एका सुंदर सकाळी वेदिका चालायला म्हणून बाहेर पडली. पारिजातकाचा सडा बघून मन अजूनच प्रसन्न झालं. नुकतीच एक अवेळी पडून गेलेली सर होतीच प्रसन्नता वाढवायला. बघू तिथे झाडं बहरलेली होती आणि फांद्यांवर पक्षी किलबिलाट करत होते. थांबून तिनं परिसरावर एक नजर टाकली आणि पारिजातकाच्या सड्याच्या मधनं, एकाही फुलावर पाय न पडू देता ती त्याला ओलांडून गेली. वाटेत एक कुत्र लागलं. तिला त्यांची भयंकर भीती. पण तिनी मान खाली घालून तिचं चालणं चालू ठेवलं आणि तो निघून गेला, त्याच्या मार्गानी. तिला पक्क माहित होता. मुक्या प्राण्यांवर प्रेम करायचं असतं. प्रेम करणं म्हणजे हात लावणं, कुरवाळणं असंच नाही. तर प्रेमाची व्याख्या कधी कधी त्यांच्यापासून लांब रहाणं अशीही असू शकते. कोणालाच आपला त्रास न होणं याची काळजी घेणं हे ही एक प्रकारचं कुरवाळणंच की. तिला पक्कं माहित होतं.
एक रस्ता क्रॉस करुन गल्ली बदलली. तिला रस्त्यात दोन मुलं ओंडवी बसलेली दिसली. काहीतरी होतं, जे ती मुलं मन लावून बघत होती. तिला रहावलं नाही. ती ही खाली बसली. त्यांच्या सारखीच ओंडवी. “काय बघताय. मला पण सांगा ना!”. ती दोघं खुदकन् हसली. “या फुलपाखराला अर्धाच पंख आहे.” तिला फार वाईट वाटलं. पण त्या फुलपाखराला हात लावायची हिंमत मात्र तिच्यात नव्हती. तिनी त्या मुलांनाच सांगितलं की “त्याला उचलून कुठे सावलीत, कोणत्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये ठेवता का? म्हणजे ते जगेल.” “मरु दे की मेलं तर. मस्त लाल लाल रक्त फ्लो होईल.” “त्याला आपण धरुन आपटुया का?” वेदिकाला काय बोलावं कळेना. पण त्याला उचलून बाजूलाही करता येईना. मुलं त्यांची बॅट घेऊन पळून गेली.
वेदिकानी रस्त्यातून जाणाऱ्या एका माणसाची मदत मागितली. “अहो एका फुलपाखराला वाचवायचंय. जरा येता का?” वेदिकाला कोणी वेडी म्हणून त्यानी तुच्छ नजरेनी बाद करुन तो निघून गेला. त्यानंतर तिनी एका मागून एक दोन तीन लोकांना हाका मारल्या. कोणीच आलं नाही. ती क्रिकेट खेळणारी मुलं साधारण पाचवी सहावीत असतील. ते मध्ये मध्ये वेदिकाकडे नजर टाकून तिला वेड्यात काढत होतेच. वेदिकानं जवळून जाणाऱ्या फेरीवाल्याला थांबवलं. तो म्हणाला की तुमचा वेळ जात नाहीये. वेदिकाला मात्र फार फार वेळ जातोय यात असं वाटत होतं. तिला घरी जाऊन काय काय करायचंय हे तिनं रात्रीच लिहून ठेवलं होतं. त्या फुलपाखरा भोवती तिनी चार दगडं लावली. कोणी गाडी वरुन जाताना पडू नये म्हणून आजूबाजूला पडलेल्या काही फांद्या भोवतालनी खोचल्या आणि निघाली.
थेट घरी आली. डायनिंग टेबलवर सगळे बसले होते. तिनं भास्करला सांगितलं. “माझ्या बरोबर लगेच ये.” तो पोहे टाकून उठला. वेदिका कधीच अशी विनाकारण बोलवत नाही. रोहन पण लगेच उठला, “मी पण येतो.” बाकी सुप्रिया आणि विनीत आज काय नवीन? सनडे स्पेशल असेल या आविर्भावात पोहे खातच राहिले.
तिघं घाईनी त्या जागेपाशी पोहचले. कोणीच ते दगड हलवले नव्हते. जसा फुलपाखला जीवन द्यायला कोणाला वेळ नव्हता तसाच यासाठी ही वेळ नव्हता. त्यात नक्की खड्डा आहे की काय हे तरी कोणी कशाला बघितलं असेल? रोहननी पटकन एका पानावर ते फुलपाखरु घेतलं. भास्करनी ते कोपऱ्यात सरकवून ठेवलं आणि रविवार सकाळच्या ‘सनडे, फनडे’ अशा मूड मध्ये तिघं एकमेकांचा हात धरुन घरी चालत गेले. लिफ्टचं बटण दाबायला रोहनला दोन उड्या मारायला लागल्या. दार उगडल्यावर वेदिकानी भास्करला हात दिला. घाईत त्यानी त्याची काठी घरीच ठेवली होती. वेदिकानी तिचा स्पॉन्डिलायटिसचा बेल्ट काढून जरा वारं घेतलं. तीन रिकामटेकड्या अाणि वेड्या लोकांची सकाळ त्यांच्यामते सार्थकी लागली होती. वय नाही तरी निरागसपणानी त्यांना बांधलं होतं.
शेवट खूप छान केला आहेस. Spondylitis मुळे ती वारू शकत नव्हती. मस्त लघूकथा सायली. 👏👏
LikeLike
वाकू
LikeLike