स्वतःपेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या दोन मुलींबरोबर फ्लॅट शेयर करुन राहणं सोपं नाही. त्या डोक्यावर बसतात, बॉयफ्रेंड घेऊन येतात, दारु पितात म्हणून नाही किंवा माझ्या मुली-भाच्या लागत नाहीत, म्हणून नाही. त्या माझ्यापेक्षा जास्त कमवतात म्हणून असेल कदाचित. मी माझ्या अकाऊंट मध्ये अात्तापर्यंत जेवढा मोठ्ठा अाकडा बघितला असेल, तेवढा त्यांच्या मासिक परिचयाचा पैसा असेल तो. बायकांच्या गर्दीत चिकचिकाट होत असतानाच, मागनं जोरात एक धक्का बसला अाणि दाराजवळच्या ग्रिलवर दात अापटला. मी धक्का देणारीकडे वळूनही बघितलं नाही. माझ्याच सारखी ती. अामचं एकच नाव- first class न परवडणाऱ्या बायका. पदरानी अापला ओठ टिपून घेतला अाणि बाहेर बघायला लागले. जरासं दुखलं होतं, पण मनात दुखतंय त्याची या शारीरिक धक्कयांना सर नाही.

मी रडकी, बिचारी, पै न्‌ पै वाचवणारी बाई कधीच नव्हते. गार्डनच्या साड्या नेसून मानेवर पर्फ्युम उडवून नवऱ्याच्या हातात हात घालून सिनेमातल्या बाश्कळ विनोदांवर हसायला मला फार अावडायचं. मग माझ़्यावर इतर हसले तरीही. नवऱ्याशी चांगलं जमत होतं माझं पण त्याला परदेशातली अॉफर सोडता अाली नाही. थोडक्यात त्याला माझ्यापेक्षा पैसा महत्त्वाचा होता अाणि मला त्याच्यापेक्षा स्वाभिमान. कोणीतरी कशाशी तरी अापली तुलना करतंय अाणि त्यात अापलं पारडं हलकं ठरतंय, हे feeling फार मोजकी लोकं सहन करु शकतात. त्यातली मी नाही. माझ्या बाजूला बसणाऱ्या बाईच्या साडीला जर कुणी नावाजलं तर दुसऱ्या दिवशी घडी मोडून माझ़्या साडी वर ती प्रशंसा खेचून अाणणारी मी अाहे. पण नवरा सोडून गेला तसं तसं हरल्यासारखं वाटायला लागलं. “अगंबाई बायको पुढं का कोणी पैसा निवडतं?” हे वाक्य अनेक अशा बायकांच्या तोंडून एेकलं, ज्यांचे नवरे केवळ संधीपायी त्यांना धरुन होते. बरं त्यानी मला सोडलं, तसंच मी ही सोडलं की त्याला. लटांबर म्हणून नाही मागे मागे. कित्तीतरी बायका जातात. पण  तिथे जाऊन मी काय करणार? मराठी अाणि गुजराती ट्रान्सलेशनचं असं कितीसं काम मला मिळणार? पुन्हा लेखी. गुजराती मला बोलता तरी कुठं येतं? तरीही. लग्नाअाधी अामचं ठरलं होतं, भारतात राहायचं. पण त्यानं ते प्रॉमिस मोडलं. मग माझा तोरा काय कमी होता? अाई-बाबांकडे परत अाले तर त्यांनाही जड झालं. अार्थिक दृष्ट्या नाही पण उत्तरं किती जणांना देणार? पूर्वी सारखं अाता कोणी सरळ वाळीत वगैरे टाकत नाहीत. अाजूबाजूला घुटमळत राहतात अािण नजरा बोलत राहतात. “ही का गेली नाही?” “वेगळाच काही problem होता का?”, “मुलीचा स्वाभिमान म्हणायचा की अागाऊपणा?”. चाळीत राहणारे, काटकसर करुन जगणारे बिचारे अाई-बाबा नाहीयेत माझे. पण त्यांना ह्या रोजच्या प्रश्नांनी हैराण करुन जवळजवळ तसं बनवलं. थकून जातो अापण तेच तेच विषय हाताळून. विषतः न अावडणारे. अाई-बाबांसाठी कदाचित न पटणारे. बाबांच्या बदल्या होतील तिथल्या गावात माझी संसार मांडत राहिली. हे तिचं प्रेम होतं. माझ्यासाठी तो अपमान ठरला. मग काय त्यांच्याशीही मतभेद. म्हणून मग अाले शहर सोडून, मुंबईत. मुंबईच का? तर नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर ह्या सर्व गावात नातेवाईक अाहेत. त्यांनी मुंबईला वाळीत टाकलं, मग मला. म्हणून मग मीच मुंबईशी मैत्री केली. दोघींना एकटं वाटू नये म्हणून.

कामात मी चोख अाहे पण बुद्धीनं बेतासबात. अाता त्याला काही इलाज नाही. तास तास माझ्या जागेवरुन हलत नाही. चहा नाही, कॉफी नाही. गप्पाटप्पा नाहीत. तरीही हे सगळं करणाऱ्या कोणाही पेक्षा माझं काम लवकर होत नाही. माझं लग्न माझ्या सोंदर्यावर ठरलं. त्याची किंमत चांगलीच समजलीए मला. सौंदर्य अजूनही अाहे, अाजूबाजूला ओळखीचे ही नाहीयेत, पण म्हणून लग्न मोडलेलं नसताना दुसऱ्या पुरुषाबरोबर फिरुन त्याचा पैसा वापरणं ही जमत नाही. अाई वडिलांना माझ्या तत्वांसाती दुखवणं मला शक्य वाटतं. अशा विचित्र गोष्टींसाठी मात्र नाही. त्या चुकीच्या अाहेत की नाही हे मला माहित नाही. पण माझ्या यौवना रुममेट्स्‌नी हर तिसऱ्या दिवशी वेगळा मुलगा फ्लॅटवर अाणला की मलाच विचित्र वाटतं. मी अाले, दार उघडायला अगदी एक मिनिट जरी घेतलं असेल अाणि अात अाल्यावर मुलगा दिसला की मी judgemental होतेच. ती कूल असते. असं वाटतं, नसेलच काही शरम वाटण्यासारखं. पण खात्री वाटत नाही. ते शंकेचं feeling मी माझ्या अाईला या वयात देणं फारच भयंकर होईल. पुरुष फिरवणं नाही म्हणजे त्यांचा पैसा नाही. हॉटलची बिल, वरचावर खर्च काहीच नाही. मग त्यातल्यात्यात बरं म्हणजे दुसऱ्या पुरुषांएेवजी दुसऱ्या बायकांचा पैसा वापरायचं. किमान अापलं चारित्र्य स्वच्छ राहतं.

स्टेशन अालं. उतरायची गरजच पडली नाही. अापोअाप एक धक्का मला प्लॅटफॉर्मवर सोडून गेला. रोजच्यासारखा. लोकलचं दार म्हणजे मनाचं दार. हे वाक्य कवितेसारखं वाटतं खरं. पण माझा अर्थ वेगळाय. माझ्या मनात मला स्थान मिळालं तर बरं. नाहीतर विचार करता करता दारातून कधीही बाहेरची उडी. अनेकदा केलाय मी अात्महत्येचा विचार. पण कधी अात्महत्या नाही केली. मला वाटतं माझा अपमान होईल त्यानी. लोकं म्हणतील हिंमत नसताना नवऱ्यासमोर फणा काढला, अाई-वडिलांना धाब्यावर बसवून ही गेली मुंबईला अाणि मग मला तो माझा पराभव वाटेल. तो नाही तर दुसरा पराभव वयानी केलाच. दुसरा धक्का पोटात बसल्यावर तसं जाणवलं. मला बाथरुमला लागली होती. रोज मी अॉफिसमधून निघताना मी निक्षून जाऊन येते, तरीही लोकल मधून उतरलं की येतोच सांगावा. वय बोलायला लागलंय. माझ्या अाईचं उतारवय मी फार जवळून बघितलं, माझ्या लग्नाअाधी. सांगितलं नाही कधी उकल करुन पण मला समजायचं. सतत तिची नजर बाथरुमच्या शोधात असायची. ट्रिपला गेलो की, कोणाकडे सहज चहा गेलो तरी. दुसऱ्याकडे मुक्काम तर ती टाळायचीच. अाता माझ्या वाटेत एकही स्वच्छ बाथरुम नाही. थेट घरी गेल्यावरच. त्यात दोन्ही रुममेट यौवनांना बेल एेकू येत नाही. अालीच तर कोण उघडणार यावर किमान ५६ सेकंद घालवतात. ती माझ्या bladder साठी किती महत्त्वाची अाहेत, हे त्यांना चाळीशी ओलांडल्याशिवाय नाही समजणार. अाजकाल माझा लघवी लागण्यावर जसा ताबा नाही, तसाच तो ती करण्यावरही कमी झाला अाहे. अापण म्हातारे होतोय, ही भावना फार वाईट. लग्नाचं मोजकंच सुख, त्यात मूलबाळ नाही, अअई-वडील अाहेत पण त्यांच्याजवळ जायचं म्हणजे त्यांना दुःखात टाकल्यासारखं. त्यामुळे अाता मी अाणि मला या दोन यौवना. एवढंच अायुष्य.

अामचं घर छान अाहे. सोफा, टिव्ही, फ्रीज, बेड, कपाटं. सगळं सगळं अाहे. पण यातलं मी काहीच घेतलं नाही. मी जेमतेम महिन्याचे पैसे देते. बाकी सगळं त्याच करतात. खरंतर लाज वाटते, पण पर्याय नाही. माझ्या नवऱ्यानी तिथं दुसरी बाई, बायको सारखी घरात अाणून बसवली नसती तर मी त्याच्याकडून कर्ज घेतलं असतं, पण तिच्यासमोर पदर पसरणं मला जमणार नाही.

अालं पार्किंग अाता या भरलेल्या bladder नी सहा मजले चढायचे. लिफ्ट कालपासून बंद अाहे हे अाठवलं. अाज त्या किमान ५६ सेकंदांची वाट बघावी लागणार नाही. कारण अाज दरवाजा किल्लीनंच उघडायचा अाहे. दोघी सोसायटीतल्या लोकांबरोबर ट्रिपला गेल्या अाहेत. पर्स उघडली, नेहमीच्या कप्पात किल्ली नसल्याचं अाश्चर्य वाटलं. मी पर्स पालथी घालायला सुरुवात केली. मी किल्ली नेहमी जपून ठेवते. या मुलींचे महागडे लॅपटॉप, सगळं सामान तसंच वर असतं. मला उपकाराचं ओझं वाटतं. पण मग मी जेवण बनवून, घर अावरुन, त्यांचे कपडे धुवून ते जरासं हलकं करते. पण हलकं होतं नाही. माझ्यासारखी बाई २४ तास लावायची त्यांची एेपत अाहे, हे त्यांनाही चांगलंच माहीतीये अाणि मलाही. किल्ली अजूनही सापडेना. मी कुठे ठेवली? घरातून निघताना तर होती, कारण दार मीच लावलं. मग कुठे गेली? खरंतर मी बाहेर काढलीच नव्हती. माझी पर्स अॉफिसमध्ये माझ्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये सेफ असते. मला घाम फुटायला लागला. त्यात bladder प्रकरण भर घालत होतं. मी ठरवलं की किल्लीच्या शोधाशिवाय कुठेही जायचं नाही. ते जास्त महत्त्वाचं अाहे. शेजारुन किल्ली घेण्याची सोयच नाही. ट्रिपला सगळेच कॉलनी मधले गेले अाहेत. म्हणजे मग अाता काय करावं?

पाऊण तास झाला. काहीही उत्तर सुचलेलं नाही. किल्ली कुठे गेली? लोकलच्या धक्क्यात कोणी घेतली का? मी इतकी म्हातारी झालीये का? मला अाता एवढंही बघता येत नाही? या दोघी जर चुकून लवकर अाल्या तर काय उत्तर देऊ? कुठे गेली किल्ली? एखाद्याकडे अाश्रितासारखं राहत असताना, अापल्याकडून त्याच्या घराला अाग लागल्यासारखं वाटलं.

building metal house architecture

मी ६ वर्षांची होते. माझ्या काकानं नवीन घर घेतलं होतं पुण्यात. अाम्ही सगळे राहायला गेलो सुट्टीत. खूप धमाल करत होतो. एवढं मोठं घर खानदानात कोणाचं नव्हतं. पकडापकडी खेळताना मी जोरात धावले अाणि मागून मिहीर अाला का बघायला गर्‌कन मागे वळले. धक्का लागला अाणि टिव्ही पडला. त्यानंतर इतका वेळ शांतता पसरली होती. मला काहीच समजेना. रडावं तर ते ही सुचलं नाही. माझी अाई घाबरुन गेली होती. त्यानंतर मला काहीच एेकू अालं नाही. अालं ते थेट हेच की बाबा म्हणाले, मी भरपाई देईन. त्यानंतर ओव्हरटाईम करत बाबा एक महिना उशीरा येत. मला झोपवून अाई त्यांची जेवायला वाट बघत बसायची. त्यातला एकही दिवस मी झोपले नव्हते. टक्क जागी असायचे. सकाळी बाबा अॉफिसला गेले की अाईला बिलगून रडायचे. अाज तिची फार अाठवण येतीये. त्या दिवसानंतर तितकं भयाण मला थेट अाज वाटतंय. तेव्हा मी कोणाचीच माफी मागितली नव्हती. मला माफी चूक खोलवर पटली होती, पण मी ते व्यक्त केलं नव्हतं. अाई म्हणायची नेहमी, “उपकार घेणं महागातच पडतं, पटेल एक दिवस”. मला ते वाक्य खोटं ठरवलंच पाहिजे. दुसऱ्याचं माझ्याकडून असं नुकसान झालंय तर मी जरुर माफी मागणार. असं काहीतरी करेन की ते उपकारच राहणार नाहीत. की मेकरचे पैसे मीच भरेन. सगळ्या किल्ल्या परत ड्युप्लिकेट करणं वगैरे माझं प्रायःश्चित्त. लहानपणी मी लहान होते. ती सल अजून पुसली गेली नाही. अाता मी मोठी झाले अाहे. घरातली सगळ्यात मोटी व्यक्ती. जबाबादारी माझीच असायला हवी.

अाता मात्र ही लघवी सहन होत नाही. पोटात अात अात कळा यायला लागल्या अाहेत. पण मी गेले इथून अाणि त्या दोघी अाल्या तर? अाजच रात्री परतणार अाहेत. अाता मलाच येऊन दोनेक तास झाले. बापरे, साडेनऊ वाजले की. मला बिल्डिंग समोरचं सुलभ शौचालय डोळ्यासमोर यायला लागलं. इथेच थांबणं खरंतर योग्य अाहे. कारण मी कधीच घर अाणि अॉफिस हे सोडून कुठे गेले नाही. पटकन्‌ जाऊन यायचा मोह तर होतोय, पण विशाखानं मला विचारलं होतं की अाम्ही येऊ तर तू असशील ना? त्यांच्याकडे किल्ली नाही. नेहमी तर नेतात पण कधीकधी राहून जाते. मी घरी नाही असं होतंच नाही. त्यांच्याच घराच्या दारात त्यांना उभं करणं म्हणजे मलाच नकोसं होणार अाणि बिल्डिंगमध्ये माझ्या गायब होण्याची बातमी पसरणार. मग खालची शहा भाभी त्यांना बसायला बोलावणार. त्या जाणार. मग अाल्यावर मला शहा भाभीसमोर त्यांना किल्ली हरवल्याचं सांगावं लागणार. अगदी नकोसं होईल ते. त्यापेक्षा इथेच थांबावं. भाभी खालच्या मजल्यावर तिच्या घराच्या अात गेली की यांना थांबायला सांगावं. किंवा सरळ की मेकर बोलवावा. अात्ताच. पण त्यानं लॅच मोडलं तर? घर भाड्याचं अाहे. त्यात मी डिपॉजिट तरी कुठे दिलंय? नकोच.

मी जिना उतरायला सुरुवात केली. बुद्धीला कितीही थांबायचं असलं तरी अाता मला ते शक्य होणार नाही. सुर्वेंच्या सेंडअॉफचा सामोसा पोटात गुडगुडतोय. अाता १ बरोबर २ ची काय गरज होती, कोणास ठाऊक. पर्समधून ५ रुपये काढत मी रस्ता ओलांडला. मनात दोनच प्रार्थना. पैसे घेतात म्हणजे टॉयलेटनं स्वच्छ असावं अाणि मी घरी जाईपर्यंत या मुलींनी न परतावं. मी टॉयलेटच्या अात शिरले तर तोब्बा लाईन. एकदा वाटलं परत जावं. पण अाता ते खरंच शक्य उरलं नव्हतं. लाईन कशी पुढे सरकली, कसा माझा नंबर अाला अाणि मी कशी काय सगळं उरकून बाहेर अाले? काही काही अाठवत नाही.

माझ्या चाळीशी ओलांडलेल्या दमलेल्या गुडघ्यांनी मनाशी हिय्या करुन दिवसातला बारावा की तेरावा जिना चढायला सुरुवात केली. आॅफिस तीन मजले भरुन अाहे. सतत वर खाली चालूच असतं. संध्याकाळ पर्यंत पिट्ट्या पडतो. मी अंदाज घेत होते, पण बिल्डिंगमध्ये शांतता होती. लोकं अापापल्या घरात जाणं, सामान नेणं, एकमेकांना गुडनाईट म्हणणं, यातलं काहीही सुरु नव्हतं. मला इतकं हुश्‌श्‌श्‌ झालं की बस्स मी अामच्या मजल्यावर येऊन पायरीवर माझं बुढ टेकवलं. कोण जाणे का, काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. मी वीजेचा झटका लागल्यासारखी उठले अाणि धावत घरात गेले. दार उघडं होतं. म्हणजे विशाखानं किल्ली नेली होती. अानंदात अात जाऊन दोघींसाठी अाणलेली कच्छी दाबेली बाहेर काढली अाणि मी तशीच उभी राहिले. समोर टिव्हीच नव्हता, सोफ्यात पल्लवीचा लॅपटॉप नव्हता. खोलीत कपाटं उघडी होती. मी दोघींसाठी तीन तीन तोळे जमवलेलं सोनं नव्हतं, पल्लवीच्या कपाटाचा ड्रॉवर रिकामा होता. विशाखाची लटकणारी पर्स गायब होती. माझ्या हातातल्या दाबेली तिथेच पडल्या. मी जड पावलानी हॉलमध्ये अाले अाणि समोर बघते तर विशाखा, पल्लवी, शहा भाभी, रहेजा भाभी, दिलीपभाई अाणि माहित नाही कोण कोण होतं. सगळे सुन्न. मी ही. जसं की सामान नाही, माझा होता-नव्हता कणाच चोरीला गेला. तोंडातून चकार नाही माझ्या. मला माफी मागायची होती हो!

Apart from writing I love to go on bike rides and have coffee with unending conversations.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: