अाज खूप दिवसांनी अॉफिसमध्ये बरंच काही चांगलं घडलं होतं. मला जवळ जवळ प्रोमोशन म्हणता येईल अशी वरची जबाबदारी मिळाली. पगारवाढीचं काही महत्त्व नाही, कारण मी हल्ली खोऱ्यानी पैसा ओढते. नवरा–सासरे, दीर, भाऊ या सगळ्यांपेक्षा जास्त. इगो मात्र अाज जाम सुखावला होता. काल पर्यंत माझ्या नाकावर टिचून काम करणारी, माझ्यावर कुरघोडी करणारी माणसं उद्यापासून माझ्यासमोर झुकणार, ही कल्पनाच सुखावणारी होती. म्हणून अाज मी एकटीनी सेलिब्रेट करायचं ठरवलं. कोणजाणे माझ्या ग्लासाला ग्लास टेकवताना, हसरे चेहेरे करणाऱ्या त्या लोकांच्या मनात मत्सर असेल तर? म्हणून या सेलिब्रेशनला मी एकटी. नोकरी मिळत नव्हती, जगायचं कारण सापडत नव्हतं, तेव्हा जशी एकटी बसायचे ना? तशीच. संसार, मुलं हे काही जगायचं कारण असू शकत नाही, माझ्यासाठी. ते अानंद नक्कीच देतात पण त्यांना त्यांचं असं एक वेगळं विश्व अाहेच की. ज्यात मी नाही. म्हणून हे माझं विश्व, माझ्या नोकरीचं, अानंदाचं, यशस्वी होण्याचं ज्यात ते नाहीत.
अाज घरात गाडी अाहे कारण मी घेतलीये. कमीत कमी पैसे कमवून, गरजाच कमी असल्याचं दाखवत राहणारी ही माझ्या कुटुंबातली मंडळी. ह्यांचे डोळे विस्फारतील इतका पैसा अािण सोयी या घराच्या अंगणात, जाड साखळदंडानी मीच तर बांधल्या की. तेव्हा माझ्या मदतीला ही माणसं नव्हती, वर माझे पाय मागे खेचायला तयार मात्र होती. तेव्हा असं खोल अात कुठेतरी दुखायचं. दुखणं फक्त त्यांच्या वागण्याचं नव्हतं; मी सहन करणं अपेक्षित अाहे, या वस्तुस्थितीचं नव्हतं; व्यक्त करायची मुभा नाही, हे ही कारण नव्हतं! दुःख सगळ्यात जास्त होतं ते मला इतर जणींसारखं गप्प बसणं मान्य नव्हतं, याचं.
मला सगऴया जगाला ओरडून सांगायचं होतं की मला बक्कळ पैसा कमवायचा अाहे. मी पाय ताणला की त्याला मालीश करणारी धाव घेईल, मी जांभई दिली की बिछाना नीट होईल, माझे डोळे मिटले त्यावर दुधाच्या घड्या येतील. हो! हे स्वप्न अाहे माझं. हसाल माझ्यावर, म्हणाल की साधी graduate तू, बापानी कॉम्प्युटरच्या क्लासला घातलं म्हणून अाज नोकरी तरी पदरात पडली अाहे. पण स्वप्न बघायला कोणीही अडवू शकत नाही. त्यामुळे मला अशी स्वप्न पडतच गेली. रात्र रात्र झोप यायची नाही. कानावर पडायचे ते फक्त वेगवेगळे घोरण्याचे सूर! तेव्हाही मला हेच वाटायचं की मला किमान एवढं तरी कमवायला हवं की नशीबी फक्त नवऱ्याच्या घोरण्याचा अावाज यावा. एका हॉलमध्ये रांगेत झोपणाऱ्या ह्या देहांच्या मध्ये मध्ये मला भिंती बांधता याव्यात. या घराच्या सीमेला ताणता यायला हवं. शेजार–पाजाऱ्यांची घरं हडपून, लांब–लचक अाणि दुमली घर व्हायला हवं! कोणीही मारलेली प्रत्येक हाक माझ्यापर्यंत पोहोचूच नये अाणि कोणी मला शोधायला निघालं तर पार वेडं व्हावं त्यानं फिरुन फिरुन. ह्या, ह्याच चहाच्या टपरीवर मी हे असले निश्चय करायचे.
घरी जायचे अाणि मग लक्षात यायचं की अाज नळ गळत होता, गॅस संपला होता. पण ते नवीन बसवण्याएेवजी सासूनी दूध–पोहे कालवलेले असायचे. म्हणायची की ३ दिवसांवर एक तारीख अाहे. मग लावू सिलेंडर. मला वाटायचं की अाजच लावू अाणि पुढच्या २७ दिवसात ठरवून असे पैसे कमवू की एक सिलेंडर एक्स्ट्रॉ घेण्याचे पैसे असतील खिशात! स्वप्नांचा अगदी विचका होता. अाई म्हणायची हा भेद स्त्री पुरुषांतला नाही. हा भेद माणसामाणसातला अाहे. तिचंही बरोबर होतं, पण घरात मतं नवऱ्याला जास्त मिळायची. मी समजावत राहायचे की ही मतं विचारांना, माणसाला नाहीत. ती नात्यांना अाहेत. मुलगा, भाऊ अशी. मग मी मनाशी पक्कं करायचे की मोह अावर ह्या अंथरुण बघून पाय पसरणाऱ्या कुटुंबात हे स्वप्नांचं वादळ सांगाण्याचा. अरे नाही बघणार प्रत्येक वेळी अंथरुणाची लांबी. दोन–चार वेळा गेला पाय जमिनीवर तरच गरज भासेल ना मोठ्या अंथरुणाची? बुडाखाली अाग लागल्याशिवाय काहीही मिळत नाही, मुळात काहीतरी मिळवण्याची उमेद मिळत नाही.
एक लाईट सिगरेट विकत घेतली. एकटीची पार्टी ही नेहमीच चहाच्या टपरीवर असते. कटिंग चहा अाणि सिगरेटच्या संगतीत. कारण सिगरेट अाणि चहा ह्या दोन गोष्टींनी माझ्या यशाबरोबर त्यांचे रंग बदलले नाहीत. मस्त झुरका घेऊन मी मंत्रमुग्ध झाले. सिगरेट खरंतर मी पीत नाही. अारोग्याला वाईट असते म्हणून. पण एकाकी काळात वाईट संगतीत या व्यसनाला सवय झाली. मग कामाचं व्यसन लागलं अाणि सुटली सुद्धा! अाता फक्त मागच्या अाठवणी काढताना सिगरेट धरते बोटात. घरच्यांना माझ्याविषयी माहित नाही, अशी एकतरी सिक्रेट गोष्ट असावी अायुष्यात म्हणून कदाचित. सपक जगण्यात ती धमाल नाही.
वयात अालेली मुलं माझी, त्यांचीही काहीतरी सिक्रेट्स असणार. ती जपायला मला जमायला हवं. त्यासाठी कोणीतरी माझी सिक्रेट्स जपायला हवीत. त्यासाठी मला अाधी सिक्रेट्स तर हवीत! नवऱ्याची सिक्रेट्स तर नसतीलच माझ्या. पण असायला हवी होती. मजा अाली असती. तो सुतासारखा सरळ निघाला अाणि मी बनेल. माझ्यामते मी बनेल–बिनेल काही नाही. कारण अापल्याकडे लोकांना सरळ नसलेली बाई तिरकसच वाटते. नागमोडी, वळणदार अशा सकारात्मक पदव्या नसतात बायकांना. अजूनही हातात सिग्रेट बघितली की दचकायला हे होतंच. तरुण मुलींच्या हातात बघून काहींना होतं, काहींना नाही. पण माझ्यासारख्या चाळीशीतल्या कॉटनच्या साडीतल्या बाईला बघून तर होतंच. खरंतर फुफुस्सं स्री–पुरुषांमध्ये भेदभाव करत नाहीत. बाळंतपणं म्हणाल, तर माझी झाली अाहेत आणि अाता चाळिशीनंतर नक्की जन्माला घालायचं नाही, हे ठरलंय. त्यामुळे सिगरेटच्या बाबतीत मी अाणि एखादा पुरुष एकच अाहोत.
तर अशा या माझ्यामते वळणदार अाणि लोकांच्यामते वाकड्या असलेल्या बाईनी, तारुण्यात बऱ्याच कथा कविता लिहिल्या, ज्या कधीच कोणाला दाखवल्या नाहीत. हे ही माझं एक सिक्रेट. पुरुषांना पत्र लिहिली, पण दिली नाहीत. लग्नानंतर नवऱ्यालाही लिहिली. त्याला वाटायचं काय रोमॅंटिक अाणि डॅशिंग बायको अाहे अापली. पण डॅंशिंग त्यात काहीच नव्हतं, कारण मुळात त्या पत्राचं माझ्या हातातून गमन झाल्यावर, पोटात एक मोठ्ठा गोळा अाणि मनात फुलपाखरं नसायची. नवरा वाचेल पत्र अाणि मग त्याला अानंद होईल, हे ठरलेलंच होतं. त्या अानंदात तो नाचेल, रडेल की चित्कार काढेल? एवढाच काय तो suspense. पण मला तेवढा पुरेसा नव्हता. मग मी लग्नानंतरही हे उद्योग केले. अाजूबाजूला असे अनेक पुरुष वावरतात, ज्यांना अापण अावडतो हे अापल्याला ठामपणे माहित असतं. पण अापल्या गळ्यातलं मंगळसूत्र बघत ते मानसिक तपश्चर्या करुन स्वतःवर ताबा मिळवत असतात. मी त्यातल्या एकेकाला धरुन पत्र लिहिली. कसं? की बाबा रे… तू मला काय, ‘ही’ समजलास? सगळं कळतं मला. तुझ्या हालचालींवर बारीक लक्ष अाहे माझं. शक्य तितक्या गोड शब्दात असे हे पत्र. पत्र उर्फ पाणउतारा. घडलं इतकंच हा ढीग अजून माझ्या कपाटातंच जागा अडवतोय. त्या त्या वेळेला पत्र लिहायचं धाडस केलं, पण द्यायचं मात्र केलं नाही. कारण कधी तो बॉस असे, कधी कंपनीत मालक, कधी क्लायंट. मी स्वाभिमानी असले तरी पैशाची हाव असलेली अाहे. त्यामुळे लांब अंथरुणाचं माझं स्वप्न अाठवून, कोणाशी पंगा घेतला नाही. कधी कोणासाठी स्वतःची तडजोड करणारी मी नसले तरी स्वतःहून नाकी तडजोडी करणारी अाहे. त्यामुळे काय? पत्र राहिली कपाटात!
सिगरेट संपली. अाता पुढची पेटवणार. अाजचा दिवस बंड पुकारण्याचाच अाहे. बंड माझ्या मुलांविरुद्ध, घरच्यांविरुद्ध अाणि माझ्या स्वतःविरुद्ध! अापण विजयी झालो अाहोत, या विचारात असतानाच मी अाज एक मोठं पाऊल उचलणार अाहे. माझ्या सारखीच ती पत्र, मला माझ्या मुलीच्या कपाटात सापडली अाहेत. बरेच दिवस गेले माझ्या डोक्यात विचार घोळत होते अाणि मुलगी मला घोळात घेत होती, नवरा दिसून न दिसल्यासारखं करत होता अाणि सासू–सासरे, दीर धीर सुटल्यासारखे! सगळ्याला अाज मी वाचा फोडणार अाहे.
ठीक तिसऱ्या मिनिटाला माझी मुलगी या टपरीवर येईल. मला सिगरेट पिताना बघून दचकेल. पण तिला समजेल मी वळणदार अाहे. मग ती माझ्यासमोर बसेल अाणि माझ्या प्रश्नांची उत्तरं देईल. मी सगळं विचारुन घेईन, थेट! तिलाही कळू दे, अाई या सगळ्यातून गेलेली अाहे. ही अाजकालची मुलं स्वतःला समजतात काय? पद्धती बदलल्या असतील, माध्यमं बदलली असतील, शब्द वेगळे असतील, पण शरीर तेच अाहे. चेहऱ्यावर खुलणारं हसू, तिची मनात होणारी तगमग, खरं लपवायची धडपड हे सगळं जसच्या तसं माझं अाहे. अायुष्यात असे अनेक प्रसंग असतात की जे पहिल्यांदा समोर येतात. पण त्यांना तोंड हे द्यायलाच हवं. अापण चुकत नसू तर ठाम राहायलाच हवं अाणि खमकेपणानी खिंड लढवायलाच हवी. घरातल्या बाकीच्यांना मी बघून घेईन! अरे तुम्ही फक्त पुढची पिढी अाहात, पुढारलेली नाही.
मी माझ्याच नादात पाचवा कटिंग अॉर्डर केला. अाज चहाची जास्तच किक बसत होती. मी पर्समधून चष्मा काढला अािण सानिकाचा नंबर बघायला लागले. अॅडव्हरटायझिंग विश्वातल्या एवढ्या वरच्या पदावरच्या अॉफिसरची मुलगी लेट होते म्हणजे काय? खुर्ची घसटण्याचा अावाज. एका मागून एक. चष्मा बाजूला करुन मी वर बघितलं. सानिका, सुंदर ड्रेस–छान मोकळे सोडलेले केस, सुगंधाच्या ढगावर स्वार, चेहऱ्यावर भितीचा मागमूस नाही, खळाळलेलं हास्य, मनगटावरचं कडं अाणि तिची बोटं, त्याच्या दंडात रुतणारी! तो साधा शर्ट, साधा पर्फ्युम, साधा चष्मा, साधा चेहरा. अदबीनी बसला. म्हणाला, “we are in love”. “yes mamma, I am dating Divyansh”. मी अवाक झाले. इथे मी प्रश्न विचारणं अपेक्षित होतं बहुतेक. काय बरं प्रश्न होता तो? “mamma? किती चहा पिशील? Acidity होईल. दिव्यांश एकेक सरबत अाणतोस अाम्हा दोघींसाठी?”. माझ्याकडे बहुधा अाता कोणतेच प्रश्न ‘विचारायच्या गर्दीत’ नव्हते. तो सगळा ढीग माझ्याच पुढ्यात येऊन पडला, ‘सोडवण्यासाठी‘. माझ्या हातातून लीलया सिगरेट काढून घेऊन, सानिकानी पायदळी तुडवली. दिव्यांश २ कोकम सरबत अाणि त्याच्यासाठी ताक घेऊन बसला. माझ्या ब्लॅंक चेहऱ्यामागे, जगण्याचे सिक्रेटस् इत्यादी विषय विरत गेले अाणि लेकीच्या, तिच्या त्या डेटच्या मी प्रेमातच पडले!
सायली–केदार