अाज पुन्हा एकदा ती नव्यानी उभी होती, तोच छान इस्री केलेला ड्रेस घालून. खरंतर अाता जीर्ण व्हायला लागला अाहे. हा ड्रेस शिवायला टाकला तेव्हा होता तसा उत्साह तिच्याकडे नाही. तरीही उसनं अवसान अाणून अारशासमोर उभी राहिली अाणि स्वतःला निरखायला लागली. “चेहरा अाता कोवळा दिसत नाही, मी ओलांडलीच की तिशी. अाता फेअर अॅंड लव्हली सोडून अॅंटी एजिंग क्रिम अाणायला हवं”, मनात विचार येऊन गेला. “लिपस्टिक लावू का? की फार गडद मेकअप केल्यासारखा वाटेल? नाही लावली तर अावरुनच अाले नाही असं तर नाही ना वाटणार? माझे डोळे बोलतात का? की मख्ख वाटते मी शाळेत ती जुईली होती तशी? तिचंही लग्न झालं म्हणे”. चेहऱ्यावर होतं नव्हतं तितकंही हसू विरुन गेलं. तिनी लिपस्टिकच्या २–३ कांड्या बाहेर काढून रंग न्याहाळले. भडक लाल लावावासा वाटला पण गुलाबी लावला. हलकासा. “शाळेत असताना पिंपल्सना नख लावायला नकोच होतं” तिनी गालावरुन बोटं फिरवली. कानातल्या झुमक्याला हळून हेलकावा देऊन स्वतःशीच हसली. “इतकीही काही वाईट नाही हं मी दिसायला”… लग्न तर काय जाड, वाळक्या, काळ्या, चकण्या मुलींचीही होतात नां. माझंच घोडं कुठे अडलंय कोण जाणे?
अाई–बाबांच्या चेहऱ्यावरची चिंता अाता अपराधीपणाची भावना देते. काय वाटत असेल त्यांना? अापण ह्या मुलीला जन्म दिला, मोठं केलं, शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. इतकं की अाज फ्लॅट बूक केला अाहे, दारात गाडी अाहे. दर अाठवड्याला मुलांना भेटायला गेली कॉफीचं बिल अभिमानानी भरते पण लग्न मात्र ठरत नाही. झाडून ओळखीच्या सगळ्या मुलींचे हात पिवळे होतात पण अापल्या मुलीचे नाही. का बरं? ती उद्धट नाही, स्वार्थीही नाही, कामसू अाहे, चपळ अाहे, तत्पर अाहे, मापात अाहे, दिसायला सुमार असली तरी कुरुप नाही. मग कां? असं काय करत असतील त्या इतर मुली ज्यांची लग्न लगेच ठरतात. अगदी नाव नोंदवलं की स्थळं हजर अाणि या कानाची त्या कानाला खबर लागायच्या अात साखरपुडा. अापण मात्र जेवायच्या पंगतीत अापल्या वर संशोधनाचा कीस पाडत सगळ्या अाज्या, मावश्या, काकूंना उत्तरं देत बसतो अाणि अापल्या अाईला खिंड लढवताना पाहतो.
का बरं अापणंच निवडले जात नाही? अापण तुटलेल्या बिस्कीटाच्या पुड्यासारखे अाहोत का? अाजूबाजूचे सगळे पुडे उचलले जातात. पण अापल्याला कोणी स्वतःच्या पदरात घेत नाही. मावशी म्हणते वय वाढलंय. पण मी तर पंचवीशीतच नाव नोंदवलं ना! अाजी म्हणते जास्त शिकलीस. पण म्हणून त्या वेबसाईटवरुन शेवटच्या एक–दोन डिगऱ्या काढून टाकायच्या का? मामी म्हणते गोरी नाहीस. पण मला रंगानी कोळसा असलेला मुलगाही चालणार अाहे. मनानी शुभ्र असावा एवढीच अपेक्षा. मैत्रिणी म्हणतात की मी चिकित्सा करते. असेल, पण इथे अगणित पर्याय अाहेतंच कुठे खल करायला? मगं? का बरं?
मागच्या दीड वर्षात भेटलेल्या प्रत्येकाला हाच ड्रेस घालून भेटले. हलका जांभळा, पावडरच्या जाहिरातीसारखा. हाच अडथळा असणार. मुलांना अावडत नसतील हे असे लाईट अाणि परी सारखे रंग. पण खरंतर हा सल्ला मला माझ्या मैत्रिणीच्या अाईनी दिला. ह्याच रंगाचा, ह्याच फॅशनचा ड्रेस घालून त्यांची मुलगी मुलाला भेटली अाणि पहिल्याच भेटीत पहिलंच वाक्य, “nice dress… choice छान दिसते तुझी”… अच्छा म्हणजे हा ड्रेस माझी नसून तिची choice अाहे हा मुद्दा असेल. पण या मागचा ड्रेस तर माझ्या अावडीचा होता. गडद निळा. त्याचं कुठे झालं कौतुक?
मी बहुधा वेळेपूर्वी जाते म्हणून… पण असंही नाही. एकदोनदा नेमकी उशीरा गेले. मग कदाचित उशीरा गेले त्या मुलांना उशीरा अालेलं अावडत नसेल अाणि लवकर गेले त्यांना तो उतावीळपणा वाटला असेल. हम्म्म्… बहुतेक मुलाला भेटायला जाताना जवळपास दडून बसायला हवं. मुलगा कॉफीशॉपमध्ये शिरला रे शिरला की अापण जायचं. म्हणजे अगदी त्याचं बूड खुर्चीवर टेकायच्या अात. म्हटलं तर वेळेवर अाणि उतावीळपणा तर नाहीच नाही!
पण इतका विचार मी त्या मुलाच्या करते अाहे जो मला अजून माहितही नाही. काय होईल जर मी मला हवी तशी, हवे ते कपडे घालून या मुलांना भेटत राहिले तर? प्रत्येक भेट ही तेवढ्यापुरती. भेटायचं गप्पा मारायच्या. वेगवेगळे चेहेरे, विषय. नाहीतरी अाजकाल मित्रमैत्रिणी लग्न कधी करणार? हाच प्रश्न विचारत राहतात. त्यापेक्षा अापल्याच गटातल्या ह्या होतकरु तरुणांबरोबर विकेंड घालवायचा. मस्त अायडिया अाहे ना?
इतकं सारं बोलता बोलता मी चालत घराबाहेर पडून कोपऱ्यावरच्या कॉफीशॉपमध्ये अालेही. मी लपले अाहे बरंका, ठरल्याप्रमाणे. तो अाला की लगेच मागोमाग अात जाणार. हे बघा अालाच. एकदा पटकन मोबाईलमध्ये फोटो उघडून मॅच करते की हाच का? कारण रोज सकाळपासून इतक्या प्रोफाईल्स बघितल्या जातात की कधी कधी सुपर मार्केटवाल्याचा चेहरा बघूनही गोंधळायला होतं. अरे देवा, हा तर तो स्वतःचा बिझनेस अाणि मंथली एक लाखवाला नाही ना?
“हाय! मी भावना… तू सागर?” मी कधीच इतक्या पटकन माझं नाव सांगून हात पुढे केला नव्हता. अाज जरा हलकं वाटतंय… मुळात अाज ही फक्त एक तासाची भेट अाहे. हा नाही म्हटला तर दुःख नाही. पण तोच जरा बुजरा वाटतो अाहे. त्याचं पहिलं–दुसरंच वर्ष असावं. माझ्यासारखा डबल पीएचडी नसणार. असो. तो माझ्याकडे बघत नाही म्हणून मग मी सुद्धा इकडे तिकडे बघते अाता. तसंही ह्या असल्या कॉफीशॉप्सना खूप काचा असतात. वळू तिथे अापला चेहरा दिसतो. “अरे या काचेत वेगळीच दिसते की मी…” लाल लिप्स्टीक चालली असती अािण हा ड्रेस मात्र नको होता घालायला. जांभळा. पावडरच्या रंगाचा. शी!
“मग तुझ्या होणाऱ्या नवऱ्याकडून काय अपेक्षा अाहेत?”- सागर. मनात अालं की, “एकानी हो म्हणावं अाणि नवरा व्हावं एवढीच अपेक्षा अाहे”. पण मी फक्त हसले. त्याची वाढलेली मिशी ओठांवरुन ओघळत होती. तिला नीट अाकार नव्हता. चेहऱ्याला अाजतागायत फेशियल केलेलं नसणार. नखं वाढली अाहेत. बूटांना पॉलिश नाही. याअाधी भेटलेल्या अगणित मुलांना मी या मुद्द्यांवर माफ केलं, पण अाता नाही. नुसतं गप्पा मारायला ठीक अाहे पण लग्न? छे!!
दीर्घ श्वास घेतला, “अरे अाज खरंतर मला कंटाळा अालेला पण अाता लग्न ठरत नाही म्हटल्यावर दिवस भाकड घालवून चालवत नाही ना… अाई इमोशनल होते. अाता ६ वर्ष लग्न ठरत नाही म्हटल्यावर ती तरी बिचारी काय करणार दुसरं? बरं हा ड्रेस मी मागच्या कित्येक मुलांना भेटताना घातला. प्रत्येक वेळी स्वीवलेसच नको, हा भडकच अाहे, ह्यात मी जाडच दिसते, त्यात मी काळीच दिसते असं म्हणत ड्रेस शोधण्यातच किमान तासभर जातो. म्हणून ठरवूनच टाकला. हाच तो युनिफॉर्म! याचाही अाता मला कंटाळा अालाय. मी असे पावडर कलर वापरणारी मुलगी नाही. माझा ठरलेला असा काहीच ड्रेस टाईप नाही. मी इच्छा होईल तसे कपडे घेते अाणि हाताला येईल ते घालते. अाज माझा मोकळ्यानी बोलण्याचा दिवस अाहे. सॉरी तुला कळवायला हवं होतं की नको भेटुया, पण हे सगळं वाटेत ठरलं. अालेच अाहे अाणि पैसे भरले अाहेत तर कॉफी पिऊन निघते. चालेल ना?” त्याचा चेहरा कोरा होता. अरेच्चा माझ्या मोकळेपणानी पण काही झालं नाही? मला वाटलं असं फिल्मी होण्यानी तरी उपयोग होईल! असो. न तो माझ्या प्रेमात पडला ना मी त्याच्या पण एक झालं, मी माझ्या प्रेमात पडले. म्हणजे मी अाहे की प्रेमात पडण्यासारखी! तरीही मला माझी केवढी धास्ती! मग का बरं?