कोणी म्हणतं मला नदी व्हावसं वाटतं
तिला वहावं लागतं काठ सोडावे लागतात
एकाही गावात घाटावरुन शिरता येत नाही
वर्षानुवर्ष पिढ्या वाहत जातात
मनानं तिथला ठाव घेतला
तरी शरिरानं तिथं उरता येत नाही
कोणी म्हणतं मला समुद्र व्हावसं वाटतं
त्याला येणाऱ्याची वाट बघत ताटकळावं लागतं
येणाऱ्याचं नाव ठाऊक असलं
तरी मिनिटागणिक रुप बदलतं
त्याला रिझवायला येतंय
की नासवायला येतंय हे कळत नाही आल्याशिवाय
पण तरीही स्वागत तबक घेऊन करावं लागतं
कोणी म्हणतं मला आकाश व्हावसं वाटतं
त्याला वरनं सारं बघावं लागतं
त्याला बाळांना पडताना, पाडताना अाणि रडताना
नव्यानं उगवणाऱ्या हिरव्या अपत्यांना
निळ्याच्या काळ्या होणाऱ्या बिघडलेल्या पुत्रांना
तरी वेळ झाल्याशिवाय कोसळता येत नाही
प्रमाणाबाहेर कोसळावं वाटलं
तरी धरतीला निर्घृण विसळता येत नाही
पुन्हा लेकरंच जातात वाहून
अाणि ताब्यात घेतलं तर मनात जातं राहून
कोणी म्हणतं मला मी सोडून इतर कोणीही व्हायचंय
कारण मला माझं बुरं दिसतं
इतरांच्या झोळीत सगळं पुरं दिसतं
भोकं तर पावसाळ्यामागनं पडतात हरेकाच्या झोळीला
कोणी ती मोठी करुन फाकवत सुटतं
कोणी तिला चव्हट्यावर दाखवत सुटतं
कोणी खाली हात लावून ती झाकून धरतं
कोणी वाकून वाकून तिला शिगोशीघ भरतं
त्या नदीलाही सुसाट येतं की वाहता
कोणाचीही होता येतं कोणाचीच न राहता
समुद्राला पोट दिलंय सामावून घ्यायला
वाटलं तर फेकायला वाटलं लाटेनं हवं ते गिळायला
आकाशाला दिलाय मोकळा श्वास निळाई दिलीये त्याला खास
पांघरुण म्हणून सगळ्यांना शांत नीज द्यायला
आणि हळूवार सरकवून बाजूला आशेचा किरण व्हायला
सारं कसं प्रसन्न वाटतं मग आपलंपण का नाही
सारं कसं भरभराटलंय मग आपलं मन का नाही
सारे गाळतात हलकी टिपं पण हसतात त्याहून जास्त
ज्याला त्याला ज्याचा त्याचाच जन्म असतो रास्त!