“काल रात्री अापलं खूप मोठं भांडण झालं. त्याचा तुम्हा तिघांवर कितपत परिणाम झाला मला माहित नाही. पण एवढं नक्की माहित अाहे की मीदमले अाहे. प्रदीपची बायको होऊन, त्याच्या अाई–वडिलांची सून होऊन, अगणित वेळा कूकर लावून, चहा करुन, पोळ्या लाटून, कपडे मशिनला लावून, त्यांच्या घड्या घालून, कितीही दमलेली असताना कोणाला नकार न देण्याच्या माझ्या वृत्तीला, मी दमले अाहे. तुम्हा दोघांची अाई झाले, मग पर्यायानी येणाऱ्या सगळ्या गोष्टी केल्या. काही वर्षांसाठी माझी नोकरी कॉम्प्रमाईज केली, रोज दूध तापवून ते प्या म्हणत म्हणत तुमच्या मागे फिरले. परत अालेल्या डब्यांमध्ये उरलेलं अन्न बघून, ते निर्दयीपणे ओल्या कचऱ्यात टाकताना अाणि त्याच्या बॅकग्राऊंडवर “काहीतरी वेगळं देत जा ना डब्यात!” अशी कमेंट एेकून माझ़्याच वाट्याला अपराधीपणा घेऊनही मी अाता थकले अाहे. तुम्ही हे पत्र कदाचित शेवटपर्यंत वाचण्याचीही तसदी घेणार नाही. एवढा इमोशनल ड्रामा तुमच्यात चालत नसेल, मध्येच कंटाळाल. पण मला माझं मन मोकळं करायचं होतं. त्यासाठी एवढं बोलले, याच्या पुढचं मनातच राहू दे. तक्रार करायचाही अाता कंटाळा अाला अाहे. पण अाता हा कंटाळा तुमच्या पर्यंत मी पोहोचू देणार नाही. कारण परत अापण भेटूच याची खात्री नाही. तुमची… अाई/बायको.
मी घडी घातली पत्राची. बॅग काल रात्रीच भरुन ठेवली होती. सकाळी सात वाजता निघायचा प्लॅन होता. अांघोळ करुन एक पांढऱ्या रंगाचा स्टार्च केलेला, शुभ्र कुर्ता घातला. एरव्ही किचनमध्ये काम असतं, घरात काम असतं, टू व्हीलरवरुन जावं लागतं, त्यामुळे असा कुर्ता घालताच येत नाही. तो फक्त “हेमा, रेखा, जया अाणि सुष्मा”, या निरमाच्या सदासुखी मुलींनाच घालता येतो. अाज मी त्यांच्यातलीच एक अाहे. काही… काही काम करणार नाही अाणि फक्त हा सुखी बाईचा कुर्ता घालून वावरणार! ७ वाजले, निघायला तय्यार. पण विशाल अजून उठलेलाच नाही. त्याची अाठला फूटबॉलची मॅच अाहे. एक शेवटचं कर्तव्य करायचं. त्याला उठवणे. नाश्ता देणे… अाता मी फोनवर शिवनेरीची वेळापत्रकं बघायला सुरुवात केली अाहे. कुठे जायचं ठरलं नाहीये. कारण जायला माहेर नाहीये. भावाचं घर अाहे पण अजून एका थकलेल्या संसारी वहिनीला बघायची इच्छा नाहीये. त्यामुळे मी अात्ता तरी ‘कुठेही’ ह्या जागी जायचं असं ठरवलंय. प्रियांका उठली तोच तिचं पोट बिघडलेलं. फार मॅगी खाते कॉलेजमध्ये. मी लांब गेले तरी तिचं पोट बिघडलेलं मलाच चालणार नाही म्हणून डबा करुन दिला. ती खाईल याची खात्री नाही पण माझीच मनःशांती.
मुलांचं ठीक अाहे पण नवऱ्याशी मी अजिबात बोलणार नाही. त्याला जाणवायला हवं की त्याला लग्न करुन एक घरकाम करणारं, काळजी घेणारं, चालतं बोलतं जबाबदार पॅकेज मिळालंय. ते नाहीसं होईल तेव्हाच त्याला जाणवेल. अाज मीच पेपर वाचत बसले अाहे. तो नक्की हा पेपर मागणार. मागू दे. मी देणार नाही. तो चहा मागेल. मागू दे. मी देणार नाही. तो अाला. कानात इयरफोन्स, कोणाशीतरी कामाचं बोलणं चालू अाहे. पेपर एेवजी टॅबवर काहीतरी वाचतोय. अाज चहा? नाश्ता? न करता, मागता?? हा निघून चाललाय. मी बोलत नाहीये म्हणून? की हे जाणवतंच नाहीये त्याला? लॅचचा अावाज. नवरा अॉफिसला गेला. मी अाज अॉफिसला जाणार नाहीये. अाजचा दिवस हा एक वेगळा दिवस अाहे. माझ्या अायुष्याला कलाटणी देणारा दिवस! मग अाता काय करु? कशी देऊ कलाटणी? निघून जाऊ? की बसू एकटी. मस्त सोफ्यात पाय ताणून, टीव्हीसमोर लोळत?
एकटीनं मी कधी प्रवास केला नाहीये. मनात धाकधूक अाहे की कुठं जावं? गेलो तर एकटीनी हॉटेलमध्ये रहावं? संध्याकाळी ह्या लोकांनी फोन केला तर काय सांगू? कुठल्याशा गावात, कुठल्याशा हॉटलमध्ये मी राहतीये. का राहतीये? की खोटं सांगू कोणाकडे तरी अाले अाहे? अाणि जर माझ्या कष्टांची किंमत न करणाऱ्या ह्या लोकांनी फोन केलाच नाही तर काय करु?
एक पर्याय अाहे. असंच बसायचं घरात. एक ठरवून घ्यायचं, ह्या सकाळी घातलेल्या पांढऱ्या, स्टार्च केलेल्या कुर्त्याला म्हणायचं, सुखी बाईचा कुर्ता अाणि सगळी इंद्रियं बंद करुन सुखी व्हायचं. कोणत्याही चिंता मनाला लावून घ्यायच्याच नाहीत. कसंय ना, लग्न होतं तेव्हा कोणी हातात एक पत्रक देत नाही की बेसिनमध्ये भांडी पडली तर ती चूक अाहे, घर पसरलं तर ते अावरणं तुझी जबाबदारी अाहे, कामवाली बाई नाही अाली तर सगळा उकिर्डा साफ करणं तुझं कर्तव्य अाहे अाणि घरात कोणी उपाशी झोपलं तर तो तुझा अपराध अाहे. अापण का करतो ही एवढी कामं? कोणी सांगतं म्हणून नाही. कोणी खांद्यावर लादतं म्हणून नाही. पण अापलं अापल्यालाच वाटत राहातं की हे करावं–ते करावं अाणि मग अापण करत जातो. लोकांना अाश्चर्य वाटतं, मग कौतुक करतात. हळूहळू सवय होते मग कौतुक थांबतं अाणि अपेक्षा सुरु होतात. अापलं अाधीचं समाधान, त्रासात–रागात–चिडचिडीत बदलतं. जसं त्यांना अायत्याची सवय होते, तशी अापल्याला कौतुकाची. हळूहळू गणितं बिघडत जातं. परत एकदा ही अापलीच चूक असते कारण सुरुवात कोणी केली? अापणंच ना?
पण अजूनही वेळ गेलेली नाही. अाज मी हे सगळं चुकलेलं गणित निस्तरणार अाहे. अाता मला दूध दिसतंय ओट्यावर पण मी अजून ते तापवलेलं नाही. फ्रीजमध्येही ठेवणार नाहीये. कपबश्या, धुणं, दोरीवरचे कपडे, खोलीतला पसारा, अंथरुणं, पांघरुणं सगळं जसंच्या तसं अाहे. अर्धी लढाई मी जिंकलेली अाहे. पण पूर्ण तेव्हा जिंकेन जेव्हा मला संध्याकाळी ह्या अाळसाची लाज वाटणार नाही. नासलेलं दूध हा माझा गुन्हा वाटणार नाही अाणि माझे कपडे धुवून का नाही अाले? या प्रश्नावर निवांत खांदे उडवायला जमेल तेव्हा ही लढाई पूर्ण होईल.
बेल वाजली. मी सोफ्यावर पाय ताणून बसले अाहे. मी दरवाजा उघडणार नाही. नवरा जर सुट्टीचा घरी असला असता तर त्यानी ताणून दिलीच असती. इतक्या मोठ्यानं घोरतो अाणि मेल्यासारखा झोपतो की दार उघडणं अशक्यच. मला जाम वाटतंय की हा माझ्या मुलाचा पासपोर्ट अाला असेल. मी कित्ती खेटे घातलेत. फोटो काढण्यापासून ते झेरॉक्स कसा विसरलास ह्या बेसिकवर सुरु झालेला अामचा प्रवास अाज ह्या बेलपाशी तर संपला नसेल ना? अाता हा पासपोर्ट निघून गेला तर किती काम वाढेल? अात्ता १० फुटांवर अाहे, थेट १० मैलांवरच्या मुख्या पोस्ट आॅफिसमध्ये जाऊन कलेक्ट करावा लागेल. अाता? डिंगडॉंग डिंगडॉंग बेला वाजतंच अाहेत. काय करु? उघडू? उघडते.. नाही नकोच! कुरियर वाल्याला समजलं असणार. दाराला कुलुप नाहीये. तो थांबणार. येरझाऱ्या… येरझाऱ्या येरझाऱ्या येरझाऱ्या… काय करु काय करु?…. बेल थांबली. तो माणूस गेला बाबा एकदाचा… की लिफ्टपाशीच असेल? घेऊ का पासपोर्ट हाक मारुन? मरु दे!
हा ‘मरु दे’ अॅटिड्युड शिकायला पाहिजे राव. पुरुषांमध्ये तो जन्मतःच असतो का? सगळ्या म्हणत नाही हं मी? प्रत्येक बाईसाठी शेजारच्या घरातला पुरुष जास्त कामसू, कष्टकरी, अाज्ञाधारक अाणि ‘त वरुन ताक भात कळणारा’ असूच शकतो. पण किमान माझ्या सारख्या कामसू बायकांच्या अायुष्यात येणाऱ्या पुरुषांमध्ये तो नक्कीच असतो! अाणि तो मी शिकायला हवा एवढं नक्की.
अाता बघा ना.. चहाची तल्लफ अालीए. पण ते ओट्यावरचं दूध तापवावं लागणार. किंवा लागेल तेवढंच निरसं वापरलं तरी चहा करुन घ्यावा लागणार. अायता काही मिळणार नाही अाणि अायता मिळत नाही म्हटल्यावर ह्यांच्यासारखं ‘मरु दे’ असं म्हणून मला पायावर पाय ताणून काही बसता येणार नाही. सारखं ‘चहा, चहा, चहा, चहा…’ असं कानात वाजत राहणार. ह्यांचं बरंय. चहा मागून मोकळं झालं की हातात चहा हजर अाणि जर नाहीच दिला तर हे म्हणणार ‘मरु दे’ की परत त्याचं वाईट मलाच वाटणार. खापर माझ्याच माथी फुटणार. मग मलाच वाटणार की मी चहा दिला नाही अाणि गप उठून अालं घालून फक्कड चहा पुढ्यात! अात्ता अालं संपलंय घरातलं, म्हणजे हमखास कानात ‘अाल्याचा चहा अाल्याचा चहा’ असं वाजणार. खालीच तर दुकान अाहे भाजीचं. पण नाहीच जाणार मी. मुलगी अाली की तिला पिटाळणार अालं अाणायला अाणि मुलगा अाला की त्याला चहा करायला सांगणार.
बेल वाजली. अाता कोण? १२ वाजून गेले. अाता मी दार उघडणार अाहे. माझी मैत्रिण यायची होती गप्पा मारायला. ११.३– मुलीला शाळेत सोडून थेट इकडे. तसं खरंतर ठरलं नव्हतं पण मी काल रागात मेसेज केलेला तिला की “मी हे घर, हा संसार सोडून कायमची निघाले”. खात्री अाहे मला ती येणार चेक करायला. मी कुठे गेले तर नाहीना हे बघायला? ही काही माझी खूप खास मैत्रीण नाहीये. म्हणजे लग्नानंतर खास मैत्रीण उरलीच नाहीये. सासरची सव्वा लाखाची मूठ झाकता झाकता, मैत्रिणी दुरावत गेल्या. हे नको सांगायला, ते गाळून सांगू. कधी अर्धसत्य तर कधी मूग गिळून. मग मोकळं संभाषण संपतं. मैत्रीण मैत्रीण राहते पण अाधीसारखी सगळं माहित असलेली मैत्रीण नाही.
ही खास नसली तरीही तिला मी मेसेज केला, तशी ही माझी मेसेज मैत्रीणच अाहे. एरव्ही काही बोलणार नाही अाम्ही पण अधून मधून ‘पळून जावसं वाटतंय’, ‘लग्न ही एक चूकच म्हणायला हवी’ असे मेसेजेस करतो एकमेकांना. रिप्लाय मात्र करत नाही. स्वतःहून सांगितलं तर एेकून घेतो पण प्रश्न विचारत नाही. दार उघडलं. दारात एक पुरुष. “कोण पाहिजे?”.. “विशाल”… “काय काम अाहे?”. “इथे सही करा, त्याचा पासपोर्ट.” हात्तिच्या मारी. मग मगाशी येऊन गेली की काय मैत्रीण? झालं. अाता हिला वाटेल की मी गेलेच निघून. पण दाराल कुलूप नाही हे लक्षात नाही का अालं? अाणि फोन? अरेच्च्या! फोन तर मी चार्जच नाही केला ‘रन अवे’ च्या भानगडित. ‘मरु दे!’…
अाता ही सांगेल चार चौघात अाणि नाक कापलं जाईल. कारण मी पळून गेलेच नाहीये. रेंगाळलीये घरीच. मी सुद्धा ना. अाता मेसेज करुन कळवलं, पळून जाणार तर ते अमलात अाणायला नको? अजूनही वेळ गेलेली नाही. अंगात अाहेच सुखी बाईचा कुर्ता. टेन्शन नॉट. बॅग तयार अाहे. उचलायची अाणि निघायचं. चहा पिऊन निघू? बाहेर फार खर्च होतो विनाकारण अाणि तो बासुंदी चहा ही नकोच वाटतो. पण राहू दे. लवकरात लवकर सटकलेलं बरं. बॅग उचलली, चप्पल घातली अाणि दार उघडलं. दारात मैत्रीण अाणि एक लेडिज इन्स्पेक्टर! काय? ह्या काय करतायेत इकडे??
मैत्रीण मला बघून म्हणाली, “हुश्श्य!” अाहेस ना तू अजून? म्हणजे काय? अाहे म्हणजे? घरी अाहे की जिवंत अाहे? तिनी वर बघून उसासा टाकला. तिच्या जीवात जीव अाला असेल मला हयात बघून, पण माझ्या जीवातून जो जीव गेला तोच तिच्याकडे पोहचला असेल. देवा! मेसेज करताना, ‘घर सोडून जायचंय’, याचबरोबर ‘स्वतःला संपवायचंय’ वगैरे लिहायला नको होतं. पण काय झालं माहितीये का? हे साधे ‘वीट अालाय’ वगैरे मेसेजेस नेहमीचेच. ‘ही’ अात्ताची, ही वेळ नेमकी सिरियस अाहे हे लक्ष वेधून सांगण्यासाठी हा पर्याय. पण त्यामुळे दारात एक पोलीस अाली??? नीट बघितल्यावर कळलं की ही अाम्हा दोघींची तिसरी मैत्रीण अाहे. नशीब खरी पोलीस नाही. म्हणजे खरीच अाहे पण परकी नाही. नाहीतर रिपोर्ट वगैरे बनावला असता तिनी. म्हणजे मी अात्महत्या केलीये असं समजतायेत ह्या??? माझा यावर विश्वास बसायच्या अातच एक की मेकर अाला घाईघाईत. मग एकेक दारं उघडायला लागली अाजूबाजूची. खालून वॉचमन धावत अाला सेक्रेटरींबरोबर. सेक्रेटरी तावातावात लेडी इन्स्पेक्टरला विचारायला लागले की उघडलं का दार? कुठे पंखा की काय? कोणी काही बोलायच्या अात त्यांनी माझ्याकडे बघितलं. मला त्याच्या पुढचं काहीही समजेनासं झालं.
थेट भान अालं तेव्हा मी घरात होते, मैत्रिणीनी केलेला चहा माझ्या हातात होता अाणि इन्स्पेक्टर मैत्रीण कॅप काढून अॉफ ड्युडी फीलमध्ये मारी बिस्कीट खात होती. घराचं दार बंद अाहे पण बाहेर कोणीही उभं नसेल याची खात्री नाही. अाता ही सगळी माणसं माझ्या घरच्यांसमोर पचकली तर? तसं मी वेळीच चिठ्ठीची विल्हेवाट लावून यातलं काहीही न घडल्याचं त्या बघ्यांना पटवलं तरी अाहे. बिचाऱ्या मैत्रिणीला तोंडघशी पाडलं. ती ही पडली गपगुमान. पण मग? सगळ्यांना खरंच पटलं असेल की काहीच प्रोब्लेम नाहीये तर माझा असलेला प्रोब्लेम गायब होणार? अाणि नाही पटलं तर न केलेल्या अात्महत्येचं काय मी काय स्पष्टीकरण देणार?
काय होणार? काय करणार? हे सगळं नाहीये खरंतर माझ्या मनात. कमोडमध्ये फ्लश केलेलं माझं भावनाजडित पत्र कुठवर पोहचलं असेल, एवढं एकच अाहे माझ्या डोक्यात. सगळं सगळं वाया गेलं. हा कुर्ता ही अाता मी घडी घालून कपाटात ठेऊन देईन. मी निरमाची सदैव सुखी बाई नाहीच असू शकत, हे बहुधा २७ वर्षांपूर्वीच ठरलंय. अाता हे सगळं चहाचे कप उचलायचे. विसळून ठेवायचे. मग धुणं, बाकी कामं अालंच ओघानी. ह्या चहाचीही मजा निघून जातीये विचारात. सगळं शांत अाहे. अाम्ही तिघी गप्प अाहोत. अापापल्या विचारात मग्न पण इतक्यात लेडी इन्स्पेक्टरला अावाज फुटला. “म्हणून मी लग्न केलं नाही. राबायचं तर स्वतःसाठी राबेन. नाहीच तर देशासाठी. अधेमधे कोणी नको.” मी अाणि मैत्रिणीनी एकेमकींकडे बघितलं. इनस्पेक्टर बाई पुढे म्हणाल्या, “सरळ कंप्लेंट कर”.. अाता हिला काय सांगणार? अगं बाई सगळा प्रॉब्लेम हा मध्ये लटकलेल्यांचाच मोठा अाहे. म्हटलं तर खुपतं, पण बोलावं तर काटा शोधून गाजावाजाही करता येत नाही. पण प्रत्यक्षात तिच्या प्रश्नानंतर शांतातच राहिली भरुन अाणि शेवटचा भुरका मारुन चहा संपवणार इतक्यात माझा फोन वाजला. बघते तर मेसेज. “ममा, डायनिंग टेबलवरचं लेटर बघितलं.. वुई अार सॉरी. घरी अालो की बोलू.. वुई डिंट मीन टू हर्ट यु!!”. विश्वास बसला पण त्या अाधी तो मेसेज पाच वेळा वाचावा लागला. काय? म्हणजे माझं ड्रेनेज पाईप मधून अात्ता वाहर असणारं लेटर वाया गेलं नाही?? ते मुलीनं वाचलंय?? माझ्यामध्ये एक वेगळीच शक्ती संचारली. डिनरला प्रियांकाचा लाडका पास्ता करु? की विशालसाठी इडली? प्रदीपसाठी पराठे? की सगळ्यांना अावडेल असं फ्रूट सॅलेड?? नक्की काय अाणि किती करु?? देवा… उद्या प्रियांकाला कॉलेजसाठी माझी साडी हवी होती. इव्हेंट अाहे कसलासा. मी म्हणाले होते की इस्त्री करुन ठेवीन. चला उठायला हवं. शेवटचा घोट तसाच गार झाला पण अाता तरतरी यायला मला चहा नकोच होता. गपकन घाईनी कप तिरपा केला अाणि एका घोटात संपवला चहा. हनुवटीला एक ओघळ अाला, तो पुसत उठले तर मैत्रीण म्हणाली, “जा जा.. लवकर बेसिनवर धू चहाचा डाग, नंतर जायचा नाही..” माझ्या नकळत, माझ्या पांढऱ्या रंगाच्या स्टार्च केलेल्या, शुभ्र कुर्त्यावर चहाचा मोठठा डाग पडला.. अाता?? प्रियांकाच्या एक मेसेजनी मला समजलं होतां, सुखासाठी मला कुर्ता नाही, फक्त कष्टाची पोचपावती हवी अाहे. त्यामुळे… कुर्ता खराब झाला तर? ‘मरु दे!’..
सायली केदार