“तुम्हारे ममी पापा इतने झगडते है, तुमको कैसा लगता होगा?” जेवणाचं ताट भरुन घेताना ‘क’ व्यक्तीनी मेहेरला प्रश्न केला. तिनी उत्तर दिलं नाही. ती उद्धट, उर्मठ आहे म्हणून नाही, पण तिला उत्तर माहितच नव्हतं. आई–बाबा भांडले तर मग काय? म्हणजे त्यानी मला काय वाटतं? काहीही वाटेल, त्यानी हिला काय फरक पडत असावा? “एेसे, फिल्मो की लोनली चाईल्ड जैसा फील होता होगा!”. “नही एेसा कुछ नही होता.” त्या ‘क’ व्यक्तीला पुरेसं मनोरंजन मिळावं नसावं. त्यामुळे तिनी जेवणाच्या बफे लाईन मधल्या भरभरुन पापड घेणाऱ्या ‘ब’ व्यक्तीला यात ओढलं. ‘ब’ व्यक्तीला रोज जेवताना टीव्ही बघण्याची सवय असावी. त्यामुळे ‘ब’ व्यक्तीनी पुढचा एपिसोड गेस केला. “त्यांचा डोवोर्स होणार आहे का?” मेहेरला कळून चुकलं की आता यांना आवर घालायलाच हवा. जेवणाची ताटं घेऊन तिघी त्यांचा त्यांचा गोल करुन बसल्या. मेहेरनी स्पष्टपणे सांगितलं की डिवोर्सचा तिला चान्स वाटत नाहीये. कारण ती लहान असल्यापासून आई–बाबा भांडत आहेत अाणि तिला लग्नासाठी बघतायेत. त्यामुळे एवढे दिवसात न घडलेली डिवोर्सची घटना आता कुठून घडावी. ‘ब’ व्यक्तीलाही मनोरंजन मिळेनासं झालं. “इतकी वाईट नाहीये माझी फॅमिली. फक्त भांडणं होतात. कारण मतभेद आहेत. पण सगळे सगळ्यांसाठी चांगलंच मागतात देवाकडे!”
आज खूप दिवसांनी मेहेरनी तिची डायरी बाहेर काढली. ती नेहमी ठरवायची की आजपासून डायरी लिहायची. एक दोन दिवस लिहिली मग वाटायचं हेच जे आज घडलं, परत तेच काय सगळं लिहित बसायचं? त्यामुळे मग सोडून द्यायची. त्या डायरीत ३–४ वर्षातून एखादी नोंद जाते. मेहेरला आज लिहून काढायचं होतं की तिचे आई–बाबा का चांगले आहेत? ही बाब रोज घडणारी नव्हती, त्यामुळे या लिखाणात तोच तो पणा नव्हता. तिला कुठेतरी नोंद करायची होती की त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. ते एकमेकांसाठी जगत नसले तरी एकमेकांबरोबर जगतात अाणि त्यात त्यांना आनंद आहे. तिला डायरीत लिहायचं होतं. मनात कोरायचं होतं. तिचे आई–बाबा एकमेकांशी भांडले तरी दोघांचं तिच्याशी प्रेमाचं नातं होतं आणि केव्हाही मेहेरचा विषय निघाला की त्यांचं एकमत व्हायचं. आई तिलाच सांगायची की बघ ना बाबा कसं करतो! आणि बाबा नंतर येऊन विचारायचे की आई आली का? बोलली का तुझ्याशी? राग गेलाय का तिचा? ह्या पर्सनल गोष्टी कुठे कळणार ‘ब’ आणि ‘क’ ला? आणि सांगणार तरी कशा? पण घराच्या खिडकीतून मात्र भांडणाचेच तर आवाज बाहेर जातात.
आधी मेहेरला खूप राग यायचा असं बोलणाऱ्या, विचारणाऱ्या लोकांचा पण मग तिनीच स्वतःला समजावलं की मी आईबाबांना एकमेकांचा हात धरुन समुद्र किनारी फिरताना बघितलंय, बाबाला आईच्या तापात डोक्यावर घड्या ठेवताना बघितलंय. ताप नसताना तिच्या डोक्याला ताप करतानाही बघितलंय अाणि आईला रागात, भांडणात, चिडचिडीत, आदळआपटीतही त्याच्यासाठी स्वयंपाक करताना बघितलंय. हे कुठे आणि कोणाकोणाला जाऊन सांगणार? मोठी भांडणं आवाजामुळे चार भिंतीत राहत नाहीत. छोटी भांडणं छोटी असतात म्हणून ती चार भिंतीत ठेवायची गरज नसते.
एकदा मेहेरनी तिच्या डायरीत लिहिलं की मला माझ्या आईबाबांच्या नात्याची लाज वाटते, कारण ते भांडतात. आईनी ते चुकून वाचलं आणि त्याविषयी मेहेरशी एकही शब्द बोलली नाही. मेहेरला हे कळलं पण आई समोर हा विषय काढायची तिची तरी हिंमत कुठे झाली? त्या दिवसापासून ती आजपर्यंत त्यांच्या नात्यातल्या चांगल्या गोष्टी शोधते आहे. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ती स्वतः. भांडण कुठूनही सुरु होऊदे. ते थांबतं मेहेरपाशी आणि मेहेरसाठी. मग एक दिवस तिला वाटलं की हा त्रिकोण आहे. कुटुंबाचा त्रिकोण. यात प्रेम आहे पण तणाव सुद्धा आहे. कमीजास्त प्रमाणात प्रत्येक कुटुंबात असतो. प्रत्येकाच्या हातात दोन टोकं आहेत. समोरच्यानी ओढलं की आपण थोडं सैल सोडायचं आणि त्याच्याकडून सैल सुटलं तर जरा ताण द्यायचा. आई–बाबा हा खेळ दोघातंच खेळून कंटाळले असतील म्हणून आपल्या हातात टोकं दिली. मेहेरनी इतरांच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं, खचून जाणं म्हणजे हातातली टोकं ढिली सोडण्यासारखं आहे. तिला मनापासून पटला हा रस्सी बॅलेन्सचा खेळ.
तिनी डायरीत लिहिलं. कोणतंही नातं चांगलं, वाईट किंवा यशस्वी–अपयशी नसतं. ते फक्त असतं किंवा नसतं. आपले आई–बाबा आपल्यासाठी काय सोसतात हे आपण त्यांच्या नात्याला शेरा देऊन ठरवू नाही शकत. आपण कुटुंबाला नावं नाही ठेवू शकत. कोण जाणे आपल्या समोर हसणाऱ्या व्यक्ती बंद खोलीत झिंज्या ओढत असतील आणि चार–लोकांत टाकून बोलणारी माणसं त्यांच्या विश्वात कशी मशगूल असतील? आणि कोणी ‘ब’ आणि ‘क’ दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावताना, त्यांचे दोर खेचताना, अापले दोर कोणत्या दारात टाकून येत असतील?