बाप बाप असतो. माझ्या वयाच्या जोशात त्याला थकलेला म्हणणारा मी लिफ्ट वापरणारा आहे. बाबांना चांगलं माहित होतं, वरच्या मजल्यावर पोहोचायला किती पायऱ्या चढायला लागतात. एकच बिल्डिंग धरुन बसणारे ते दुसरीला घाबरलेले नाहीत. फक्त रममाण झाले आहेत. प्रत्येक मजल्यावरच्या प्रत्येक पाटीत आणि नावामागच्या सजीव माणसांत! खोलवर! पुढं जाणं म्हणजे चांगलं आणि एका जागेवर थांबणं म्हणजे वाईट यावर बाबा आणि काकांनी मला खूप विचार करायला लावला. त्यात जिंकणं, हरणं नाहीये. आपल्याला जे हवंय ते ठामपणे जगणं आहे फक्त!

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

One Comment on “रमलेल्या बाबाची कहाणी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: