तोंडातून मोठ्यमोठ्या आरोळ्या देण्याचा ती प्रयत्न करत होती. हातपाय झाडत होती. स्वतःला सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण यातलं काहीच शक्य नव्हतं. दोन मोठ्या दोऱ्यांनी, म्हणजे दोरखंडच जवळजवळ बरंका! तर दोन मोठ्या दोऱ्यांनी एका पुरातन लाकडी खुर्चीला रमाला बांधून ठेवलं होतं. तिला मरणप्राय यातना होत होत्या. घाम फुटला होता. मनानी ती खचली होती. पण आता तिसरा तास होता की ती भूकपाणी याशिवाय एका खुर्चीत अडकून पडली होती. त्या तोंडाला लावलेल्या मोठ्या चिकटपट्टीच्या आत बेंबीच्या देठापासून ओरडून ओरडून घसा पार सुकला, सुजला आणि लालेलाल झाला होता. स्वतःच्या सख्ख्या मुलांनी तिच्यावर ही वेळ आणली होती. मुलानी बांधलं होतं अाणि मुलीनी ती पट्टी लावली होती. नवरा कोपऱ्यात शांतपणे उभा होता पण एकही चकार त्यानी काढला नाही. तशीच ओरडून ओरडून रमा झोपी गेली. खरंतर निपचित पडली आणि डोळ्यासमोर काहीबाही तरळू लागलं.

भिंतीवरचं घड्याळ बंद पडलं होतं. सकाळची घाई होती. रमाची आता चिडचिड होते की काय असा रंग घरातल्या सगळ्यांना दिसत होता. पण प्रत्येक जण आपापल्या परीनी कामात होते. रमाचा मोबाईल किचनच्या ओट्यावर होताच. त्यावर दर पाच मिनिटांचे अलार्म लावलेले होते. तिला सगळ्यांचा चहा करायचा होता. सगळ्यांचा म्हणजे तिचा आणि नवऱ्याचा. मुलासाठी कॉफी. मुलीसाठी हळद दूध. सध्या मुलगी पी हळदच्या मूडमध्ये होती. मुलाला पाच हाका मारुन उठवायचं होतं. मग त्याची कॉफी परत एकदा गरम करायची होती. तो आला तर ठीक नाहीतर मुलीला आंघोळीला धाडायचं होतं आणि नवऱ्याला दाढी करायला. मग परत एकदा मुलाला ब्रश करायला. मग कॉफी गरम राहिली तर ठीक नाहीतर परत गरम करायची. त्यात जर साय, सायटं यांच्या कुटुंबातलं कोणीही असेल तरी त्यांची पाठवणी करुन ती कॉफी दुसऱ्या कपात ओतायची होती. मग मुलगा येणार आणि कॉफीचं इनस्पेक्शन करणार. मग त्याला समजवायचं की यात काही काहीही सायटं बियटं नाहीये. तो पर्यंत इकडे कणीक भिजलेली असते अाणि भाजी शिजलेली असते. मग तिला त्या नाश्त्याच्याच ताटल्यांमध्ये नाश्ता काढून त्या पोह्यांवर खोबरंकोथिंबीर घालून म्हणजे ह्यांना थोडं खोबरंथोडी कोथिंबीर, तिला थोडं खोबरंभरपूर कोथिंबीर, त्याला खूप खोबरंथोडी कोथिंबीर आणि स्वतःला उरलेलं सगळं ताटलीत ढकलून तिला विसळून कशावर तरी ते झाकण टाकायचं होतं. मग डब्याच्या अनेक तऱ्हा, त्यात भाजी, कोशिंबीर, पोळ्या, ताक. मुलासाठी अंडीबलक काढलेली, मुलीला काकड्या जास्त, नवऱ्याला फरसाण. हे सगळं नाही केलं तर म्हणे वरुन कोणीतरी बघतो अाणि तिला पाप लागतं. त्यामुळे हे सगळं करायचं अाणि अजून अजून करायचं अाणि ओढवून घ्यायचं. कारण तिला या सगळ्यांपेक्षा अॉफिसला वीस मिनिटं उशीरा निघायचं असतं, मग तो वेळ उरला तर? बापरे केवढं पाप होईल? नको नको. आपण एक काम करुया. ढोकळ्यासाठी पटकन डाळ घालुया का भिजत? ओके. घातली.

तसं रमाला फार काम नसतं. अॉफिस झालं की ती आईकडे चक्कर टाकते. तिथे त्यांचा टीव्हीचा रिमोट चालत नसतो, नाहीतर पत्र आलेलं असतं अाणि वाचायला जमत नाही. किंवा नळ बंद पडतो, पाणी येत नाही, ते साबणावरुन घसरुन पडतात अाणि काहीच झालं नाही तर आयुष्याला कंटाळतात. मग त्यांना समजवायचं. ते झालं की पटकन गाडीवर बसून चटकन घरी जाऊन, मिनिटात इंस्टंट नसलेला ढोकळा करायचा, मग भाकरी, भाजी, आमटी, भात मग जास्त काही नाही. उद्याची भाजी चिरायची आणि झोपायला जायचं. पण लगेच झोपायचं नाही. कारण आल्या आल्या लावलेल्या टीव्हीवरची शेवटची सिरियल सुरु असते अाणि लायब्ररी नाही का? होच की. ती आहेच की. तिचं पुस्तक पूर्ण करायचं असतं. मग ते वाचता वाचता १२ वाजतात अाणि झोप उडते. पण मग काय करायचं असा प्रश्न नाही पडत. तिचे कुर्ते असतात ना अल्टर करायला. शर्टाची बटणं असतात लावायला. काहीच नाही तर मग एक कप्पा आवरुन होतो. मग झोपायचं. वॉचमनच्या आधी आपण झोपलो तर मग पाप लागतं म्हणे!

सकाळी अलार्म वाजतो पण आपण अलार्मनी नाही उठायचं. रमा काय करते ठाऊक आहे? अलार्म कधी वाजेल याची वाट बघत बसते. “आई तुला जाग कशी गं येते?” असा एक आळोख्यापिळोख्यातला प्रश्न आला कीदोन मुलांची आई झालं की उडते झोप.” असं म्हणून त्या गरीब बिचाऱ्या निरागसाची झोप उडवायची. मग दिवस आदल्या दिवशी सारखाच असतो पण जास्त नाही. दोन तीन गोष्टी त्यात वाढलेल्या असतात. कालच्या इतकंच आज काम केलं तर कसं चालेल? प्रगती नावाची काही गोष्ट आहे की नाही जगात?

रमाला हलकी जाग आली. तिला आठवलं मटकी फडक्यात बांधून ठेवली आहे. जास्त मोड आलेले चालत नाही. फोन चार्जिंगला लावायचा राहिला. आईनी फोन केला तर? आणि आॅफिसचं काम घरी आणलेलं. ते पूर्ण नाही झालं तर मग खरंच काही खरं नाही. केवढं मोठं पाप!!! पापांची बेरीजच व्हायची! तिच्या तोंडावरची पट्टी काढली गेली. हात मोकळे केले. मुलगी थर्ड डिग्री द्यायला यावी तशी जवळ आली. म्हणाली, लोकं दारुची नशा करतात. कोणी खिशात पुड्या ठेवतं. तुझ्या पर्समध्ये एक संपणारा एनर्जी सोर्स आहे. तो आम्हाला दे! रमा कावरीबावरी झाली. मुलांनी काही मागितलं आणि मी दिलं नाही तर मोठंच पाप. पण हे कसं देऊ??? मुलगा म्हणाला, “आई तू आता रिटायर होते आहेस. तो एनर्जी सोर्स आम्हाला दे.” तिला पळून जायचं होतं. पण बंद खोली, अंधारी. तिला काहीच ओळखीचं वाटेना!!! तिनी परत एकदा डोळे मिटून ते जुनं स्वप्न पहायचा प्रयत्न केला. ते ही जमेना.

रमाला दचकून परत एकदा जाग आली. सारं घर निवांत झोपलं होतं. बघितलं तर अलार्म व्हायला दोन मिनिटं होती. तिला आनंदाची उकळी फुटली. टुणकन्उठून ती बांधलेली मटकी बघायला उठली. बेक्कार स्वप्न होतं असं म्हणायच्या आधी त्याच्या आफ्टर पार्टीसाठी आज घरी गुलाबजाम करायचा तिनी चंग बांधला सुद्धा! आणि हो. मुलीला गुलाबजाम आवडत नाहीत त्यामुळे कुडकुड साखर वाजणारं, केशर घातलेलं, भरपूर चारोळी भुरभुरवलेलं पांढरं श्रीखंड! पुरीबरोबर!!! पुण्यच, पुण्य!!

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: