खूप गर्दी होती आज ट्रेनला. गुरुवार दुपार आणि दुपारचं बोचरं ऊन. त्यात घाम. इतका की नुसती चिकचिक. ट्रेनमध्ये ज्याला स्पर्श होईल त्याचा घाम लागत होता. अजूनच मरगळ पसरत होती त्या वासाबरोबर. अर्धा ट्रेनचा डबा पिवळ्या रंगात रंगला होता. पिवळ्या साड्या, पिवळे कुर्ते, पिवळे टॉप्स. या सगऴया पिवळ्यांमध्ये एक धमक्क सूर्यफूल उभं होतं. रेवती. ट्रेनच्या दाराजवळ. जाडजूड कॉटनचा घेरदार कुर्ता आणि आता घट्ट जीन्स घालून. कानात मोठ्ठे मोठ्ठे झुमके, हातात एक लाईट ब्ल्यु पर्स आणि एक मोठ्ठी पिशवी. या सगळ्या बरोबर तिनी एक हसू सुद्धा घातलं होतं . आपला कोणीतरी फोटो काढतंय असं हसू. स्टेशनामागून स्टेशन जात होतं. पण स्माईल काही कमी होईना. आतून आनंदाच्या उकळ्या फुटाव्यात असं हसू. आत्ताच कोणीतरी मागणी घातलीये किंवा कोणा खास मुलाला भेटायला चालली आहे असं हसू. गालातल्या गालात वरखाली, कमीजास्त होणारं. ट्रेन थांबली. ती खाली उतरली. एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. एका अननोन नंबरवरुन मेसेज आला. .१५. तिनी घड्याळ बघितलं तर .३७. ती जोरात कुणीतरी पाठीमागे लागल्यासारखी धावू लागली. त्या पिशवीचं, पर्सचं आणि तिच्या कुर्त्याचं वजन काही कमी नव्हतं. पसाराही खूप होता. कोणीही जागा देत नव्हतं. कुर्ता जिने झाडत होता. ती परत परत तो वर धरत होती पण पिशवीचं वळ तिला त्रास देत होतं आणि एखादं टोक लोंबकळतच होतं. चेहऱ्यावरचं हसू मात्र कमी होत नव्हतं. वरच्या ब्रिजवरुन तिला ट्रेन येताना दिसली. कोणालाही धक्का देता किंवा कोणाचाही घाम आपल्याला पुसून घेता ती अंग काढून झपाझप पुढे सरकत होती. पायऱ्यांवरुन हम आपके है कौन प्रमाणे उतरत असताना काय झालं कोण जाणे तिची दिशाच बदलली आणि काही समजायच्या आत तिच्याभोवती माणसांचा घोळका तयार झाला. रेवती जमिनीवर अाडवी होती. “पिशवी? पिशवी कुठाय?” कोणीतरी तिची पिशवी तिला दिली आणि तिने आत वाकून बघितलं. तिचं महत्वाचं सामान आत असल्याचं समाधान आलं चेहऱ्यावर. नीट बघितलं तर एका मोठ्या बुटाचा ठसा तिच्या कुर्त्याच्या टोकावर उठला होता. तो बघून तिला हसूच फुटलं. “अहो बाई जरा सांभाळून. कोण डोक्यावर पाय द्यायला पन कमी करणार नाहीत.” तिथला पोलीस म्हणाला. “पाणी चांगलंय ना?” त्याचं उत्तर येण्याआधीच त्याच्या हातातली पाण्याची बाटली घेऊन पाणी प्यायला सुरुवात झाली होती. “कोनतरी धक्का देऊन पाडलं तुम्हाला”, “नाही नाही, कोणाचा तरी पाय पडला माझ्या कुर्त्यावरतिनी हसतंच सांगितलं. दोघं चालत तिथल्या अॉफिसपाशी गेले. तिनी खुर्चीवर पिशवी ठेवली आणि उभी राहिली. तो पोलीस एका कपटात खुडबुड करत होता. “फक्त बॅंडेड मिळाली तरी चालेल.” त्या खोलीतले इतर जण ही तिच्याकडे बघत होते. ती आलटून पालटून सगळ्यांकडे बघून स्माईल करत होती. ते शंकेत बुडून गेले होते. तिला बॅंडेड मिळाली. “एवढं कुठे चाललाय?” “अहो माहितीये का? अंधेरीला पोहचायचंय मला .१५ ला. कसंही करुन.” “मग आताची फास्ट घ्या ना. आधीच्या स्लो साठी कशाला एवढं धावलात?” तिच्या चेहऱ्यावर एकदम समाधान, आनंद, आशा, उत्साह, प्रसन्नता सगळं काही झळकलं. “बरं झालं मी पडले. वॉव मला फास्ट ट्रेन मिळाली. मला माहितच नव्हतं. मी नाही रोज ट्रॅवल करत ट्रेननी.” तिला घ्यायला एक शोफर ड्रिवर लिमोझीन आल्यासारखी ती उत्साहात बाहेर पडली. पोलीसांना आपल्या समोरुन जाणाऱ्या ट्रेनचं आपल्याला अप्रूप असायला हवं अशी उगाचच एक भावना चाटून गेली. “फार फाटलेलं दिसत नाहीये ना?” निघतानाही तिनी एक निखळ प्रश्न त्या पोलिसावर भिरकावला. त्यानी काहीच उत्तर दिलं नाही. त्याचा कोरा चेहरा बघून ती हसून निघून गेली. “मी पोलीस ना!” तो बाजूच्याला म्हणाला. कोणीतरी मनात म्हणालं. “पण म्हणजे माणूसच ना?” ती पळत पळत ट्रेनपाशी जाताना मागे वळून वळून तिच्या फाटलेल्या टोकाकडे बघत राहिली आणि मग शेवटच्या लेडिज डब्यात पडता चढली. चढताना मात्र मगाशी ओढली गेलेली चप्पल तुटल्याचं तिच्या लक्षात आलं. स्वतःचीच हसू आलं. बघितलं तर डब्यातल्या बऱ्याच बायकांच्या पायात चप्पल नव्हती. तिनी तिची चप्पल डब्यात बसलेल्या भंगारवालीपाशी जाऊन काढली. ह्या डब्यात गर्दी नव्हती. हा डबा कमी पिवळा होता. कमी घाम होता. जे झालं ते बरं झालं वाटायला लावणारा होता. अंधेरी स्टेशन अालं आणि एक मुलगी डब्यात शिरली. रेवती अशी हाक मारत आली आणि मग अनेकssss”, “ओहssss”, “ऊईsss” असे चित्कार निघाले. दोघींनी घट्ट मिठी मारली. आताचे घाम वेगळे होते. पिशवीतून एक डबा बाहेर आला. “मी केलाय.” रेवती अभिमानानी म्हणाली. मैत्रिणीनी बिन तक्रार तो गोळा झालेला केक खाल्ला. “ते माझं ढवळून निघालेलं प्रेम आहे.” रेवती म्हणाली आणि दोघी वेड्यासारख्या हसत सुटल्या. “मी चपलांच्या शॉपिंगच्या तयारीनी आलीये बघ आणि कुर्त्यांच्या पण” लहान मुली फ्रॉक दाखवतात तसं कौतुकानी गोल फिरून दाखवत रेवती म्हणाली. ट्रेन प्लॅटफॉर्म सोडून गेली. काही क्षण त्यांचं हसणं एेकू आलं. मग ते हसू इतरांना एक झलक द्यायला निघून गेलं. रेवतीला, तिच्या मैत्रिणीला भेटायच्या उत्कंठेपेक्षा, मैत्रिणीची उत्कंठा कैक पटीनी जास्त असत असेल, नाही का?

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: