आत्तापुरतं तेल आण, बाकी यादी उद्या बघू!” आईची अत्यंत स्पष्ट शब्दात, सहज समजेल अशी अॉर्डर होती. तरीही हळूच सामानाची यादी आणि एक भली मोठी पिशवी घेऊन राणी निघाली. खरं नाव पूर्वा पण घरची राणी म्हणून सगळ्यांसाठी राणी. राणी खूप हट्टी. खरंतर हट्ट करायला सुरुवात करताच तिच्या हातात कायम गोष्टी पडायच्या, तरीही इतका हट्ट करायची कशी सवय लागली कोण जाणे. घराच्या मागच्या बाजूला दुकान होतं. चालत जाताना राणीच्या डोक्यात काय काय विचार होते. आईला वाटतंमी काही काही काम करत नाही ना? आता थांब बघ कशी सगळी कामं फटक्यात करुन दाखवते.

दुकानात पोहचल्या मात्र राणी जराशी गांगरली. दुकानदार १० गिऱ्हाईक बघत होते. राणीनी एकदोनदा अहो दादा, अहो काका म्हणायचा प्रयत्न केला, पण काहीच निश्पन्न झालं नाही. तिला याची सवय नव्हती. एकतर दुकानात ती कधी जायची नाही, त्यातून गेली तर घरचा गडी बरोबर असायचा. यादी बिदी तो बघायचा आणि राणी फक्त तिला काय हवंय त्याकडे बोट दाखवायची. पण आज गडी रजेवर होता अाणि आईनं नेमकं तळण काढलं होतं. अर्थात राणीच्याच हट्टावरुन.

तिला थोडा अपमान झाल्यासारखं वाटलं. तिच्या लाडक्या बाबाबरोबर ती कुठेही गेली की तिला पाणी मिळायचं, बसायला खुर्ची दिली जायची. इथे फक्त डोक्यावर आलेलं ऊन आणि दुर्लक्ष होतं. राणीला गल्ल्यावर बसलेला मालक दिसला. तो तसा रिकामा होता. मोबाईलवर गेम खेळण्यात. कोणी त्याला काही मागितलंच तर निरिच्छेनी कोणा गड्याकडे नजर वळवायची असं त्याचं चालू होतं. राणीनं मोर्चा त्याच्याकडे वळवला. “ मला ही यादी पटापट भरुन द्या. मला उशीर होतोय.” मुलगी जितकी सर्कीट तितकाच तो मालकही. त्याला यादी भरायला सांगणं, ते ही इतक्या गुर्मीत? “एवढं कसलं काम ? कोण लागून गेलीस तू?”, राणीनं केस ठीकठाक केले आणि बाबाच्या दुकानाच्या तपशील त्याच्या तोंडावर फेकला, आर्थिक उलाढालीचा आकडा सांगितला. “आणि एवढंच नाही, या यादीतलं तेल नेलं की आई कांदा भजी खाऊ घालणारे!” आता मालकाला राग मुलीचा कमी आणि तिच्या बापाच्या पैशाचा जास्त होता. “जा पळ, संध्याकाळी ये.” खिट्टी हलली. हट्टी राणीची खिट्टी पुरेपूर हलली. एक सोनार जर आलेल्या गिऱ्हाईकाला पाणी देऊ शकतो, घरात वावरणारा तिचा बाबा नावाचा राजा जर गिऱ्हाईकाला देव मानू शकतो तर ह्या टिचक्या दुकानाच्या मालकाला कसला त्रास? “जा. पळ? ही असली भाषा वापरता माझ्याबरोबर? किमान १००० रुपयाचं सामान नेणार होते!” मालक गालातल्या गालात त्या छोट्या मुलीची धमकी एेकून हसला. मग नंतर डोकं घालायला गेम होताच की.

राणी प्रचंड रागारागात आणि संतापात तेल घेताच तिथून निघाली. बाबा गिऱ्हाईकापुढे झुकलेले तिला कधीच आवडायचं नाही. पण त्यांच्या त्या वागण्यामागचा अर्थ तिला समजला होता. आलेल्या प्रचंड रागाचं काय करावं कळेना. राणीला तेल जाता घरी जाणं म्हणजे रणांगणातला पराभव वाटत होता. जवळपास दुसरं कुठलंच पर्यायी दुकान नव्हतं. एक दोन होती ती बंद. बाकी म्हणजे फार लांब चालत जावं लागलं असतं. खूप ऊन होतं. राणीनं मनातल्या मनात काहीतरी पण केला. परत त्याच वाण्याकडे गेली. आता थेट आत घुसली. तो वाणी खेकसला,”अक्कल बिक्कल आहे का?” मगाशी तो इतरांकडे बघून करत होता, त्यापेक्षा तिपटीनं जास्त दुर्लक्ष राणीनी केलं अाणि थेट आपल्या यादीतून ती सामान काढू लागली. मूगडाळ, तूरडाळ ओळखू येईना पटकन, मग आधी शेंगदाणे आणि खोबरं वगैरे काढायला सुरुवात केली. काही सेकंदातच दुकानात कुजबूज सुरु झाली. आजूबाजूचे बरेच तिला सराफाची मुलगी म्हणून ओळखत होते. राणीला मजा यायला लागली. तिला अशीच सवय होती. तिच्या शिंकेचं देखील कौतुक व्हावं असंच वाटायचं तिला. राणीनं जरा आत्मविश्वास आल्यावर डाळी, कडधान्य, तृणधान्यही पॅकेट पॅकेट उचलली. तिला काहीही फरक पडत नव्हता पॅकेट कमी जास्त झाली तरी. वाण्यानं तिला आता दुकानाबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्याच्या गड्यांना सांगितलं. पण कोणीच एेकेना. “ पोरी, जादा शानपणा करु नको. पोलिसाला बोलवीलत्यानी धमकी देऊन बघितली. राणी थांबली. शांत झाली. त्याच्यापाशी आली आणि त्याच्या नजरेला नजर भिडवली. उंची वाढवायला जितकं त्या पायावर उंच होता येईल तेवढं होऊन. “काय चुकीचं केलं मी? तुमचे गडी कामात होते म्हणून मी तुम्हाला यादी भरुन मागितली. पण तुम्हाला एवढा कंटाळा. देवासारख्या गिऱ्हाईकाला तुम्ही हाकलवून लावला, एवढा माज तुम्हाला. मग मी घेतलं माझ्या हातानं तर काय बिघडलं?” वाण्याकडे याचं उत्तर नव्हतं. राणीनं सगळं पिशवीत भरलं आणि निघाली. “पैसे माझा बाबा देईल. घरनं घ्या.” वाणी तसाच थांबला.

दारातून कशीबशी पिशवी उचलून राणी घरात आली आणि तिला बाबानं तिला घट्ट मिठी मारली. “आमच्या राणीसाठी बाबा लवकर आला बरंका!”. राणी खूश होती. तिला सगळं सांगायचा होतं पण आत्ता मूड वेगळाच होता. बाबानं तिला शेजारी बसवलं आणि वाढदिवसाची भेट काय हवी ते विचारलं. खमंग भज्यांचा वास येत होता. राणीनं काल ठरवलं होतं की एक पोलो मागायची आणि तिचा सेपरेट ड्रायव्हर. पण आज मन बदललं होतं.

इतक्यात बेल वाजली. आईनं घरातल्या रेश्मालाही आज सुटी दिलेली. घरात फक्त घरातली मंडळी असावीत म्हणून. त्यामुळे बाबानंच दार उघडलं. “अरे शेठ, या या या. कसं येणं केलंत?” राणीनं हळूच डोकावून पाहिलं तर तो वाणी घरी आलेला. बाबानं त्याला आत घेतलं. भजी खायला एक ताटली त्याच्या हातात आली. समोर पाण्याचा ग्लास आला अाणि गॅसवर गेलं चहाचं आधण. वाण्यानं कसंबसं सांगितलं, राणी येऊन गेल्याचं आणि बिल १८०० रुपये झाल्याचं. आता आपलं काही खरं नाही असं वाटत असतानाच बाबानं हसतमुखपणे पैसे दिले. राणीच्या चेहऱ्यावर मोठेपणाचं समाधान आलं. आईनं हातावर मलई बर्फी दिली. “बर्फी कसली?” वाणी गोंधळला. “अहो राणीच्या वाढदिवसाची!”. वाण्याला तिला शुभेच्छा देतानाही कुठे बघू कुठे नको झालेलं. पण बाबा फॉर्मात आले. “वाढदिवसाची अाणि आमच्या नवीन धंद्याची. तुमच्या दुकानाच्या बाजूचा गाळा बरेच दिवस घेऊन तसाच पडलाय. आज आमच्या लाडकीनं, राणीनं तिथं किराणा मालाचं दुकान मागितलं. आज प्रथमच एकटीनं तुमच्याकडे खरेदी केली. मनोरंजन झालं असेल!”… वाण्याला भजी आणि बर्फीतला फरक कळेनासा झाला. तो हात जोडून निरोप घेऊन निघाला. चप्पल घालताना कानावर शब्द पडत होते. “गिऱ्हाईक म्हणजे देव. आता आपले राहिलेले पैसे घ्यायला खुद्द मालक आले घरी. त्यांचा आदर्श ठेवायचा. यश मिळेल.”

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: