नाकाला रुमाल बांधून गाऊनला नसलेला पदर खोचून उत्तरा झाडूचा झेंडा भिंतींवरुन फडकवत होती. दसरा अाणि दिवाळीची जोरदार तयारी करायला तिनी सलग दिवसांची सुट्टी आणि ते तीन दिवस फुलटाईम बाई पकडली होती. बाई झपाझप एका मागून एक कप्पे पुसत सुटली होती अाणि घराचा मोठासा भाग स्वच्छ करायला मदत करत होती. “कुठे जायचंय का घाईनी?” उत्तरानी तिची गती बघून विचारलं. तशी ती हातातलं फडकं टाकून समोर ओंडवी बसली. “पोरीला बदडायचंय!”. उत्तरासाठी हे उत्तर अनपेक्षित होतं. “बदडायचंय?”. तिनी हा प्रश्न विचारताना परत एकदा कानानी एेकला आणि आपण काय बोललो आणि एेकलं याची खातरजमा करुन घेतली. बाईचं म्हणणं होतं की कुटुंबाशी भांडून अाणि सगळ्यांचा विरोध पत्करुन मुलीला शाळेत घातलं तरी तिला त्याची किंमतच नाहीये. मुलगी मजामस्तीत जगते. उत्तरा विसरली होती, ही हिची कितवी मुलगी आणि आता कितवीत आहे. “दुसरीत”. तिनी मोठ्या अभिमानानी सांगितलं. “दुसरी?” जेवढी शक्य होईल तेवढी तुच्छता! “पास झाली का?”… “झाली पन बाकी पोरी लई मार्क आनतात”. उत्तरा मनापासून हसली. बाईच्या चेहऱ्यावर शंकाच होती. बदडायला पाहिजे की नको याचा काही सोक्ष मोक्ष झाला नव्हता. तिनी फडकं घेतलं आणि पुसायला परत सुरुवात झाली.

एक नवीन कप्पा उघडला तर त्यात खूपच धूळ होती. बाईनी त्यातनं एकेक गठ्ठे काढले आणि बाहेर आदळले. “तुला पाहिजे का रुमाल? सर्दी होईल”. उत्तरा तशी इतरांची काळजी करणारी होती. प्रेमळ होती. एक निळ्या रंगाची पिशवी बाहेर आली अाणि तिनी जोरात आपटली. आपटली त्यापेक्षा पाच पटीनी जोरात ती उत्तराला वाटली. “अगं हळू ना! केवढ्यांदा दणकवतेस?” बाईला उत्तराच्या अपसेट मूडचं कारण कळलं नव्हतं. त्या पिशवीवरुन अलगद हात फिरवत उत्तरानी आत डोकावून बघितलं. शाळेची प्रगती पुस्तकं होती. तिच्या मनाचा नकोसा वाटणारा कोपरा. आज उत्तरा किती शिकली आहे, कुठे नोकरी करते आणि किती कमवते याला फारसं महत्त्व नाही. कारण ती तिच्या कुटुंबाला, मुलांना, नवऱ्याला आणि सासूसासऱ्यांना पोसायला समर्थ आहे एवढं पुरेसं आहे. पण आजच्या या उत्तरा मागे शाळेत खूप कमी मार्क्स मिळणाऱ्या, मैत्रिणींमध्ये सतत थट्टेचा विषय होणाऱ्या उत्तराचा एक चेहरा दडला आहे. वाईट जितकं मार्कांचं वाटायचं ना, त्यापेक्षा जास्त आईच्या वागण्याचं वाटायचं. ही मंगल बाई जशी मुलीला झोडपणार अाहे, तसं आईनी आपल्याशी वागावं असं उत्तराला फार वाटायचं. पण कधीच तशी वागली नाही. कोणास ठाऊक का? आपल्यावर इतकं प्रेम असावं तिचं की तिला हातच उगारावासा वाटू नये.

तुमची आई कधी येणार आहे?” मंगल बाईनी लिंक तोडली. “येईल दिवाळीला अाणि मग कायमची इथेच राहणार आहे.” तिच्या चेहऱ्यावरची माशी हलली नाही. मान फक्त वरखाली झाली. उत्तरानी एकेक प्रगती पुस्तक उघडलं. पाचवीचं. पाचवीचा रिझल्ट लागला तेव्हा तिला खूप आलेला. आपण पहिले आलोच नाही म्हणून. आपणच सगळ्यात चांगली विद्यार्थीनी आहोत आणि आपल्याला सगळ्यात जास्त मार्क्स मिळणार याची खात्री होती. पण उत्तराचा २९ वा नंबर आला. आईनी कवटाळून जवळ घेतलं आणि म्हणाली, “अभ्यास केलास तेवढं सगळं लिहिता आलेलं दिसतंय!” आईनी ओरडायला हवं अशी तिची अपेक्षा होती. आपल्याच मुलांना काय रागवायचं? असं आई नेहमी म्हणत असे तिला. पण मग काय इतरांच्या मुलांना रागवायचं का? आणि आई बाबा रागाचलेच नाहीत तर प्रगती कशी होईल? उत्तरा अाणि आईचा एकतर्फी वाद व्हायचा. सहावीला तिनी जास्त अभ्यास केला होता. तेव्हा १४ वा नंबर आलेला. आईनी फक्त खीर केली आणि उत्तराच्या वादातच पडली नाही. मग सातवीला १२ वा, आठवीला वा वगैरे वगैरे. उत्तराला मजा वाटली. कशी काय मी दर वर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त मार्क्स मिळवत गेले? आणि अशा मुलीच्या आईनी खूष व्हायचं की तिला मारायचं? उत्तराला सगळे वादच निरर्थक वाटू लागले. काय म्हणावं कळेना.

आॅक्टोबर हीटसाठी खाली काढलेल्या माठातून ग्लासभर पाणी प्यायलं अाणि मंगललाही दिलं. मग सवयीप्रमाणे तिनी मोबाईल हातात घेतला. आईशी काही फार प्रेमाचे बंध नव्हते. म्हणजे होते पण प्रत्येक वाक्यावर भांडण व्हायचं. दोघी कधीच एकमेकांच्या कलानी घ्यायच्या नाहीत. आईला वाटायचं भांडण झालं तरी चालेल पण मुलीला योग्य तेच सांगायला हवं अाणि उत्तराला वाटायचं की कुठे आयडियल मातेचा पुतळा होऊन फिरायचंय? आता हा वाद आई आल्यावर रोजचा होणार होता. उत्तराला आईला मेसेज करावासा वाटला. नेहमी ती फोनच करायची. शेवटचा मेसेज तीन आठवडे आधीचा होता. उत्तरानी प्रमोशन झाल्याचं कळवलं होतं. आईनी वेळ घेऊन वॉट्सअॅपवर असलेल्या टाळ्या, पिपाण्या, हसरे चेहरे, केक, बीयर ग्लास आणि जे काही उपलब्ध असलेलं सगळं लाईन लावून पाठवलं होतं. तेव्हाही उत्तराला राग आलाच होता. हे प्रमोशन दोन वेळा तिच्या हातून सुटलं होतं. ते मिळालं याचं काय कौतुक, ते माझंच होतं असा तिचा ठाम विचार होता.

मंगल हात पुसत निघाली होती. उत्तरानी ठरल्याप्रमाणे शंभर रुपये काढून दिले. फ्रीजमध्ये काल आणलेला एक पेढ्याचा बॉक्स होता. “किती मिळाले म्हणालीस?” मंगलनं मान पाडूनछपन्नअसं सांगितलं. “आणि मागच्या वर्षी?”. “जाऊ दे ना ताई.” उत्तराला उत्तर हवंच होतं. “का जाऊदे? सांग”. “पहिल्या घडीला फेल झाली. मग ढकललं दुसरीत.” उत्तराचा आनंद गगनात मावेना. “अगं मग हे पेढे दे सगळ्यांना आणि मुलीला एक चॉकलेट घे माझ्याकडून. मागच्या वर्षी पेक्षा खूप बरंय की!” मंगलचया बदडायच्या प्लॅनचं पाणी झालं होतं. मंगलच्या चेहऱ्यावरची माशी हलली नाही. फक्त मान वरखाली झाली!

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: