शेवटचा अर्धा तास राहिला होता मस्टरवर सही करायला अाणि बायोमेट्रिकवर बोट उमटवायला. दर तीन सेकंदाला तिला घड्याळ बघावसं वाटत होतं. आज तिचा कामाचा शेवटचा दिवस होता. घरी स्वागत करायला कोणीही नव्हतं. मुळात घरी नोकरी सोडल्याचं कळवलंच नव्हतं. कामावर तिला कोणीही सेन्डॉफ वगैरे दिला नव्हता. ती सोडून कोणालाच याची जाणीव नव्हती की शेवटचा दिवस म्हणजे तिच्या मनात कसली चलबिचल चालू असेल. सगळे जण त्यांचा त्यांचा आनंद व्यक्त करण्यात मग्न होते. तिला वाटत होतं किमान तोंडदेखलं तरी त्यांनी एक दिवस थांबायला हवं होतं. मग केक कापून साजरा केला तिचा नसण्याचा दिवस तरी चालेल.

डोक्यावर पंखा चालू होता. साडे चार वाजले होते. निघताना घ्यायच्या चहाची वेळ झाली होती. तिनी कपाट आवरलं होतं. सगळी पुस्तकं जवळ घेतली होती. तिच्या नोट्स घेतल्या होत्या. कॉम्प्युटर वर असलेले सगळे प्रेझेन्टेशन्स डिलिट केले होते. या अर्ध्या तासात करायला काहीच नव्हतं. टीचर्स रुममध्ये अजून १० शिक्षक असून तिला एकटं पडल्यासारखं झालं होतं. ती कॉलेजमध्ये असताना तिच्या लाडक्या मॅडम याच खुर्चीत बसायच्या. त्यांच्या काल्पनिक आणि भावनिक अस्तित्वाचाच जो काय तो आधार. चहावाला आला. रोज अर्धा कप चहा तिच्याकडे बघता आदाळणारा मुलगा आज शिगोशीग कप भरत होता. तिचे हात थरथरत होते. एक ध्येय होतं. शांत बसायचं. कितीही राग आला तरी बोलायचं नाही अाणि कितीही वाटलं तरी भांडायचं नाही. सध्या ह्या कपातून चहा सांडू द्यायचा नाही. “उद्या नाय म्हनं तुमी? ते समोसा आनलेला. भेट द्यावी म्हनलं”. ती खाडकन्जागी झाली. चहावाल्या पर्यंत ही बातमी पोहचली तर? “कोण म्हणालं?”. “पोरं. गलका करुन कायबाय बोलताना एेकलं.” तिला उत्सुकता निर्माण झाली. मुलं आपल्याबद्दल वाईटच बोलणार अाणि तरीही आपण ते एेकायचं. मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी, ते चांगलंच बोलतील या आशेच्या आहारी जाऊन. “काय म्हणाली?”. “तुमची गेली, आमची बी घालवता का? कोनी पाह्यलं हितं बोलताना तर? गेलीच समजा. भेटाया या मला मागनं. सांगतो.” तिनी पुढे सरसावलेली मान भानावर येऊन मागे घेतली. तो चहावाला निघून गेला.

टीचर्सपैकी कोणालाही ती पसंत नव्हती. तिला सगळं डिटेल लागायचं. डिटेल अभ्यास, डिटेल पेपरचेकिंग अाणि मुलांना समजलंय ना नक्की याची डिटेल खात्री. ती काम झपाट्यानं करायची. पण तोच इतरांचा प्रोब्लेम झाला. कॉलेजमधल्या मुलांना आपल्याला कोणत्या दर्जाचं शिक्षण मिळू शकतं याची तिनी जाणीव वगैरे करुन दिली. मग टारगट पोरांनी भिंतीवर काहीबाही लिहिलं, कोणी बेंचवर कर्कटक चालवलं. कोणी वर्गात विमानं उडवली आणि त्यावर मेसेज लिहिले. कोणी तिला थेट मोबाईलवर गाठलं. पण तिला कधीच राग आला नाही. ती शिकत असताना तिचे मित्र मैत्रिणी हेच करायचे. तिला त्यात कधीच रस नव्हता, पटायचंही नाही. पण फक्त टाईमपास एवढाच त्यांचा उद्देश असतो हे तिला पक्कं माहित होतं. “मुलं आपली मित्र होऊ शकतात पण आपण त्यांची मैत्रिण मात्र व्हायचं नाही.” हा तिच्या लाडक्या मॅडमचा कानमंत्र तिच्या बरोबर होता.

चहावाल्यामुळे तिला कॉरिडॉरमधून जाण्याचा धीर आला. सगळे आपल्याला हसले तरी चालतील पण आपण रडलो अशी प्रिन्सिपल सरांनी केलेली तक्रार तिला नको होती. वर्गात झालेल्या त्या नकोश्या प्रकरणाचा तिला त्रास झालाच होता पण ती रडली नव्हती. वर्गात मुलांसमोर तर नाहीच नाही. आपण स्त्री आहोत म्हणून आपली केलेली मस्करी आपण आपल्या लिंगाशी जोडायची नसते. प्रत्येक पुरुष शिक्षकाला मुलं मान देतात अाणि लेडीजना टारगेट करतात असा विचारही मनाला शिवून जायची परवानगी नव्हती. तिनं अर्धा कॉरिडॉर पार केला. तिच्या वर्गात शांत बसणारा, लक्ष देणारा आणि चांगला अभ्यास करणारा एक मुलगा पायरीवर बसला होता. त्यानं तिच्याशी नजरानजर करुन एक चिठ्ठी सोडली. तो निघून गेला. ती घ्यावी तरी प्रोब्लेम अाणि सोडावी तरी. त्याला मित्र करुन घेतोय की आपण मैत्रीण होतोय याच्या काठावर असताना तिनी सरकन्चिठ्ठी घेऊन कॅंटिनची वाट धरली. घाबरतच चिठ्ठी उघडली. “नका जाऊ, नाहीतर मी शिक्षण सोडून देईन.” तिला धस्स झालं. आजकाल मुलं डिप्रेशनमध्ये जातात, आत्महत्या करतात, त्याचे आळ शिक्षकांवर येतात, खरंतर जबाबदारी येते याची तिला आठवण झाली. तिनी कॉलेजमध्ये पाऊल टाकलं त्या दिवशी तोर्यात लेक्चर दिलं होतं. “गोष्टीच्या मुळाशी जा, समजून घ्या, शिक्षणाला मार्कांचं युनिट लावू नका, शिक्षण मोजता येत नाही, फक्त घेता येतं, दिलं तरी मिळतंच रहातं. असंच शिका नाहीतर शिक्षण सोडून द्या!” त्या दिवशी तिला वाटत होतं, एक जरी विद्यार्थी असा घडला तर आपल्या आयुष्याचं चीज झालं. पण आज ती हेच ध्येय्य सोडून पळपुटेपणा करीत होती.

कॅंटिनमध्ये तिला आलेलं पाहून चहावाला तिच्यापाशी आला. एका टेबलपाशी बसला. ती ही बसली. आजूबाजूला बघितलं तर बरेच ओळखीचे चेहेरे होते, चहावाल्याबरोबर तिला बघून कुजबुजत होते. तिनी दुर्लक्ष केलं. “कशाला हितं वेळ घालवताय. आमचे आन्ना कॉलेज काढायचं म्हनतायेत. पैसा रगड . पन शिकलेलं कोनी नाई. हे असलं टाईमपासचं कॉलेज नकोय म्हनले. शिकवत्यात त्ये कॉलेज काढुया म्हनले. तुमाला पैशे दिले तर देताल का काडून?” तिला काय बोलावं काही कळेना. “हितल्या पोरांना कुटं काय येतं. नुसती येतात आनि खातात, आनि जातात. आपुन खरंसच्चं कॉलेज काढुया म्हनले.” तिनी शब्दांची जुळवाजुळव केली. “मी नाही शिकवणार आता. माझी पद्धत पटत नाही कोणाला. तुम्ही दुसऱ्या कोणाला विचारा.” तो हसायला लागला. तिला काही समजेनासं होतं. “तुमाला राग येतो की नाई हो. येड्याचा बाजार भरलाय नुसता आनि तुमी मासळी बाजाराला लावताय शिस्त. पोरांना कसले शिकवता अाधी मास्तरला शिकवा.” तो परत एकदा मोकळेपणानी हसला. “मला चालेल. पण कॉलेज पोरांसाठी नको, अशा मास्तरांसाठी काढुया का?” त्याला ही कल्पना आवडली होती. इतक्यात समोरुन एक सर दोघांकडे बघून कुत्सित हसून निघून गेले. ती शांतच होती. त्याला मात्र राग आला. “कशाला एेकून घेता? एकेकाला मुस्कटवत जा”. आता ती मोठ्यानं हसली. “मला राग येत नाही. पण मला शिकवता येतं. ते आले आपल्या कॉलेजमध्ये की समजावेन मी अशा विद्यार्थ्यांना”. दोघंही हसले. “जरा कोणी बोललं तर अंगाला भोकं पडत नाहीत. उलट उत्तर दिलं की मोकळं वाटतं आणि सोडून दिलं की शांत! मला नोकरी सोडल्याचं आज फार शांत वाटतंय!”

Photo by rawpixel.com on Pexels.com

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: